Marathi Bible Reading | 9th Week of ordinary Time | Thursday 3rd June 2021

सामान्यकाळातील नववा सप्ताह

गुरुवार 

३जून २०२१

✝️


युगांडाचे रक्तसाक्षी
चार्ल्स ल्वांगा, जोसेफ कासा आणि त्यांचे सहकारी
(१८८६-१८८७)

अप्पर नीलच्या प्रदेशातील जमातींमध्ये १८८७ सालापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले मिशनकार्य सुरू केलेले होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातील इस्टर जागरणविधीच्या वेळी पहिले काही स्नानसंस्कार पार पडले. ह्या नवसंस्कारितांमध्ये पूर्वी इस्लाम धर्मातून प्रॉस्टेस्टंट पंथामध्ये आलेले काही स्त्री पुरुष होते. ह्या वाढत्या कॅथलिक धर्मप्रसाराला रोखून धरण्यासाठी १८८६ साली अरब व प्रॉटेस्टंट पंथातील काहींनी राजा म्वांगा ह्याला चिथावले. त्याने जोसेफ कासा आणि मारूंबा ह्या प्रमुख मिशनऱ्यांची हत्या घडवून आणली.
    आजच्या दिवशी ख्रिस्तसभा युगांडातील प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये श्रद्धेची जोपासना करणाऱ्या व त्यासाठी क्रूर अशा छळवादाला मिठी मारणाऱ्या १३ ते ३० वर्षे वयातील २२ निग्रो मुले व युवक ह्यांचा सन्मान करते. या २२ जणांपैकी १३ जणांना जिवंत जाळण्यात आले. काहींना ३ जून १८८६ मध्ये ठार करण्यात आले.

        हे २२ आफ्रिकन निग्रो इ. स. १९२० साली प्रथम धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले. ह्या २२ जणांव्यतिरिक्त ८० इतर जण ह्या छळामध्ये केले गेले. ह्या सर्व युगांडाच्या रक्तसाक्षींना २२ जून १९६४ साली पोप पॉल सहावे ह्यांनी संतपद बहाल केले. 
चिंतन : “रक्तसाक्ष्यांना साखळदड बांधण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आले, त्यांना फटके मारण्यात आले, जाळण्यात आले, त्यांना अक्षरशः कांपण्यात आले तरी त्यांची संख्या वाढतच राहिली.” - संत अगस्तीन

✝️

 'जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. 

✝️
             

पहिले वाचन : तोबीत ६:१०,७:१,९-१४:८:४-८

वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन

"सारा ही तुझी पत्नी व्हावी म्हणून परमेश्वराने तुला माझ्याकडे आणले. "

