Marathi Bible Reading | Saturday 10th July 2021| 14th Week in Ordinary Time |

सामान्य काळातील 

चौदावा  सप्ताह 

शनिवार   

१०जुलै २०२१


 संत फेलिसिटी आणि तिची सात रक्तसाक्षी मुले यांचा सण 
रकासाक्षी ........१६५) 

“भिऊ नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. "
✝️ 

परमेश्वराची सर्व निर्मीती मौल्यवान आहे. आपल्या निर्मितीची काळजी घेत असतो. मानव ही परमेश्वराची सर्वात महान निर्मिती आहे. ज्यांना विचार करण्याची शक्ति नाही किंवा ज्यांना बोलता येत नाही, अशा सर्व प्राणी मात्रांची देव काळजी घेतो. मानवाची तो विशेषरितीने काळजी वाहत असतो. म्हणूनच मानवाने म्हणजे आपण आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचे गुणागान गाऊन त्याची साक्ष जगाला दिली पाहीजे.

प्रभू येशू ख्रिस्त जगातील अनेक अव्हाने व संकटाची जाणीव करून देत असताना आज आपल्या प्रत्येकाला धैर्याने व मोठ्या श्रद्धेने देवराज्याचे कार्य  चालू ठेवण्यास प्रेरणा देत आहे. ख्रिस्ताची साक्ष आपल्या जीवनाद्वारे जगाला  देणे हे ख्रिस्ती श्रद्धावंताचे कार्तव्य आहे.  आपल्या सुवार्ता कार्यामध्ये प्रभू येशू सर्वदा आपले रक्षण करण्यासाठी आपल्या बरोबर असतो. पवित्र आत्म्याची प्रेरणा प्रत्येक श्रद्धावंताला शहाणपण, सामंजस्य व सामर्थ्य देऊन, सुवार्ता प्रसारासाठी प्रवृत्त करीत असते.
ख्रिस्तावरील व त्याच्या पुनरुत्थानावरील आपली श्रद्धा मजबूत बनवून आपण शब्दाद्वारे व कृतिद्वारे सुवार्ता प्रसारासाठी पुढाकार घेऊ या.

✝️             

पहिले वाचन : उत्पत्ती ४९:२९-३३:५०:१५-२५

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

“देव खरोखर तुमची भेट घेईल आणि तुम्हाला या देशातून परत घेऊन जाईल."

याकोबने आपल्या पुत्रांना आज्ञा केली की, “मी लवकरच मरणार तर मला नेऊन एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा. कनान देशातील मप्रेसमोरील मकफेला नामक शेतातील गुहा, जी आब्राहामने शेतासह एफ्रान हित्ती याच्यापासून आपल्या सत्तेचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही. तेथेच आब्राहाम आणि त्याची पत्नी सारा यांना पुरले, इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथे पुरले; तेथेच मी लेआलाही पुरले. ते शेत आणि त्यातील गुहा ही हित्तीपासून खरेदी केली आहेत." आपल्या पुत्राला आज्ञा करण्याचे संपल्यावर याकोबने अंथरुणावर आपले पाय आखडून प्राण सोडला.
आपला बाप मेला हे मनात आणून योसेफचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ आमचे वैर करील आणि आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उसने फेडील.” त्यांनी योसेफला सांगून पाठवले की, “आपल्या पित्याने मरण्यापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी: 'तुम्ही योसेफला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा गुन्हा आणि पाप यांची क्षमा कर.' आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो." हे भाषण ऐकून योसेफला रडू आले. त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याच्या पायांशी लागले आणि म्हणाले, “पाहा, आम्ही आपले दास आहो.” योसेफ त्यांना म्हणाला, "भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे ? तुम्ही माझे वाईट योजले, पण देवाच्या योजना बऱ्यासाठीच होती की त्याप्रमाणे बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहातच आहा, तर आता भिऊ नका; मी तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” याप्रकारे त्याने त्यांचे सांत्वन करून त्याच्या मनाला धीर दिला. योसेफ़ आपल्या बापाच्या घरच्या माणसासह इजिप्तमध्ये राहिला. तो एकाशेदहा वर्षे जगला. योसेफने एफ्राईमच्या तिसऱ्या पिढीची मुले पाहिली; तसेच मनश्शेचा पुत्र माखोर याची मुले त्याच्या मांडीवर खेळली, नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, "मी आता मरणार, देव खरोखरच तुमची भेट घेईल आणि या देशातून जो प्रदेश आब्राहाम, इसहाक आणि याकोब यांस त्याने प्रतिज्ञापूर्वक देऊ केला आहे त्या प्रदेशात घेऊन जाईल." मग देव खात्रीने तुमची भेट घेईल,” असे योसेफाने इस्राएल पुत्रांना सांगून आपल्या अस्थी तेथून घेऊन जाण्याविषयी त्यांच्याकडून आणभाक करायला लावले.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०५: १:४,६-७

प्रतिसाद : देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. 

१) परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाचा धावा करा. 
राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा; 
त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा;
 त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.

२) त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; 
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत 
त्यांचे मन हर्षित होवो. परमेश्वर आणि 
त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा;
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्यांचे वंशजहो, 
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो प्रभू आमचा देव आहे; 
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत;
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:२४-३३

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "जे शरीराचा घात करतात त्यांना भिऊ नका.'

येशू आपल्या बारा प्रेषितांना म्हणाला, “गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही; शिष्याने गुरूसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्याला बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना किती तरी अधिक म्हणतील!" ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा आणि शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातल्या पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन - येशू आपणास सांगतो की शिष्याने गुरूप्रमाणे व्हावे, येशू आपला गुरू आहे म्हणून आपण सर्वांनी त्याच्यासारखे झाले पाहिजे. येशूसारखे आचारण करणे सोपे आहे का ? त्याच्या सारखे नम्र, प्रेमळ, क्षमाशील वागणे सोपे नाही पण अशक्य मात्र नक्कीच नाही. ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपणास त्याच्यासारखे कसे होता येईल ह्यावर मनन केले पाहिजे. जेव्हा आपण येशू सारखे आचरण करणार तेव्हा जग आपला द्वेष करणार कारण जागतिक कल्पना येशूच्या मूल्यापेक्षा वेगळ्या आहेत. जगाने जसा येशूचा द्वेष केला तसाच आपला होणार पण येशू सांगतो असे होईल तेव्हा भिऊ नका कारण मी तुमचा उद्धार करणार. 

प्रार्थना: हे प्रभू येशू, धैर्याने तुझी साक्ष जगाला देण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या