Marathi Bible Reading | The Most Holy Trinity | Sunday 30th May 2021

    

पवित्र त्रैक्याचा सण

रविवार 

३० मे २०२१

✝️


परमेश्वर देव एकच अविभाज्य असा देव आहे, परंतु त्याचे - प्रकटीकरण तीन वेगवेगळ्याप्रकारे झाले आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा अशा  प्रकारे आपण देवाला संबोधतो. ह्या अतिपवित्र त्रैक्याचा आपण आज सोहळा  साजरा करीत आहोत. देवाला आपण त्याचा चांगुलपणा, प्रीति, कृपा, दया, सहनशीलता, पवित्रता, नीतिमत्व, सत्य, विश्वासुपणा अशा विविध  गुणलक्षणांद्वारे जाणतो. पवित्र वैक्यासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे जरी उल्लेख नसला तरी त्याचा पाया पवित्र शास्त्रात आहे.

'हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. अशी स्वर्गीय वाणी प्रभू येशूच्या  बाप्तिस्म्याचे वेळी झाली आणि त्याचवेळी पवित्र आत्मा कबुतरासारखा  त्याच्यावर उतरला' (मत्तय ३:१३-१७). आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू  म्हणतो, 'सर्व लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र  आत्म्याच्या नावाने स्नानसंसकार द्या'. संत पौल करिथ येथील मंडळीला  म्हणतो, 'प्रभूयेशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची  सहभागिता तुम्हांसर्वासह असो'  (२ करिंथ १३:१४).प्रेमळ पित्याने सर्वकाही निर्माण केले, आपल्या प्रिय पुत्राद्वारे त्याने जगाचे तारण केले व पवित्रीकरणाचे सेवाकार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याला  या जगात पाठविले. तोच पवित्र आत्मा आज निरनिराळ्या प्रकारे देवाचे राज्य या जगात यावे म्हणून कार्यरत आहे. आपल्या जीवनातील पवित्र त्रैक्याचे महत्व जाणून घेवून आपले जीवन पवित्र त्रैक्याला समर्पित करू या. 

✝️

 “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.

✝️
             

पहिले वाचन : अनुवाद  ४:३२-३४.३९-४०

वाचक : अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही."

मोशे लोकांना म्हणाला, “देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुमच्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत विचारून पाहा. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने इजिप्त देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युध्दे, पराक्रमी हात आणि उगारलेला बाहू ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय? म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. तुमचे आणि तुमच्यामागून तुमच्या वंशजांचे बरे व्हावे आणि तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला निरंतरचा देत आहे त्यात तुम्ही चिरकाळ राहावे म्हणून आज मी तुम्हांला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन करा.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३३:४,६, ९, १८ १९,२०,२२

प्रतिसाद : परमेश्वराने निवडलेली प्रजा धन्य.

१) परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

२) परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.

३) पाहा, जे परमेश्वराने भय धरतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.

४) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो.


दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:१४-१७

वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"आपण 'अब्बा, बापा', अशी हाक मारावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे."

जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण “अब्बा, बापा,” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो आणि जर मुले तर वारसही आहो, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहो, आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो.

आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय २८:१६-२०

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नामाने स्नानसंस्कार द्या."

अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी काही शिष्यांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्नानसंस्कार द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिव तुमच्याबरोबर आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :"जुना करार हा देवपित्याचा काळ, नवा करार हा देवपुत्राचा काळ तर आधुनिक काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे' असे संत ग्रेगरी महान आपल्याला शिकवितात. मात्र असे असले तरी विश्वाच्या निर्मितीसमयी पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. येशूच्या देहधारणसमयी तो पवित्र मरियेच्या जीवनात कार्यरत होता. ह्याचाच अर्थ पवित्र त्रैक्य अगदी विश्वाच्या प्रारंभापासून एकत्रितपणे कार्यरत आहे. हेच त्रैक्य आपल्याही जीवनात कार्यरत असते. 
१) परमेश्वर आपला पिता आहे : पहिल्या वाचनात हाच पिता आपल्याला त्याच्या आज्ञा देऊन त्यानुसार जीवन जगण्यास मार्गदर्शन करीत असतो. पिता या नात्याने तो आपली निर्मिती करतो, आपल्याला सांभाळतो, शत्रूच्या तावडीतून सोडवितो आणि आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. 
२) प्रभू येशू आपला तारणारा आहे : येशूच्या जन्माच्यावेळी 'तुमच्यासाठी तारणारा जन्माला आला आहे' अशी सुवार्ता देवदूताने मेंढपाळांना दिली. आता हीच सुवार्ता संपूर्ण जगात जाऊन आपल्या शिष्यांनी सांगावी व त्यांना पवित्र त्रैक्याच्या नावात बाप्तिस्मा घेतील त्यांचे तारण होईल अशी शाश्वतीही तो त्यांना देतो. 
३) पवित्र आत्मा आपला सोबती आहे : याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण परमेश्वराला 'अब्बा, बापा' अशी हाक मारू शकतो व येशू हा ख्रिस्त आहे अशी कबुली देऊ शकतो. आपण परमेश्वर पित्याची लेकरे आहोत आणि ख्रिस्तासह त्याचे वारीस आहोत हा नातेसंबंध जोपासण्यास पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. 
४) पवित्र त्रैक्य वेगळेपणा व समानता ह्यांचे प्रतीक : पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय व अप्रतिम आहे. मात्र असे असूनही त्यांच्यात ऐक्य व समानता आहे. हे तत्त्व मानवी जीवनालाही लागू पडते. प्रत्येक मनुष्य अद्वितीय आहे तरीही सर्व माणसे समान प्रतिष्ठेची आहेत. त्यांच्यातील विविधता ऐक्याच्या आड येत नाही.

आत्मपरीक्षण: पवित्र त्रैक्यातील कोणती व्यक्ती मला अतिशय जवळची वाटते? माझे वेगळेपण जोपासताना मला इतरांशी समानतेच्या व ऐक्याच्या भावनेतून वागणे शक्य होते का? त्यात कोणकोणत्या अडचणी आहेत ?


प्रार्थना: हे प्रभो परमेश्वर, तुझे सामर्थ्य, तुझी कृपा व तुझे प्रेम हे अनाकलनीय आहे. आम्ही तुला शरण आलो आहोत, आमचा स्वीकार कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या