सामान्य काळातील
चौदावा सप्ताह
गुरुवार
८ जुलै २०२१
संत हेस्पेरस आणि जोई सण रक्तसाक्षी (......१३५)
✝️
“घरांत जाताना, तुम्हाला शांति असो, असे म्हणा "
✝️
याकोबाच्या वंशाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने याकोबाचाच मुलगा योसेफ ह्यास दैवी योजनेनुसार मिसर देशात आणले, विपत्ती आणि दुष्काळ याकोबाच्या घराण्यावर आला असताना त्या कठीण प्रसंगी योसेफाद्वारे परमेश्वाराने त्यांचे रक्षण केले व सर्व प्रकारच्या बंधनातून सोडविले निवडलेल्या आपल्या जनतेच्या तारणासाठी परमेश्वर विविध योजनाद्वारे त्यांचे संरक्षण करतो, असे आजच्या पहिल्या वाचनातून स्पष्ट होते.
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सुवार्ता प्रसारासाठी पाठविले त्यावेळी सर्व शिष्यांना आशीर्वाद देतांना त्यांस सर्व आजारांवर आणि अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला.प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. देवाचे राज्य म्हणजेच प्रेम, शांती, समृद्धी, समेट तसेच शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य होय. प्रभू येशूने दिलेल्या कृपादानांचा योग्य तो उपयोग करुन प्रेषितांनी लोकांमध्ये देवराज्य प्रस्थापित करण्याचे व सुवार्ता प्रसाराचे कार्य केले..
प्रभू येशू आपल्या सर्वांना आज त्याच्या देवराज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी प्राचारण करीत आहे. आपल्या प्रत्येकाला अनेक कृपादाने परमेश्वराने बहाल केलेली आहेत. पवित्र आत्म्याठायी बळकट बनून देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्तसभेत आज अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या सभोवताली अनेक माणसे व्याधीग्रस्त, भूतग्रस्त आणि चिंताग्रस्त आहेत. आपण त्यांना मदत व सेवा करण्यास पुढाकार घेण्यास तयार आहोत का? प्रभू येशू सतत आपल्या बरोबर आहे.
पहिले वाचन : उत्पत्ती ४४:१८-२१,२३-२९,४५:१-५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले. "
यहुदा योसेफजवळ जाऊन म्हणाला, “स्वामी मला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची आज्ञा व्हावी, आपला राग आमच्या दासावर न भडको; आपण तर फारोसमान आहा. स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, 'तुम्हास बाप किंवा भाऊ आहे काय ?' तेव्हा आम्ही स्वामींना सांगितले की, 'आमचा बाप म्हातारा आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे; त्याचा भाऊ मरून गेला आहे, त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे आणि त्याच्या बापाचे त्याच्यावर फार प्रेम आहे.' आपण आपल्या दासांना म्हणाला, 'त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन.' नंतर आपण आपल्या दासांना म्हणाला, 'तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर न आला तर माझे तोंड पाहावयास तुम्हांला मिळायचे नाही.' आपला दास आमचा बाप याच्याकडे जाऊन आम्ही पोहचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्याला कळवले. पुढे आमच्या बापाने म्हटले, 'पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामुग्री विकत घेऊन या.' तेव्हा आम्ही म्हटले, 'आम्हांला जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आम्हांबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला तर त्या मनुष्याचे तोंडदेखील आम्हांला पाहावयास मिळावयाचे नाही.' आपला दास आमचा बाप आम्हांला म्हणाला, 'तुम्हांला ठाऊक आहे. की, माझ्या पत्नीला दोन पुत्र झाले; त्यातल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की, खरोखर त्याला वनपशूने, खाऊन टाकले असावे; कारण त्यानंतर तो माझ्या दृष्टीस पडला नाही. आता तुम्ही यालाही माझ्याजवळून नेले आणि यास काही अपाय झाला तर मला दुःख होऊन हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास तुम्ही कारण व्हाल.'
तेव्हा योसेफभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्यांना गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, सर्व लोकांना बाहेर घालवा. योसेफने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठ्यामोठ्याने रडू लागला; ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे. काय ?" त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते सर्व त्याच्यापुढे घाबरले होते.
म्हणून योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” तेव्हा ते जवळ गेले. तो पुन्हा म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही इजिप्तच्या देशात विकून टाकले तो मीच. आता काही दुःख वाटून घेऊ नका, तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल संताप करून घेऊ नका; कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १०५:१६-२१
प्रतिसाद :परमेश्वराने केलेली अद्दभूत कृत्ये आठवा
१) परमेश्वराने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला.
२ )त्यांनी बेड्या घालून त्यांच्या पायांना इजा केली, लोखंड त्याच्या जिव्हारी लागले, त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले.
३) राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
शुभवर्तमान मत्तय १०:७-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."
येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे शिकवले, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका; कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना, तुम्हांला शांती असो! असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो. 'न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशांना सोपे जाईल.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : -येशू शिष्यांना लोकांची शारीरिक व आत्मिक दुखणी बरी करण्याचा अधिकार देतो. आपणालासुद्धा येशू त्याची सुवार्ता पसरविण्यास पाचारण करीत आहे. कदाचित आपण शारीरिक आजार बरे करू शकत नाही पण आपल्या मायेच्या दोन शब्दांनी इतरांच्या दुःखी मनाचे सांत्वन करू शकतो. एकाकी मनाला आधार देऊ शकतो, भरकटलेल्या जिवाला मार्ग दाखवू शकतो. सध्याच्या व्यस्त जीवनात शारीरिक आरोग्यापेक्षा लोकांना मानसिक शांतीची जास्त गरज आहे. आपला वेळ, प्रेम, आपुलकी आपण इतरांना देऊ शकतो. येशू सांगतो हे सर्व तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून गरजवंतांना देताना हे सर्व फुकट द्या.
प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिस्ता, शांतीचे, प्रेमाचे व समेटाचे देवराज्य प्रस्थापित करण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
0 टिप्पण्या