देवदूत तोबिअसला म्हणाला, "बंधू, आज आपण रागुवेलकडे राहू या. तो तुझा नातेवाईक आहे आणि त्याला एकुलती एक सारा नावाची मुलगी आहे.
जेव्हा ते रागुवेलच्या घरी एकवातना येथे आले तेव्हा सारा त्यांना भेटली आणि तिने त्यांना अभिवादन केले. त्यांनीसुद्धा तिला अभिवादन केले आणि मग साराने त्यांना घरात आणले.
दूताने रागुवेलला लग्नाची बोलणी करण्याविषयी सुचवले आणि रागुवेल तोबिअसला म्हणाला, "खा, पी आणि मजा कर. कारण माझी मुलगी घेणे हा तुझा हक्क आहे. परंतु मला खरी हकीगत तुला सांगू दे. मी माझी मुलगी सात नवऱ्यांना दिली होती, परंतु त्यांपैकी प्रत्येकजण तिच्याजवळ रात्री येताच मरून गेला. पण तू सध्या मजा कर." तोबिअस म्हणाला, "तू माझ्याशी योग्य तो करार करीपर्यंत मी इथे काही खाणार नाही." रागुवेल म्हणाला, "तिला तू नियमाप्रमाणे आताच घेऊन जा. तू तिचा नातेवाईक आहेस आणि ती तुझी आहे. आपला प्रेमळ देव तुमच्या भल्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करील." नंतर त्याने आपली मुलगी सारा हीला बोलावून तिचा हात पकडून तोबिअसला बायको म्हणून देत म्हटले की, “हिला मोशेच्या नियमाप्रमाणे बायको म्हणून घे आणि तिला तुझ्या वडिलांकडे घेऊन जा." मग त्याने त्यांना आशीर्वाद दिला. नंतर त्याने आपली बायको एदना हीला बोलावून कागदाची गुंडाळी घेऊन त्यावर करार लिहून शिक्कामोर्तब केले.
जेव्हा दरवाजा बंद होता आणि तोबिअस व सारा दोघे एकत्र होते तेव्हा तोबिअस पलंगावरून उठला आणि म्हणाला, “भगिनी ऊठ, देवाने आपणावर कृपा करावी म्हणून आपण प्रार्थना करू या." आणि तोबिअसने प्रार्थना करण्यास सुरुवात केली,
"आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा तुझे नाव धन्यवादित असो आणि तुझे पवित्र आणि गौरवयुक्त नाव सदासर्वदासुवंदित असो. स्वर्ग आणि तू निर्माण केलेले सर्व प्राणिमात्र तुला धन्यवाद देवोत. तू आदामची निर्मिती केलीस आणि त्याला एवा ही त्याची पत्नी साहाय्य आणि आधार देण्यास म्हणून दिली. त्यांच्यापासून तू मानवजात निर्माण केलीस. तू म्हटलेस, 'मनुष्य एकटा असावा हे चांगले नाही, तर त्याच्यासाठी त्यास अनुरूप सहाय्यक आपण निर्माण करू या.'
आणि आता, हे प्रभो, मी माझ्या ह्या बहिणीस कामवासनेने नाही, तर प्रामाणिकपणे जवळ घेतो. माझ्यावर अशी कृपा कर की, मला दया प्राप्त होईल आणि आम्ही दोघे एकत्र वृद्ध होऊ" आणि मग ती त्याच्याबरोबर म्हणाली, “आमेन"

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५

प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय बाळगतात ते धन्य

१) जे परमेश्वराचे भय बाळगतात आणि त्याच्याच मार्गांनी चालतात ते धन्य!

२) तू आपल्या श्रमांचे फळ खाशील. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

३) पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनेतून तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस तुला आशीर्वाद देवो!

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. 

आलेलुया!

शुभवर्तमान मार्क १२:२८-३४

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर."

शास्त्र्यांपैकी एक जण येशूकडे पुढे आला आणि त्याला विचारले, “सर्वात पहिली आज्ञा कोणती ?' येशूने उत्तर दिले, "पहिली ही की, 'हे इस्राएल, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर.' दुसरी ही की, 'जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.' ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” तो शास्त्री त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोलतात की, तो देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पणे आणि यज्ञ ह्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :प्रभू येशूला एक शास्त्री सर्वात पहिली आज्ञा कोणती असे विचारतो व त्यावर प्रभू येशू उत्तर देतो की, 'आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, बुद्धीने व शक्तीने प्रीती कर.' परंतु एवढे बोलल्यावर, म्हणजेच पहिली आज्ञा सांगून झाल्यावर प्रभू येशू तेथेच थांबत नाही तर तो लगेच स्वतःहून दुसरी व महत्वाची आज्ञाही सांगतो की, 'जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर'. म्हणजेच येशू येथे अगदी स्पष्ट करत आहे की, जो माणूस फक्त परमेश्वरावर प्रीती करतो म्हणजेच फक्त देवधर्मात गुंततो, मिस्सा प्रार्थना करतो, देवळात दानधर्म करतो परंतु तो जर आपल्या शेजाऱ्यांवर म्हणजेच इतरांवर प्रीती करत नसेल तर मग त्याच्या परमेश्वरावरील प्रीतीला अर्थ नाही. तो परमेश्वराला कदापि प्रसन्न करू शकणार नाही. म्हणजेच देवप्रीती व शेजारप्रीती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले जीवन जगत असताना आपल्याला देवप्रीती व शेजारप्रीतीमध्ये योग्य मेळ घालता यावा म्हणून प्रभूकडे बळ मागूया.

प्रार्थना: हे प्रेमळ बापा, तुझ्या प्रीतित वाढण्यास व तेच प्रेम इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या