Marathi Bible Reading | Tuesday 13th July 2021| 15th Week in Ordinary Time

   सामान्य काळातील 

पंधरावा सप्ताह 

मंगळवार  

१३ जुलै २०२१


संत हेन्री दुसरा

सम्राट, वर्तनसाक्षी (९७३-१०२४)

   “हे खोराजिना, हे बेथसदा, तुझी केवढी दुर्दशा होणार."

 इस्त्राएली घराण्यात मुलगा जन्मता:च त्याला जिवे मारण्याची आज्ञा फारोने दिली असताना सुद्धाअद्भूतरित्या मोशेचा जन्म झाला व तो फारोच्याच राजवाड्यात लहानाचा मोठा झाला. 

प्रभू येशू म्हणतो, “हे खोराजिना, हे बेथ्सैदा, हे कफर्णहुमा तुझी केवढी दुर्दशा होणार!" प्रभू येशूने ह्या प्रदेशात अनेक अद्भूत कृत्ये केली होती. देवाचा महीमा प्रकट करत प्रभू येशूने देवाच्या सामर्थ्याचा अनुभव दिला होता; तरी लोकांनी पश्चात्ताप करून परिवर्तन केले नाही. प्रभू येशू आज देवापासून बहकून गेल्यामुळे धार्मिकता व नीतिमत्ता गमाविलेल्या सर्वांना निर्वाणीचा इशारा देत आहे.  'न्यायाच्या दिवशी सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल.' आपल्या जीवनात पश्चातापाच्या आणि परिवर्तनाच्या किती संधी आपण गमावल्या ह्यावर आज चिंतन करु या.
परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. पश्चात्ताप करुन त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याच्या प्रत्येक माणसाला प्रभू सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देत आहे.  प्रेमाचे, शांतिचे, परोपकाराचे आणि प्रभूच्या विपुल कृपेचे जीवन| जगण्यासाठी पश्चात्ताप करुन स्वच्छ व पवित्र जीवन जगण्याचा निर्धार करु या. 

✝️             

पहिले वाचन निर्गम  २:१-१५

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"फारोच्या मुलीने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.” काही दिवसांनी मोशे मोठा झाल्यावर तो आपल्या लोकांकडे गेला. "

लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर आणि राळ चोपडली; त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले आणि पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली; तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला; तो आणायला तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले. ते बालक रडत होते. तिला त्याचा कळवळा आला आणि ती म्हणाली, “हे कोणातरी इब्याचे बालक आहे." तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपणाकरिता मुलास दूध पाजायासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय ?” फारोच्या मुलीने तिला म्हटले, "जा, बोलाव." तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, "या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन." मग ती स्त्री त्याला घेऊन दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली, आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे  ठेवले, कारण ती म्हणाली, "मी त्याला पाण्यातून बाहेर काढले." काही दिवसांनी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्याचे काबाडकष्ट पाहिले; त्याप्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इबऱ्याला कोणी इजिप्तवासी मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली आणि कोणी नाही असे पाहून त्या इजिप्तवासियाला ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला तो दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले; तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?” तो त्याला म्हणाला, “तुला आम्हावर अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमले ? तू त्या इजिप्तवासियाला जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय ?" तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.” फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन राहिला.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ६९ :३,१४,३०-३१,३३-३४

प्रतिसाद: हे पाहून दीन हर्ष करतील. 

१)  मी खोल दलदलीत रुतलो आहे, 
तेथे उभा राहायला आधार नाही 
मी खोल पाण्यात आलो आहे 
आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.

२) मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल. 
अशा समयी तुझी प्रार्थना करतो. 
हे देवा, तू आपल्या विपुल दयेला अनुसरून 
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्गाराच्या 
सत्याला अनुसरून मला उत्तर दे.

३) मी तर दीन आणि दुःखी आहे, 
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला उच्चस्थानी नेऊन ठेवील.
 गीत गाऊन मी देवाच्या नामाचे स्तवन करीन; 
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन

४) दीन हे पाहून हर्ष करतील; 
देवाचा शोध करणाऱ्यांनो, 
तुमच्या हृदयात नवजीवन येवो. 
कारण परमेश्वर गरजूंचे ऐकतो;
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांचा तो अव्हेर करत नाही.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ११:२०-२४

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"न्यायाच्या दिवशी सोर, सिदोन आणि सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल.”

ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती. तेथील लोकांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय ? नव्हे अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजच्या शुभवर्तमानात ज्या नगरांनी येशूने केलेली सर्वाधिक महत्कृत्ये पाहूनसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही शेवटी त्यांची | परिस्थिती सदोम व गमोरा ह्या नगरांपेक्षा वाईट होईल असे खुद्द येशू सांगतो. येशूच्या काळात ज्यांनी पश्चात्ताप करून शरणागती पत्करली त्यांचा उद्धार झाला. पण ज्यांनी अहंकार वृत्ती धारण करून येशूचा संदेश धुडकावला त्यांच्याविषयी येशूने म्हटले, न्यायाच्या दिवशी सदोम व गमोरा ह्यांस तुम्हापेक्षा सोपे जाईल. येशूचे हे बोलणे आपणा सर्वांसाठी लागू होते. आपण सुद्धा येशूच्या दयेचा, प्रेमाचा, कृपेचा अनुभव घेतला आहे. ज्याला जेवढी जास्त कृपादाने लाभली आहेत त्याच्या कडून परत घेताना जास्त अपेक्षिले जाईल. आपण जर अविश्वासी, धार्मिक गोष्टींबाबत निष्क्रिय राहिलो तर आपणालासुद्धा सदोम व गमोरा याच्यापेक्षा वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल.

प्रार्थना:  प्रभू येशू, अंतःकरणापासून पश्चात्ताप करण्यास व समेटांद्वारे नुतनीकरण करून चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या