Marathi Bible Reading | 9th Week of ordinary Time | Tuesday 1st June 2021

 सामान्यकाळातील नववा सप्ताह 

मंगळवार 

१ जून २०२१

✝️



संत जस्टीन  सण
- रक्तसाक्षी (१००-१६६)

“केवळ आपल्या प्रभू ख्रिस्तासाठी छळ सहन करण्याइतके काहीही महान नाही. ह्याच छळामध्ये सार्वकालिक आनंद आणि आपला आत्मविश्वास दडलेला आहे.” संत जस्टीन  


‘कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरुन द्या.' असे सांगून प्रभू येशूने दोन्ही गोष्टी स्पष्ट केल्या. रोमी नाण्यावर कैसराची प्रतिमा होती म्हणून ते कैसराला देणे रास्त आहे. तर प्रत्येक मनुष्य देवाची प्रतिमा आहे, म्हणून प्रत्येक माणसाने देवासारखे होणे गरजेचे आहे. त्यासाठी देवाचे ते देवाला द्यायचे आहे. भक्ती, आज्ञाधारकपणा, प्रीति, परस्पर स्नेह भाव हे देवाकडून आले आहे, ते देवाला देणे गरजेचे आहे. देवाला आपल्याकडून  कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे ह्यावर आज मनापासून चिंतन करु या. देवाचे ते देवाला भरुन दिल्यावर आपल्या जीवनातील सर्व गोष्टी स्थिरावतील.पैसे आपल्या जीवनातील कुटुंबाच्या गरजेसाठी महत्त्वाचे आहेत.  
 आपले जीवन जगत असताना इतरांच्या गरजा भागविण्यासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे. प्रभू आपल्याला जगातील सर्व प्रकारच्या  अडचणीत असलेल्यांना आपण सहाय्य करावे असे आवाहन करीत आहे. देवाच्या कार्याला उदार हस्ते आपण सहकार्य करावे आणि आपल्यावर सोपविलेली आपल्या बंधू भगिनींची जबाबदारी आपण देवाचे ते देवाला भरुन  देऊन पार पाडावी.
✝️

 "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या"

✝️
             

पहिले वाचन : तोबीत २:९-१४
वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन

"आंधळा झाला असतादेखील तोबीतने देवाविरुद्ध कुरकुर केली नाही."

मी, तोबीत आपल्या लोकांपैकी एकाचे मृत शरीर पुरून आलेलो असता फार थकलो होतो, म्हणून मी अंगणातील भिंतीशी टेकून झोपी गेलो. माझा चेहरा झाकलेला नव्हता. त्या भिंतीवर चिमण्या होत्या हे मला माहीत नव्हते. त्यांची ताजी विष्ठा माझ्या उघड्या डोळ्यांत पडली आणि सफेद पडदा माझ्या डोळ्यांवर आला. मी वैद्यांकडे गेलो, परंतु त्यांनी कोणताच उपचार केला नाही. अहेकारने एलेमास जाईपर्यंत माझी काळजी घेतली.
नंतर माझी बायको अन्ना नोकरी करू लागली. ती सर्व उत्पन्न आपल्या मालकाला पाठवत असे. एकदा त्यांनी एका लहानशा पिल्लासहित तिची मजुरी दिली असता, तिने ते पिल्लू माझ्याकडे आणले, ते आवाज करू लागले. मी म्हणालो, “तू हे पिल्लू कुठून आणले? हे चोरून तर आणले नाही ना ? ते त्याच्या मालकाला नेऊन दे. कारण जे चोरीचे असते ते खाण्यास योग्य नसते” आणि ती म्हणाली, " हे मला माझ्या मालकाने मजुरीसह बक्षीसादाखल दिलेले आहे.” पण मी तिच्यावर विश्वास न ठेवता तिला ते मालकाला परत करण्यास सांगितले आणि मी तिच्यावर गरम झालो. तेव्हा तिने मला उत्तर दिले, “तुझे परोपकार आणि धार्मिक कृत्ये कुठे आहेत? जसे काय तुला सगळेच माहीत आहे!”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२, ७- ९

प्रतिसाद : ज्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवते तो अढळ राहतो.

१ ) परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. 

२) तो वाईट बातमीला भिणार नाही, त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.

३) त्याने सढळ हाताने गरिबांस दान दिले आहे. त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुझ्या आदेशांचे मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क  १२:१३-१७

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.

प्रमुख याजक, शास्त्री आणि वडीलजन ह्यांनी येशूला बोलण्यात धरण्याकरता परुशी आणि हेरोदी ह्यांतील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुजी, आपण खरे आहा आणि कोणाची भीडमुर्वत धरत नाही, आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हाला ठाऊक आहे. कैसरला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की देऊ नये?" पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या." त्यांनी ते आणले तेव्हा त्याने त्यांना विचारले, "हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा ?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.” येशू त्यांना म्हणाला, "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या." तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :माणसामध्ये एकदा का द्वेष-मत्सर शिरला की, त्याला पुढील व्यक्तीमध्ये चांगले दिसायचे राहते. आणि मग त्या व्यक्तीला कचाट्यात पकडण्याचाच प्रयत्न सुरू होतो. आजच्या शुभवर्तमानातही आपल्याला असेच काहीसे चित्र दिसते. प्रभू येशू चांगले तेच करत होता, इतरांच्या जीवनात आनंद फुलवत होता, इतरांना नवजीवनाचे दान देत होता तरीही शास्त्री व वडीलजनांना त्याच्यात काहीच चांगले आढळत नव्हते. येशूची कीर्ती त्यांच्या डोळ्यांत सलत होती व त्याचे कारण म्हणजे द्वेष मत्सरांनी त्यांची मती भ्रष्ट झाली होती. परंतु तरीही येशू न घाबरता किंवा न डगमगता व त्यांच्या कचाट्यात न सापडता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवतो. त्याला कचाट्यात पकडू इच्छिणाऱ्यांना तो स्वतःच कचाट्यात पकडतो. आपणही आपले जीवन जगत असताना येशूसारखे सत्याने व धैर्याने जीवनाला सामोरे जावे व त्याद्वारे अन्यायाला सदैव विरोध करावा म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, माझे जीवन मी तुला समर्पित करतो, माझ्याद्वारे तुझी, सेवा करायास मला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या