Marathi Bible Reading | Sunday 11th July 2021| 15th Sunday in Ordinary Time |

 सामान्य काळातील 

पंधरावा रविवार  

११जुलै २०२१

 “प्रभू येशूने प्रेषितांना कामगिरीवर पाठविले.” 
✝️ 
पहिल्या वाचनातील आमोस संदेष्ट्याने धैर्याने आणि संयमाने बेथेल येथे परमेश्वराचा संदेश दिला. जे सत्य व जे देवाच्या योजनेप्रमाणे होणार असते त्याचा संदेश देताना कोणताच संदेष्टा घाबरला नाही, कारण प्रभूचे वचन आहे, 'घाबरु नकोस, मी तुझ्याबरोबर आहे.'
निवडलेल्या आपल्या बारा शिष्यांना प्रभू येशूने आशीर्वाद व अधिकार देऊन देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आणि सेवाकार्य करावयास पाठविले. अगदी साध्या भोळ्या माणसांनी प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूच्या आज्ञेप्रमाणे सेवाकार्य करण्यास सुरुवात केली. प्रभूच्या कृपेचे सामर्थ्य त्यांच्याठायी कार्य करीत होते. लोकांना त्यांनी पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त केले. प्रभूची तारणाची  सुवार्ता सांगितली. 'त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करुन बरे केले.' सर्व शिष्यांचे जीवन ख्रिस्ताठायी जणू अनुरुप बनले आणि  त्यांच्याद्वारे अनेकांच्या जीवनात देवराज्य प्रस्थापित झाले. पुष्कळांच्या जीवनात  परिवर्तन घडून आले. जगात सर्वांनी आनंदी, सुखी आणि प्रभूठायी पवित्र जीवन जगावे म्हणून आपली निवड करुन प्रभू आपल्याला आज पाठवित आहे.
परमेश्वराचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू बोलवित आहे. त्याचा संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याच्या सार्वकालिक जीवनाचे वारस बनण्यासाठी आपण तयार होऊया.  

✝️             

पहिले वाचन : आमोस  ७:१२-१५

वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन

"जा, माझे लोक इस्त्राएल यांना संदेश सांग."

अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे."
तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, अंजिराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, "जा, माझे लोक इस्राएल यांना संदेश सांग."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८५: ९-१४

प्रतिसाद हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हांला दे. 

१) परमेश्वर देव जे काय बोलेले ते मी ऐकून घेईन; 
कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी 
क्षेमकुशल भाषण करील. 
खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले
 तारण समीप असते; 
ह्यासाठी की, आमच्या देशात वैभव नांदावे.

२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत; 
नीती आणि शांती ह्यांनी एकमेकींचे चुबंन घेतले आहे. 
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, 
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.

३) जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि 
आमची भूमी आपले फळ देईल. 
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल 
आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.


दुसरे वाचन इफिसकरांस १:३-१४

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"देवाने आपणांला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतले. "
(आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे; त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले; त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे; ख्रिस्ताच्याठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.)
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो; ह्यासाठी ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाची हमी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ६:७-१३

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशू त्याच्या बारा शिष्यांना बाहेर पाठवू लागला. "

बारा जणांना आपल्या जवळ बोलावून येशू त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.

आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजची तिन्ही वाचने पाचारण ह्या विषयावर तीन महत्वाची सत्ये प्रकाशात आणताना दिसतात: 
१) पाचारण ही परमेश्वराची देणगी असते : आमोस हा संदेष्ट नव्हता किंवा संदेष्ट्याचा पुत्रही नव्हता. तरीही मेंढरे राखीत असताना परमेश्वराने त्याला बोलावले. इफिसीकरांस पत्रातून घेतलेल्या वाचनात संत पौल इफिसच्या लोकांना सांगतो की, जगाच्या स्थापनेपूर्वीच देवाने त्यांना निवडलेले आहे. येशू प्रेषितांची निवड करून त्यांना प्रेषितकार्यावर पाठवितो ते त्यांच्या कला-कौशल्यामुळे नसून परमेश्वराच्या योजनेनुसार होय, असे शुभवर्तमानात आपल्याला सूचित करण्यात आलेले आहे. थोडक्यात परमेश्वर पात्र लोकांना पाचारण करीत नसतो तर तो ज्यांना पाचरण करतो त्यांना तो पात्र बनवित असतो. 
२) पाचारण हा मानवी प्रतिसाद असतोः आमोस हा यहुदातील तेकोवा गावचा श्रीमंत मेंढपाळ होता. तो उंबराच्या फळांचा व्यवसायदेखील करीत असे. असे असूनही तो परमेश्वराच्या हाकेला होकार देतो. इस्राएलमधील बेथेल येथल्या गोरगरीब लोकांवर जो अन्याय होत होता त्याला वाचा फोडण्यासाठी तो तिथे निघून जातो. पौलाचा संदेश गांभीर्याने घेऊन इफिसचे लोक पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगू लागले. बारा प्रेषितसुद्धा येशूची आज्ञा शिरसांवद्य मानून आपल्या कार्यावर निघून जातात. 
३) पाचारण ही अखंडित सुरू राहणारी एक प्रक्रिया असतेः देवाची हाक ही केवळ विशिष्ट व्यक्तींना विशिष्ट कार्यासाठी, काळासाठी वा मर्यादित जागेसाठी देण्यात आलेली नसते. तो केवळ एक विशिष्ट क्षण नसतो. ती संपूर्ण जीवनभर अखंडितपणे सुरू असणारी प्रक्रिया असते. आमोसने पहिल्या सहा महिन्यात दादा-पुता करून आशेचा संदेश देऊन पाहिला. मात्र नंतरच्या सहा महिन्यात त्याला विनाशाचे भाकित करावे लागले. इफिसचे लोकही टप्प्याटप्प्याने ख्रिस्ताठायी सर्व गोष्टींचे नूतनीकरण करु लागले. प्रेषितीय कामगिरीवर असताना प्रेषितांना नवनव्या आव्हानांवर उपाय शोधत राहावे लागले.
आत्मपरीक्षण : मला माझे पाचारण समजलेले आहे का? पाचारण व मिशन ह्या ख्रिस्ती जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे माझ्या जीवनातून दिसून येते का? इतरांना त्यांचे पाचारण समजून देण्यासाठी मला काय करता येईल ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता सांगण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आमची निवड केल्याबद्दल अनेक धन्यवाद, आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या