Marathi Bible Reading | Visitation of the Blessed Virgin Mary | Mondat 31st May 2021

   कुमारी मरियेची एलिझाबेथशी भेट

सोमवार 

३१ मे २०२१

✝️



कुमारी मरियेची एलिझाबेथशी भेट सण

ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरियेने तिची मावस बहिण अलीशीबा हिला दिलेल्या स्नेह भेटीची आठवण करुन सन्मान करीत आहोत. अलीशीबा म्हातारपणी गर्भवती झाली होती. तिला प्रेम, आस्था व धीर देऊन मरियेने तिचा  आदर सन्मान केला. विशेषत: अशा कठीण प्रसंगी मरिया त्याच वेळी पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झाली असताना सुद्धा ती गरजवंतांसाठी पुढे सरसावली. ख्रिस्ती जीवनाचा खरा आदर्श पवित्र मरियेच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा  देणारा आहे. मरिया अलीशीबेची स्नेहभेट म्हणजे प्रभू परमेश्वराच्या स्नेहभेटीचाच प्रसंग आहे. मरियेच्या अभिवादनाची केवळ वाणी ऐकताच  अलीशीबेच्या उदरातील बाळकाने आनंदाने उडी मारली. पवित्र मरियेच्या सहवासाने अलीशीबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. अलीशीबेच्या मुखातून  शब्द बाहेर पडेल, 'स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. '

पवित्र मरिया खरोखरच परमेश्वराची निवडलेली धन्य माता असून खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा महान आदर्श आहे. पवित्र मरियेच्या परस्पर प्रेमाचे  आणि सेवेचे उदाहरण आपल्या समोर आहे. तिच्या पवित्र गुणांचे अनुकरण करुन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पवित्र मरियेकडे मध्यस्थी करु या. 
✝️

 "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?

✝️
             

पहिले वाचन : सफन्या ३ : १४-१८

वाचक : सफन्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"इस्त्राएलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे."

सीयोन कन्ये, उच्च स्वराने गा, हे इस्राएल, जयजयकार कर. यरुशलेम कन्ये, मन:पूर्वक उल्हास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्राएलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी येरुशलेमला म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस. तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव, सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे. तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील. त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो मेळ्याच्या दिवसाप्रमाणे गाईल.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र यशया १२ : २-६

प्रतिसाद : इस्राएलचा पवित्र प्रभू थोर आहे.

१.) पाहा, देव माझे तारण आहे, मी विश्वास ठेवतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे, तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.

२.)परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा. त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा.

३. )परमेश्वरापुढे गायन करा. कारण त्याची करणी प्रतापमय आहे, हे साऱ्या जगभर जाहीर होवो. अहो सियोननिवासी लोकहो, जयघोष करा, गजर करा, कारण इस्राएलचा पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

जिने विश्वास ठेवला ती कुमारी मरिया धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १:  ३९-५६

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

‘‘माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?"

डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावात मरिया त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. अलीशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठयाने बोलली, "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
तेव्हा मरिया म्हणाली : “माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. आणि त्याचे नाव पवित्र आहे .
जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेतत्यांची त्याने दाणादाण केली आहे,
त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंच केले आहे, त्याने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे.”
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :पवित्र मरिया खडतर प्रवास करून अलिशिबेला भेटायला जाते. निकटचे नाते असलेल्या दोन स्त्रिया त्यांच्या जीवनात घडलेल्या अद्भुत चमत्काराचा आनंद एकमेकींसोबत वाटत आहेत. दोघीही गर्भवती आहेत. दोघींच्याही जीवनात देवाने महान कार्य केले आहे. मरिया घाईघाईने एलिझाबेथकडे येते. गाब्रियेल देवदूताने मरियेला दिलेल्या सुवार्तेत दोन शुभवार्ता होत्या. पहिली शुभवार्ता ही प्रभूजन्माची होती, म्हणजेच कुमारी मरिया देवाची आई होणार होती. दुसरी शुभवार्ता ही तिच्याच नात्यातली अलिशिबा गरोदर राहणार आहे. यापैकी पहिली शुभवार्ता तुलनेने मोठी होती. असे असूनही पवित्र मरियेने एलिझाबेथसाठी अत्यंत नम्रपणे दुसरी शुभवार्ता मोठी मानली. पहिली शुभवार्ता इतरांना सांगण्याची अधिरता मरियेमध्ये निर्माण झाली नाही. तर दुसऱ्या शुभवार्तेचे गांभीर्य ओळखून ती थेट अलिशिबेकडे धावत गेली. अलिशिबा ही वयस्कर झाली होती. या वयात देवाने तिच्याबाबत चमत्कार केला होता. ती गरोदर राहिली होती. तिचा नवरा मुका झाला होता. मरिया स्वतःला विसरली आणि तीन महिने अलिशिबेकडे राहून तिची सेवा केली. माझ्यापेक्षा दुसऱ्याची गरज मोठी आहे ही संवेदनक्षमता जो जोपासतो तो खरी सेवा करू शकतो. हेच पवित्र मरिया आपणांस दाखवून देत आहे.


प्रार्थना: हे पवित्र मरिये, तुला अनुसरण्यास व खरे सेवाभावी जीवन जगून  ख्रिस्ताची साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा लाभावी म्हणून आम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी विनंती कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या