Marathi Bible Reading | 14th Week in Ordinary Time | Friday 9th July 2021

               सामान्य काळातील 

चौदावा  सप्ताह 

शुक्रवार  

९ जुलै २०२१


 गोर्कुम (हॉलंड) चे रक्तसाक्षी
• संत निकोलस पिएल आणि त्याचे सहकारी 
(...... १५७२)  सण 
सोळाव्या शतकात कॅल्विन नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. मात्र पुढे त्याने ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीविरुद्ध उघड उघड बंड पुकारले आणि कॅल्विनिझम नावाची विचारसरणी मानणाऱ्यांचा एक पंथ स्थापन केला. प्रॉटेस्टंट पंथासमानच त्यांची शिकवण होती. कालांतराने हा पंथ इतका व्यापक बनला की त्यांनी कॅथलिक शिकवण पाळणाऱ्या लोकांचा छळ करायला सुरवात केली.
हॉलंडमधील गोर्कुम या धर्मप्रांतात त्यांनी एक मोठे अमानुष हत्याकांड घडवून आणले. १९ धर्मगुरू आणि व्रतस्थांना त्यांनी ठार मारले. त्यापैकी बारा जणांना केवळ अतिपवित्र साक्रामेंतातील येशूच्या खऱ्या उपस्थितीवरील विश्वासापायी क्रुसावर खिळण्यात आले. त्यात एक धर्मगुरू तब्बल ९० वर्षांचे वृद्ध होते.
उरलेल्या सात जणांपैकी जेम्स लाकॉप्स ह्यांना शिडीवर उलटे टांगवण्यात आले आणि सहा जणांना खांबावर टांगून मारण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची निर्जीव शरिरे एका सार्वजनिक खड्ड्यात टाकण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इ. स. १६१६ पर्यंत म्हणजे १४४ वर्षापर्यंत त्यातील एकही देह कुजला नाही. पुढे त्यांचे अवशेष बेल्जियम येथील क्रुसेल्सच्या फ्रान्सिस्कन चर्चमध्ये पुरण्यात आले. इ. स. १८६७ साली त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.

✝️ 

"तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्याठायी बोलणारा आहे." 
✝️ 
 
 सुवार्तेसाठी सभास्थानात फटके खावे लागतील, सर्व माणसे तुमचा द्वेष करतील, घरातील माणसे एकमेकांच्या जीवावर उठतील अनेक प्रकारच्या| छळाला सामोरे जावे लागेल. मात्र त्याचवेळी प्रभू येशू शिष्यांना धीर देऊन  म्हणत आहे,  तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्याठायी बोलणारा  आहे.' म्हणजेच पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व शक्ती आपली पाठराखण करेल. आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूने त्याच्या देवराज्याची साक्ष देण्यास पाचारण   केले आहे. विश्वासाने व निष्ठेने प्रभूची सुवार्ता पसरविणे हे प्रत्येक ख्रिस्ती माणसांसाठी आवाहन आहे. जग हे असंख्य प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीने भरलेले आहे. जगात सैतान कार्यरत असल्यामुळे ख्रिस्ती माणसांचा छळ होणारच आहे. अशावेळी प्रभू येशू आपल्याला धैर्याचा आत्मा बहाल करीत आहे.

देवाची सुवार्ता पसरविण्यास व सेवाकार्य करण्यासाठी स्वतः परमेश्वर आपल्याला प्रेरणा, सामर्थ्य, धैर्य आणि कृपा देत असतो. आपण त्याच्या पवित्र आत्म्याठायी सशक्त बनण्यासाठी कृपा मागू या. प्रभू येशू सर्वदा आपल्याबरोबर आहे. 
                                    ✝️             

पहिले वाचन : उत्पत्ती  ४६:१७,२८-३०

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुला मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो."

इस्राएल आपल्या सर्वं मुलासह निघून बैरशेबा येथे आला; तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलला बोलला, "याकोबा," तो म्हणाला, “काय आज्ञा?" देव म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू इजिप्तला जायला भिऊ नकोस; कारण तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझ्याबरोबर इजिप्तला येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील." मग याकोब बैरशेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यात इस्राएलपुत्रांनी आपला बाप याकोब, आपली मुलेबाळे आणि बायका बसवून नेल्या. आपली गुरेढोरे आणि कनान देशात संपादलेलेधन घेऊन इजिप्त देशात आले; याप्रमाणे याकोब आणि त्याची सर्व संतती इजिप्त देशात आली. त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे आणि नातू, कन्या आणि नाती वगैरे आपली सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.
योसेफने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबने यहुदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल यास भेटायला गोशेन प्रातांत गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्याला त्याने मिठी मारली आणि त्याच्या मानेवर मान टाकून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्राएल योसेफला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  :३६:३-४,१८-१९, २७-२८,२९-४०

प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते.

१) परमेश्वरावर भाव ठेव आणि सदाचाराने वाग;
 देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर; 
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; 
तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) सात्त्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. 
त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; 
ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील.

३) वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; 
म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील.
 कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; 
तो आपल्या भक्तांना सोडत नाही.

४) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; 
संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. 
परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो आणि त्यांना मुक्त करतो;
त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो आणि तारतो, 
कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:१६-२३

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. "

येशूने बारा जणांना पुढीलप्रमाणे शिकवले, पाहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे ह्याच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल, जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल; कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा; मी तुम्हांला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन - सुवार्ता प्रसाराचे कार्य शिष्यांवर सोपवल्यावर येशू त्यांना मोलाचा बोध करतो. सुवार्ता प्रसार करणे हे सोपे नाही हे खुद्द येशू जाणत होता. ज्यांना सुवार्ता सांगितली जाईल ते लोक सुद्धा समंजस असतील असे नाही. म्हणून येशू शिष्यांना सांगतो, तुम्ही कबुतराप्रमाणे निरुपद्रवी व सापाप्रमाणे चतुर व्हा. सध्याच्या कृत्रिम जगात वावरताना हा सल्ला आपणांस अगदी उपयुक्त आहे. आज प्रत्येक जण आपल्या तोंडाला जणू मुलामा लावून आचरण करीत आहे. कोण आपले मित्र, कोण शत्रू हे ओळखणे अगदी कठीण झाले आहे. जे लोक चांगलेपणाचा आव आणतात पण ज्यांच्या मनात आपल्याविरुद्ध विष भरले आहे त्यांना ओळखण्यासाठी आपण चतुर असणे गरजेचे आहे. फक्त चतुरच नाही तर देव आपणास इतरांना कोणत्याही प्रकारे इजा न करण्यास सांगत आहे.

प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, सुवार्तेची साक्ष धैर्याने सांगण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या