Marathi Bible Reading | 9th Week of ordinary Time | Wednesday 2nd June 2021

  सामान्यकाळातील नववा सप्ताह 

बुधवार 

२ जून २०२१

✝️


संत मार्सेलिनस व पीटर सण
- रक्तसाक्षी (३०४)


मुलगी सारा हिची सात लग्ने  झाली होती व पहिल्याच रात्री ते सातही जण मरण पावले होते; मात्र नंतर तोबीतचा मुलगा तोबिअस ह्याच्याशी तिचा विवाह होतो. साराची पश्चातापाने केलेली कळकळीची प्रार्थना आणि तोबिअसची सात्विकता ह्यामुळेच त्यांचा  विवाह कृपापूर्ण आणि सफल होतो. देवाच्या कृपेने आणि देवाच्या योजनेप्रमाणेच जीवनातील सर्व घटना पूर्णत्वास जातात.

आजच्या शुभवर्तमानात सात जणांची पत्नी झालेल्या महिलेच्या सातही नवऱ्यांसंबंधाने सदुक्यांनी प्रभू येशूला प्रश्न केला की, 'पुनरुत्थानसमयी ती  त्यांच्या पैकी कोणाची बायको होईल ?" पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य व  पुनरुत्थान ह्या विषयी सदुकी अनभिज्ञ होते. प्रभू येशू म्हणत आहे की, ‘मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करुन घेत नाहीत किंवा देत नाहीत तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.' पुनरुत्थित प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याच्या सर्वाचे पुनरुत्थान आहे. मात्र त्या समयी ऐहिक जगातील नाते संबंध संपूष्टात आलेले असतील व सर्वजण जणू स्वर्गीय देवदूतासारखे असणार आहेत. मृत्यु हा जीवनाचा शेवट नाही तर मृत्यु नंतर नवीन जीवनाला सुरुवात होते,पुनरुत्थान हे ख्रिस्ती श्रद्धेचा मूळ पाया व आधारस्तंभ आहे. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, 'तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे'.
आज आपण देवावरील, प्रभू येशूवरील आणि पुनरुत्थानावरील आपली श्रद्धा तपासून पाहू या. प्रभू येशूने म्हटले आहे, 'पुनरुत्थान व जीवन मीच आहे,  जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल' (योहान ११:२५).

✝️

 तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. 

✝️
             

पहिले वाचन : तोबीत ३:१-११,१६-१७

वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन

 “थोर देवाच्या गौरवाच्या सान्निध्यात दोघांची प्रार्थना ऐकली गेली. "

माझ्या दुःखामध्ये मी तोबीत रडलो आणि देवाकडे क्लेशाने प्रार्थना केली की, “हे देवा, तू न्यायी आहेस. तुझी सर्व कृत्ये आणि तुझे सर्व मार्ग दयामय आणि सत्य आहेत आणि तू सदोदित सत्य आणि न्यायी निर्णय दृष्टीने पहा. माझ्या पापांबद्दल मला शिक्षा करू नकोस, माझ्या आणि माझ्या पूर्वजांकडून नकळत घडलेल्या अपराधांबद्दल आम्हाला क्षमा कर. त्यांनी तुझा आज्ञाभंग केल्यामुळे तू त्यांना लुटारू, बंदिवास आणि मृत्यू ह्यांच्या हाती सोपवलेस. ज्या राष्ट्रात तू आम्हाला पांगवलेले आहेस तेथे आम्ही अपमानित झालो आहोत आणि आता माझ्या आणि माझ्या पूर्वजांच्या पापांकरता केलेल्या दुःखदायक दंडाबद्दल तू दिलेले अनेक निर्णय सत्य आहेत. कारण आम्ही इमानदारीने चाललो नाही आणि आता तुझ्या इच्छेप्रमाणे तू माझ्याशी वर्तन कर. तू माझ्या आत्म्याला वर नेण्याची आज्ञा कर, म्हणजे मी तुझ्यापासून वेगळा होऊन मातीमोल होईन. माझ्यासाठी जिण्यावाचून मरणच चांगले आहे, कारण मी खोट्या लज्जास्पद गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि माझे अंतःकरण फार मोठ्या वेदनेने भरलेले आहे. आता अशी आज्ञा कर की, मी माझ्या सर्व विपत्तीतून सुटला जाऊन सार्वकालिक निवासस्थानी जावे; माझ्यापासून तुझा चेहरा लपवू नकोस.

