सामान्यकाळातील नववा सप्ताह
शुक्रवार
४ जून २०२१
✝️
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराची दया किती मला आहे ह्याचे अनुभव कथन दिले आहे. तोबितला झालेल्या त्रासातून आणि अंधात्वातून परमेश्वराने तोबिअस द्वारा त्याच्यावर दया केली तेव्हा तोबीतने देवाला धन्यवाद देत म्हटले 'तू मला यातना दिल्या पण माझ्यावर दया देखील केलीस'.
परमेश्वर कृपाळू, दयाळू व मंदक्रोध आहे. आपल्या जीवनातील आजार, दुःख, वेदना व संकटांना अनेकदा आपणच जाबाब असतो. तरी सुद्धा आपण देवाला प्रश्न विचारतो की, माझ्या जीवनात अशा वेदना व दुःख का? काहीं माणसे तर एखादी आपत्ती कोसळल्यावर देवालाच दोष देत असतात.
दैवी योजना मानवी योजने पेक्षा निराळ्या आणि अनाकलनीय असतात. जीवनात चांगले किंवा वाईट घडत असताना देवावरील विश्वासात आपण कमी पडतो. प्रसंगी आपण प्रार्थना व भक्ती न करता देवा पासून दूर जातो. मात्र देव आपल्यापासून कधीच दूर जात नाही. देव आपल्याला शिक्षा करतो असे वाटत असले तरी आपण लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षेपेक्षा देवाची दया खूप महान आहे. म्हणूनच स्तोत्रकार आज आपल्याला सांगत आहे, परमेश्वर कृपाळू, दयाळू आहे, तो मंदक्रोध व अति दयाळू आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व दुःख, वेदना व आजार सहन करण्याची शक्ती सुद्धा दिली आहे.
आज आपण देवाच्या दयेवर चिंतन करुया. विशेषत: आपल्या जीवनातील चांगल्या घटना व प्रसंग आठवू या. देवाच्या आपल्यावरील अनंत उपकार बद्दल त्याचे आभार मानूया. त्याचा माहिमा गाऊ या आणि त्याला धन्यवाद देऊन त्याची स्तुती करु या. आपल्या जीवनातील देवाच्या योजनेमध्ये त्याचे प्रेम, दया व क्षमा अनुभवण्याचा प्रयत्न करु या. देव खरोखरच प्रेमळ व कृपाळू आहे.
✝️
वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जरी तू मला शिक्षा केलीस तरीही तू माझ्यावर दया दाखवली आहेस. आता मी माझा मुलगा ह्याला बघू शकतो." तोबिअस अन्ना डोळ्यांत प्राण घालून रस्त्याच्या कडेला बसून आपल्या मुलाची वाट पाहात होती तिने त्याला येताना पाहिले आणि ती आपल्या मुलाच्या बापाला म्हणाली, "है पाहा, आपला मुलगा आणि जी माणूस त्याच्याबरोबर गेला होता ते परत येत आहेत!"
राफाएल देवदूत तोबिअसला म्हणाला, "तोविअस मला माहीत आहे की, तुझ्या वडिलांचे डोळे उघडतील. तू त्याच्या डोळ्यांवर माशाच्या पित्ताचा लेप लाव आणि डोळे झोंबू लागले म्हणजे त्याला ते चोळू दे आणि त्याच्या डोळ्यांतून सफेद पापुद्रे पडतील आणि तो तुला पाहू शकेल."
मग अनाने धावत जाऊन आपल्या मुलाला मिठी मारली आणि त्याला म्हणाली, “माझ्या मुला, मी तुला पाहिले आहे; आता मी मरण्यास तयार आहे" आणि ते दोघे रडले. तोबीत दरवाजाजवळ जाण्यास निघाला इतक्यात ठेचाळून पडला.. पण त्याच्या मुलाने धावत जाऊन त्याच्या वडिलांना पकडले आणि आपल्या वडिलांच्या डोळ्यांवर माशाचे पित्त लावून म्हटले, "बाबा, आनंदी रहा." नंतर त्याचे डोळे झोंबू लागताच त्याने ते चोळताच त्यातून सफेद पापुद्रे डोळ्यांच्या कडेतून बाहेर पडले. आणि त्याने आपल्या मुलाला पाहिले आणि रडत त्याला आपल्या मिठीत घेत म्हणाला, "हे परमेश्वरा, तू धन्य आहेस, तुझे नाव सदैव सुवंदित असो आणि तुझे सर्व दूत धन्य असोत. कारण जरी तू मला शिक्षा केलीस तरीही तू माझ्यावर दया केलीस; आता मी माझा मुलगा तोबीअस ह्याला बघू शकतो
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४६:१-२,६-१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन करा.
१) परमेश्वराचे स्तवन करा. ! हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन, मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
२ )तो सदा आपले सत्यवचन पाळतो, तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो.परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
३) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो, तो वाकलेल्यांना उभे करतो, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो.
४) परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सियोन,
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १२:३५-३७
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात हे कसे ? "
येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, "ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात हे कसे ? कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, “परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा." दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?" हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू येशू मंदिरात शिक्षण देत होता व ग्रंथपठातील वाचनाच्या शेवटी आपल्याला सांगण्यात आलेले आहे की, हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. होय जेथे प्रभूचे वचन आहे तेथे हर्ष आहे, तेथे शांती आहे. मात्र आपल्याला त्या लोकांसारखी एवढीच काळजी घ्यायला हवी की ते बोलणे आपण | शुभवर्तमानातील लोकांसारखे काळजीपूर्वक ऐकायला हवे, त्यावर चिंतन करायला हवे. परंतु तसे केले नाही तर ते वचन आपल्याला हर्ष किंवा आनंद देऊ शकत नाही. कारण असे म्हणतात की। बाहेर धो-धो पाऊस पडत असेल परंतु आपण जर त्या पावसात भांडे उपडे ठेवले तर पाण्याचा एकही थेंब त्या भांड्यात जाऊ शकणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण प्रभूचे वचन ऐकत असताना आपले हृदयरुपी भांडे जर पालथे ठेवले किंवा इतर विचारांनी ग्रस्त ठेवले तर आपल्यालाही त्या वचनाद्वारे मिळणारी शांती किंवा हर्ष लाभणार नाही. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपले कानच नाही तर काळीजही उघडे ठेवावे व त्याद्वारे आपणही प्रभूवचनाने हर्षाने भरून जावे म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, तुझी दया, करुण्या, ममता, चांगुलपणा व प्रेम ! अनुभवण्यास आम्हाला आंतरिक बळ दे, आमेन.

0 टिप्पण्या