Marathi Bible Reading | Monday 12th July 2021| 15th Week in Ordinary Time |

  सामान्य काळातील 

पंधरावा सप्ताह 

सोमवार 

१२ जुलै २०२१

संत जॉन गोल्बर्ट

- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (९८५-१०७३)

इटालीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी एका राजघराण्यात जन्माला आलेला जॉन आपल्या एका नातेवाईकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यावर सूड उगविण्याच्या भावनेने पेटलेला होता. इ. स. १०१३ सालच्या शुभ शुक्रवारच्या दिवशी त्याने एका आखूड गल्लीमध्ये आपल्या शत्रूला गाठले. आपल्या हातातील तीक्ष्ण हत्याराने तो त्याला ठार मारण्याच्या आवेशात असतानाच त्याच्या शत्रूने त्याच्या पायांवर लोटांगण घातले आणि त्याची मनापासून क्षमा मागितली. इतकेच नव्हे तर 'आज शुभ शुक्रवार आहे. आजच्या दिवशी प्रभू येशूने आपल्या मारेकऱ्याला क्षमा केली.' असे म्हणून जॉनचा शत्रू जमिनीवर उताणा पडला. आपले हातपाय क्रुसाला खिळलेले आहेत अशी कृती करून त्याने प्रार्थना केली, “हे बापा त्याला (जॉनला) क्षमा कर कारण तो काय करीत आहे ते त्याला समजत नाही !”
या एकंदर प्रकारामुळे भांबावून गेलेल्या जॉनने आपल्या हातातील शस्त्र जमिनीवर ठेवले. तो आपल्या शत्रूच्या जवळ गेला त्याने त्याला मायेने उराशी कवटाळे. त्याची क्षमा मागितली. त्याला मनापासून क्षमा केली. त्यानंतर बेनेडिक्टाईन चर्चमध्ये गेला  क्रुसावर खिळलेल्या प्रभू येशूकडे त्याने स्वतःच्या अपराधांबद्दल क्षमा मागितली. तेव्हा क्रुसावरील येशूने त्याच्या या कृत्याचा स्वीकार केल्याची खूण म्हणून हळूच आपले डोके हलविल्याचा त्याला भास झाला.
त्यानंतर जॉनच्या जीवनात अंतर्बाह्य कायापालट झाला. त्याने सान मिनियाटो येथल्या बेनेडिक्टाईन मठामध्ये दाखल झाला.
बेनेडिक्टाईन मठाहून अधिक कडक शिस्तीची होती. अखंड मौन पाळणे, आत्यंतिक दारिद्र्यात दिवस काढणे, ध्यान-साधना, मनन-चिंतन करणे अशी त्यांची जीवन पद्धती होती. प्रौढ वयात आपल्या जीवनाचं पूर्ण नूतनीकरण केलेल्या अशिक्षित पुरुषांना ह्या नवीन संस्थेकडे आकर्षून घेतले. ह्या आगळ्या वेगळ्या राहणीमानाचे पुढे कित्येक शतके अनेकांकडून स्वागत झाले आणि अनेक प्रापंचिक धर्मबंधूंच्या संस्था उदयास आल्या.
प्रभू येशूला अनुसरणे, आत्मत्याग करणे व स्वतःचा वधस्तंभ उचलणे कठीण आहे. परंतु प्रभू येशूठायी सर्वकाही शक्य आहे. प्रभू येशूचे प्रामाणिक अनुयायी बनण्यास व त्याची साक्ष जगाला देण्यास प्रेरणा, धैर्य व कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करु या.   
                                    ✝️  
ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील.

✝️             

पहिले वाचन :निर्गम  १:८-१४,२२

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या, नाहीतर ते संख्येने फार वाढतील. "

पुढे योसेफची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा इजिप्त देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, "पाहा, या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने आणि बलाने अधिक झाले आहेत. तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील आणि या देशातून निघून जातील.” त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लावून त्याला जेरीस आणावे, या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम आणि रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. पण जो जो त्यांनी त्याना जाचले तो तो ते वाढून बहुगुणित झाले आणि त्यांचा चोहोकडून विस्तार झाला. त्यास इस्राएल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून इजिप्तचे लोक इस्राएल वंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले; त्यांना मातीचा गारा आणि विटा करायला लावीत आणि त्यांना शेतात हरतऱ्हेची कामे करायला लावीत; असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला, कारण ही सर्व लोकांना आज्ञा केली की, “जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२४:१-८

प्रतिसाद परमेश्वराचे नाम हाच आमचा आसरा आहे.

१) आता इस्रायलने म्हणावे की,
“जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता," 
"लोक आमच्यावर उठले तेव्हा 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला असता."

२) जलांनी आम्हाला बुडवले असते, 
त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, 
खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते. 
परमेश्वराचा धन्यवाद होवो; 
त्याने आम्हाला त्यांच्या दाढात भक्ष्य म्हणून पडू दिले नाही.

३) आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या 
पाशातून मुक्त झाला आहे.
पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहो. 
आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माण कर्ता 
जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला सहाय्य मिळते.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, 
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील 
अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १०:३४-११:१

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मी शांतता आणण्यास आलो नाही तर तरवार चालवण्यास आलो आहे. "

येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले, "मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो आहे असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू ह्यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही; ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील.

"जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचित सांगतो.” येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करायला गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजच्या शुभवर्तमानात येशू सांगतो की, मी शांतता प्रस्थापित करण्यास आलो नाही. येशूचे हे बोलणे जरा विचित्रच वाटते, नाही का! येशू जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना आंतरिक शांती नक्कीच देतो, पण येशूच्या मूल्यानुसार मार्गक्रमण करणाऱ्यांना जागतिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अन्याय, अत्याचार, हाव, वासना ह्यांनी भरकटलेल्या जगात सुवार्तेनुसार जीवन जगताना ज्याप्रमाणे येशूला आपले कार्य करताना विरोधाला सामोरे जावे लागले त्याप्रमाणे आपणाला सुद्धा त्रास सहन करावा लागेल. कधी कधी सुवार्तेनुसार जीवन जगताना आपल्याला अगदी जवळच्या व्यक्तींकडून सुद्धा टीकेला सामोरे जावे लागेल. येशूबरोबर जीवन जगणे म्हणजे वेळोवेळी निंदेला सामोरे जाणे. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा आपणांस शांतीचा अनुभव येतो कारण आपणास ठाऊक आहे की येशू आपणावर प्रेम करतो.

प्रार्थना:  हे, प्रभू येशू, श्रद्धेने, धैर्याने आणि प्रामाणिकपणे सर्वस्वी तुला  अनुसरण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या