त्याच दिवशी, मेदीया येथील एकबाटना येथे असे घडले की, रागुवेलची मुलगी सारा हिला तिच्या वडिलांच्या सेवकांनी दोष लावला, कारण तिच्या सात नवऱ्यांना असमोदीस या क्रूर सैतानाने, ती त्यांच्याजवळ पत्नी म्हणून नांदायला येण्यापूर्वी जिवे मारले. मग सेवक तिला म्हणाले की, “तू तुझ्या नवऱ्यांना गळे दाबून मारले हे तुला ठाऊक नाही का? तुला सात नवरे असताना त्यांपासून तुला संतती झाली नाही. तू आम्हाला का छळतेस ? जर ते मेले असतील तर त्यांच्याबरोबर जा. की ज्यामुळे तुझा पुत्र किंवा कन्या आमच्या दृष्टीस पडणार नाहीत!"ह्या गोष्टी ऐकून तिला खूप दुःख झाले आणि तिच्या मनात आत्महत्येचा विचार देखील आला. परंतु ती म्हणाली, "मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, जर मी का आत्महत्या केली तर माझ्या वडिलांची अब्रू जाईल आणि म्हातारपणात ते दु:खाने मरतील." म्हणून ती आपल्या खिडकीपाशी जाऊन प्रार्थना करू लागली की, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू धन्य आहेस, तुझ्या पवित्र आणि आदरणीय नावाला सदासर्वदा धन्यवाद असो. तुझी सर्व कृत्ये सदासर्वदा तुझा महिमा गावोत. "

थोर देवाच्या गौरवाच्या सान्निध्यात दोघांची प्रार्थना ऐकली गेली आणि राफायल देवदूतांला दोघांना बरे करण्यास पाठवण्यात आले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २५:१- ९

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो.

१) हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे, माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैच्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस. तुझी कास धरणारा कोणीही फजीत होत नाही, निष्कारण कपट करणारे फजीत होतात.

२) हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर.  तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.

३) हे प्रभो, तुझ्या चांगुलपणास्तव साच्या दिवसभर मी तुझी प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा आणि वात्सल्य आठव, ती पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातील पापे आणि माझे अपराध आठवू नकोस. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.

४) परमेश्वर उत्तम आणि सरळ आहे. तो पापी जनांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो; तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

हे परमेश्वरा, तुझ्या नियमाने चालण्यास मला शिकव, ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क  १२:१८-२७

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन१२ः१८-२७

"तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे."

पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी येशूकडे आले आणि ते त्याला विचारू लागले, “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसेल तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली आणि तो संतती न होता मेला. मग ती दुसऱ्याने केली तोही संतती न होता मेला आणि तशीच तिसऱ्याचीही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.”येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहा ना ? कारण मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगावयाचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडुपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, 'मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे ? तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे; तुमचे अगदीच चुकत आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की पुनरुत्थान नाही असे मानणारे सदूकी येशूकडे येऊन त्याला सात भाऊ आणि एक बायको ह्याविषयी प्रश्न विचारू लागले. त्यांची अशी कल्पना होती की, आता येशू पुनरुत्थानाच्या संकल्पनेविषयी गोंधळेल व मग पुनरुत्थानाची संकल्पना कशी खोटी आहे हे आपल्याला येशू व इतरांसमोर मांडता येईल. परंतु येशू त्यांना | समर्पक उत्तर देऊन पुनरुत्थानाची संकल्पना अधिकच भक्कम करतो व सदूक्यांना निरुत्तरकरतो. आपणासही हा चिंतनासाठी सुंदर मुद्दा आहे. कारण ज्यांची सदूक्यांसारखी पुनरुत्थानावरील श्रद्धा डळमळीत झाली असेल त्याला ह्या जीवनातील दुःख-कष्ट ह्यांमध्ये अर्थ वाटणार नाही व ती व्यक्ती पापाचा गुलामही बनण्यास मागेपुढे पाहणार नाही. परंतु पुनरुत्थानावर श्रद्धा असणारी व्यक्ती मात्र प्रभूच्या मार्गात चालण्यापासून कधीही ढळणार नाही. आपली पुनरुत्थानावरील श्रद्धा नेहमी अढळ रहावी म्हणून आपण नित्य सहाय्य मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे कृपा मागू या.

प्रार्थना: हे पुरुत्थित प्रभू, तुझ्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा  व सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या