Marathi Bible Reading | Friday 16th July 2021| 15th Week in Ordinary Time

      सामान्य काळातील 

पंधरावा सप्ताह 

शुक्रवार 

१६ जुलै २०२१

कार्मेल माता मरीयेचा सण 

कार्मेलाईट संस्थेचा संस्थापक संत सायमन स्टॉक (सण १६ मे) ह्यांनी आपल्या संस्थेचा चाललेला छळ रोखण्यासाठी पवित्र मरियेकडे संरक्षणाचे साकडे घातलेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इ. स. १२५१ साली इंग्लडमधील केंब्रिज ह्या ठिकाणी पवित्र मरियेने या वृद्ध सत्पुरुषाला दर्शन दिले आणि त्यांना तपकिरी रंगाची बेंतीण दिली. त्यावरून ख्रिस्तसभेत पवित्र मरिया ही “बेंतीणीची राणी ” म्हणून ओळखली जाऊ लागली व बेंतीण हा ख्रिस्ती परंपरेचा एक भाग बनली. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे सर्व वाईटांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना बेंतीण देण्यात येते.
संत सायमन स्टॉक ह्यांना पवित्र मरियेने बेंतीण देतेवेळी अशी शाश्वतीदेखील दिली की, जो कोणी ही बेंतीण अत्यंत श्रद्धेने आणि मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे बाळगील त्या व्यक्तीला पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा विशेष लाभ होईल. तसेच मरणाच्या वेळी त्याला खास असे संरक्षण देण्यात येईल आणि अनंत यातनांपासून त्यांचे रक्षण करण्यात येईल.
एलिया संदेष्ट्याने कार्मेल नावाच्या पर्वतावर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन जगाला घडविले ती कथा १ राजे अध्याय १८ मध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. शिवाय पॅलेस्टाईनमधल्या या कार्मेल पर्वतावर अनेक प्राचीन मठवासियांचे वास्तव्य होते, त्यामुळे हा पर्वत पवित्र भूमी म्हणून गौरविला गेला आहे. १३ व्या शतकात सारासीन लोकांनी मोठे हत्याकांड घडवून आणल्यामुळे सायमन स्टॉक ह्यांच्या मठवासियांनी कार्मेल पर्वतावरून पलायन केले आणि एकांतवासाऐवजी लोकांतवासाची परंपरा अंगिकारली. काही उपासतापासाचे आणि मौनाचे कडक कायदे त्यांनी शिथिल केले.

चिंतन: पवित्र मरियेने या जगासाठी मध्यस्थी केली नसती तर हे जग कधीच नष्ट झाले असते. - संत फ्रुमेन्शिअस यूड्स

✝️ 
  'मला दया पाहिजे, यज्ञ नको,'
✝️             

पहिले वाचन निर्गम  ११:१०-१२:१४

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"दोन संध्याकाळच्या मध्ये तुम्ही एक कोकरू कापा अणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडीन."

मोशे आणि अहरोन ह्यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही.
मग परमेश्वराने इजिप्त देशात मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितले की, “हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलच्या सर्व मंडळींना सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एकएका घराण्यामागे एकएक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने आणि त्याच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे; प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल ह्याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हांला वाटेल तो घ्यावा; ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना आणि चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी आणि कडू भाजीबरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय आणि आतडी हीसुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही ह्या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून; पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री इजिप्त देशात फिरून त्यातील मनुष्य आणि पशू ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्त देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खूण असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलाडूंन जाईन; इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.
हा दिवस तुम्हांला स्मारक दाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यान्पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.”

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११६ :१२-१३,१५-१८

प्रतिसाद :  मी परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.

१) परमेश्वराने, माझ्यावर केलेल्या 
सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?
 मी तारणाचा प्याला हाती घेऊन
 परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.

२) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या 
भक्तांचे मरण अमोल आहे. 
हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; 
मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; 
तू माझी बंधने सोडली आहेत.

३) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, 
परमेश्वराच्या नावाचा धावा करीन, 
परमेश्वराला केलेले नवस 
मी त्याच्या सर्व लोकासमक्ष फेडीन.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १२:१-८

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे."

एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुशी त्यांना म्हणाले, "पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत." त्याने त्यांना म्हटले, "दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय ? तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको,' ह्यांचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्याला दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांसाठी केलेल्या मोठ्या चमत्काराविषयी आपण ऐकतो. आपल्या निवडलेल्या लोकांची दैन्यावस्था पाहून देवाला त्यांची दया येते व तो आपला दूत पाठवून मिसरी लोकांचा नाश करतो. देव आपले सामर्थ्य व आपल्या लोकांविषयीचे अपार प्रेम ह्या वल्हांडणाच्या घटनेने प्रकट करतो. आपण कितीही वाईट वागलो, देवापासून दूर गेलो तरी देव आपणांस विसरत नाही. आपण कितीही खोल गर्तेत गेलो तरी आपणास तारावयास तो समर्थ आहे. देवाने आपल्या जीवनात केलेल्या उपकारांची आठवण करून त्याचे आभार मानूया. इस्रायली लोकांप्रमाणे आपणास अनेक वेळा गुलामगिरीचा अनुभव येतो. ही गुलामगिरी पाप, व्यसने, वासना, अहंकार ह्याची असते. आपण कोणत्या गुलामगिरीच्या जाचाखाली जीवन जगत आहोत. यावर मनन करून, देवाने आपणास ह्यातून बंधमुक्त करावे म्हणून कृपा मागुया.

प्रार्थना: हे पवित्र कार्मेल माने बेंतीणीची राणी, आम्हासाठी विनंती कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या