Marathi Bible Reading | Wednesday 14th July 2021| 15th Week in Ordinary Time

    सामान्य काळातील 

पंधरावा सप्ताह 

बुधवार   

१४ जुलै २०२१

संत कॅमिलुस डी लेलीस

- वर्तनसाक्षी (१५५०-१६१४)
: हे प्रभो, मी ह्या जगातील सर्वांत नीच आणि क्षुद्र असा मानव आहे. परंतु केवळ तुझ्या अपार करुणेपोटी तू माझा बचाव कर.- संत कॅमिलुस 

   "ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या. "

. देव  आत्मा आहे, तो अनंत व शाश्वत आहे. त्याचे अस्तित्व, शहाणपण, सामर्थ्य, पावित्र्य, न्यायीपण, चांगुलपणा व सत्यता ही सर्व अपरिवर्तनीय आहेत. 
परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व सृष्टीत व चराचरात असलेल्या अस्तित्वावरुन आपणास जाणवतो. अनेकवेळा त्याचे सामर्थ्य व वैभव त्याने त्याच्या शब्दाद्वारे व कृत्याद्वारे प्रकट केलेले पवित्र शास्त्रात अनुभवायला मिळते. विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पूर्ण प्रकटीकरण झालेले आहे, परमेश्वर पित्याला पूर्णपणे जाणण्यासाठी प्रथम आपण ख्रिस्ताला ओळखले पाहिजे. ख्रिस्ताची ओळख व जाणीव, त्याची शिकवणूक, त्याची वचने आणि विशेषत: त्याच्या दुःख, मरण व पुनरुत्थानावरील विश्वासाद्वारे होत  असते.
पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी झाल्यावर  येशूच्या मरण व| पुनरुत्थानात आपण एकरुप होतो.  त्यामुळेच प्रभू ख्रिस्ताशी आपण जवळिक साधण्याने व त्याच्याद्वारे दयावंत परमेश्वर पित्याला ओळखण्याचा प्रयत्न करतो . प्रभू येशू ख्रिस्त हाच पित्याला ओळखण्याचा आणि त्याची कृपा  अनुभवण्याचा एकमेव मार्ग आहे.   

✝️             

पहिले वाचन निर्गम  ३:१-६, ९-१२

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"परमेश्वराच्या दूताने एका झुडूपातून अग्निज्वालेत मोशेला दर्शन दिले. "

मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथो याची शेडरेमेंढरे चारीत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीला देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडूपातून अग्निज्वालेत त्यांला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तो झुडूप जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे आणि ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो." ते पाहायला मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडूपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, "मोशे, मोशे!" तो म्हणाला, "काय आज्ञा ?" देवं त्याला म्हणाला, "इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायातले जोडे काढ कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे." तो आणखी म्हणाला, "मी तुझ्या पित्याचा देव, आब्राहामचा देव, इसहाकचा देव, याकोबचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे पाहायला तो भ्याला.
"पाहा, इस्राएल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे, इजिप्तचे लोक त्याच्यावर कसा जाचजुलूम करत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू इजिप्त देशातून माझे लोक इस्राएल वंशज यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो." तेव्हा मोशे देवाला म्हणाला,“फारोकडे जाऊन इस्राएली वंशजांना इजिप्तमधून काढून आणणारा असा मी कोण ?" देव म्हणाला, "नक्की मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले याची तुला खूण हीच. तू लोकांना इजिप्तातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०३ :१-६

प्रतिसाद: परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.

१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.

२) तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उध्दारतो, तो तुला दया आणि करूणा ह्यांचा मुकूट घालतो.

३) जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची आणि न्यायाची कृत्ये करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलच्या वंशजांना जाहीर केली.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ११:२५-२७

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या. "

येशू बोलू लागला: “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि . पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आज येशू सांगतो की देवराज्याच्या पुष्कळ गोष्टी बालकांस प्रकट केल्या आहेत. येथे येशू नक्की बालक म्हणजे लहान मुलांना संबोधितो का? नक्कीच नाही. जे लोक लहान मुलांसारखे निरागस, निगर्वी आहेत त्यांना संबोधित आहे. आपल्यातील अहंकार, गर्व ह्यामुळे आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि ह्याच कारणामुळे आपणास देवाचा पूर्ण अनुभव येत नाही, आणि देवराज्य आपणांस प्रकट होत नाही. दैनंदिन जीवन जगत असताना अहंकार, गर्व ह्या मानवी दुर्गुणांमुळे आपण जवळच्या माणसांपासून दूर जातो. आपल्याठायी असलेल्या ह्या अवगुणांवर मात करता यावी म्हणून प्रभूची कृपा मागू या.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तूच मार्ग, सत्य व जीवन आहेस, परमेश्वरपित्याशी मला एकरुप कर व तुझी सामर्थ्यदायी कृपा बहाल कर, आमेन,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या