सामान्य काळातील
पंधरावा सप्ताह
गुरुवार
१५ जुलै २०२१
संत बोनावेंचर
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२१८-१२७४)
इटालीमधील बाग्नोरेजिओ नामक भागात जन्मलेला जॉन फिडान्झा वयाच्या चौथ्या वर्षी एका असाध्य दुखण्याने आजारी पडला; परंतु संत फ्रान्सिस असिसीच्या प्रार्थनेने तो बरा झाला. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने बोनावेंचर हे नवीन नाव धारण केले.
त्याने पॅरीस येथील विश्वविद्यालयात आलेक्झांडर ऑफ हेल्स या प्रख्यात प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास पूर्ण केला आणि त्याच विद्यालयात व्याख्याने देण्याचे काम केले. त्यानंतर त्याने संत थॉमस अक्वायनस ह्यांच्याबरोबर अभ्यास करून इ. स. १२५७ साली डॉक्टरेट ही पदवी मिळविली.
त्याच वर्षी त्याला फ्रान्सिस्कन संघाचे जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्याचे वय केवळ ३६ वर्षांचे होते. त्याहीनंतर अत्यंत अवघड अशी १६ वर्षे त्याने जनरल म्हणून काम पाहिले. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्सिस्कन संस्थेतील दोन मतप्रवाहामध्ये सौम्य असा संघर्ष सुरू झाला होता. काहींना वाटे फ्रान्सिस असिसीकर ह्याने दिलेली आचारसंहिता काटेकोरपणे पाळायलाच हवी तर काहींच्या मते बदलत्या जमान्यानुसार त्या आचारसंहितेत शिथिलता आणण्यात यावी. शेवटी बोनावेंचर ह्यांनी दोन्ही मतप्रवाह जाणून घेऊन सुवर्णमध्य काढला आणि संस्थेचे कार्य फोफावण्यास सुरूवात झाली. त्यामुळे संत बोनावेंचर ह्यांना फ्रान्सिस्कन संस्थेचे दुसरे संस्थापक अशा नावाने संबोधले जाते.
पवित्र मरियेला देवदूताचा संदेश या घटनेच्या स्मरणार्थ दर दिवशी उजाडण्यापूर्वी आणि दिवस मावळण्याच्या वेळी देवळाची घंटा वाजविली जावी आणि 'नमो कृपापूर्ण मरिये' ही प्रार्थना म्हटली जावी असा आदेश त्यांनी सर्व फ्रान्सिस्कन मठांना दिला होता. पुढे तर ही परंपरा इतकी रुजली की, आज ती प्रार्थना जगभरच्या ख्रिस्तसभेच्या प्रार्थनेचा एक भाग बनलेली आहे.
संत बोनावेंचर १५ जुलै १२७४ साली मरण पावले. १४८२ साली संतपदाला पोहोचले आणि १५८८ त्यांना ख्रिस्तसभेने धर्मपंडित ही पदवी देऊन गौरविले. पोप लिओ तेरावे ह्यांनी त्यांना “देऊळमातेचा साक्षात्कारी राजपुत्र” अशी पदवी बहाल केली.ईशज्ञान, तत्त्वज्ञान अध्यात्म, दैनंदिन जीवन आणि पवित्र शास्त्रावरील भाष्य अशा विविध क्षेत्रातील मौल्यवान खजिना संत बोनावेंचर ह्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला आहे. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे कॉमेंट्री ऑफ द सेंटेन्सेस नावाचे बायबलवर ४,००० पानांचे लिखाण आजही तितकेच प्रेरणादायी आहे. संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र इ. स. १२६३ साली पिसा येथल्या एका महासभेत फ्रान्सिस्कन संस्थेच्या संस्थापकाचे अधिकृत चरित्र म्हणून सन्मानीत केले गेले.संत बोनावेंचर ह्यांच्याठायी एक उत्तम वक्तादेखील दडलेला होता. राजे महाराजे, महागुरू, धर्मगुरू, सामान्य जनता किंवा आपल्या मठातील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांना ते अत्यंत आत्मियतेने व तळमळीने मार्गदर्शन करीत असत. प्रवचन, व्याख्याने, भाषणे ह्यांची एकही संधी त्यांनी गमावली नाही. सर्वांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत असताना ते स्वतः ख्रिस्तमय झाले आणि सर्वांपर्यंत जाऊन पोहोचले.
धार्मिक माणसाच्या जीवनाची खरी परिपूर्ती साध्यासुध्या गोष्टी अगदी सुरळीतपणे व व्यवस्थितरित्या करण्यात दडलेली आहे. संत बोनावेंचर
"माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल."
✝️
पहिले वाचन : निर्गम ३:१३-२०वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी आहे तो आहे, मी आहे त्याने मला तुम्हाकडे पाठवले आहे."
मोशे देवाला म्हणाला, “ “पाहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे', असे मी इस्राएल वंशजाकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय' असे मला ते विचारतील. तेव्हा मी त्यांना काय सांगू ?" देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे.” “तू इस्राएल वंशजांना सांग 'मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.' आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांस सांग, 'तुमच्या पुर्वजांचा देव, आब्राहामचा देव, इसहाकचा देव, आणि याकोबचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे: हेच माझे सनातन नाव आहे आणि याच नावाने पिढ्यान्पिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्राएलच्या वडीलजनांना जमवून सांग, 'तुमच्या पूर्वजांचा देव, आब्राहामचा, इसहाकचा, आणि याकोबचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की, “माझे तुम्हांकडे खरोखर लक्ष गेले आहे आणि इजिप्त देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. इजिप्त देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव."" तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलचे वडीलजन इजिप्त देशाच्या राजाकडे जा आणि त्यांना सांग, 'इब्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे.' पण मला ठाऊक आहे की, इजिप्त देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून इजिप्त देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०५ :१-५,८-९,२४-२७
प्रतिसाद : तो आपला करार सर्वकाळ आठवतो.
१) आलेलुया !
परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
त्याच्या नावाचा धावा करा;
राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार
आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
२) तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी
आज्ञापिलेले हा करार त्याने आब्राहामशी केला
आणि त्याविषयी इसहाकजवळ शपथ वाहिली.
आपले वचन सर्वकाळ आठवतो;
३) परमेश्वराने आपले लोक संख्येने पुष्कळ वाढवले,
त्यांच्या शत्रूपेक्षा त्यांना बलिष्ट केले;
आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा
आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे
म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले.
४) त्याने आपला सेवक मोशे आणि
आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले.
त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे,
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
शुभवर्तमान मत्तय ११:२८-३०
वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" मी मनाचा सौम्य आणि लीन आहे."
येशूने म्हटले, "अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : - येशू आपणास त्याचे जू आपणावर घेण्यास सांगत आहे. तसेच येशू सांगतो माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. येथे येशू सांगतो की माझी जी साधी शिकवणूक आहे त्याचे ओझे जर तुम्ही आपणावर घेतले तर तुमच्या जीवनात असलेली ओझी, जू व तुमचे दैनंदिन जीवन तुम्ही व्यवस्थित तोलू शकता. येशू नेहमीच संकट प्रसंगी आपल्या सोबत असतो, परंतु अश्या प्रसंगी आपण येशूकडे लक्ष लावण्याऐवजी आपण आपले लक्ष संकटाकडेच केंद्रित करतो. त्यामुळे आपणास जीवनातील दुःख, त्रास वेदनादायक व असहाय्य वाटतात. जीवनातील कठीण प्रसंगांना मानवी दृष्टीने न पाहता येशूच्या शिकवणुकीच्या नजरेने पाहिले तर आपल्या जीवनातील दुःखांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण बदलेल. ह्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्व दुःखे आपोआप हलकी वाटू लागतील ह्यात शंका नाही.
प्रार्थना: हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुझाच / तुझीच आहे. तुझ्या कृपासनाजवळ येण्यास व तुझे प्रेम अनुभवण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या