सामान्य काळातील 

सतरावा  रविवार 

२५ जुलै २०२१

“प्रभू येशूचे पाच हजारांना जेवण. "


संत जेम्सचा  सण (थोरला याकोब )

प्रेषित व रक्तसाक्षी 


 अलीशाद्वारे देवाने केलेल्या चमत्काराचे  वर्णन आहे. जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची काही कणसे ह्यांच्या साहाय्याने अलीशाने शेकडो लोकांची भूक भागविली. परमेश्वर सर्वांच्या गरजा  जाणतो आणि त्याच्या योजने प्रमाणे सर्वांसाठी सर्व गोष्टींचा पुरवठा करीत असतो.
प्रभू येशूने केलेल्या जवाच्या पाच भाकरी व दोन मासोळ्यांच्या चमत्कार कथन करण्यात आला आहे. लोकांचा मोठा  जनसमुदाय प्रभू येशूच्या मागे आला होता. प्रभूने त्याच्या सामर्थ्याने आणि  स्पर्शाने अनेकांना आरोग्यदान व मुक्ती दिली होती. शब्दाने आणि देवाच्या  वचनाने अनेकांना मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचे वरदान दिले होते. 
 पाच हजारांपेक्षा मोठा जनसमुदाय भोजन घेऊन तृप्त झाला प्रभू येशू अन्नदाता, जीवनदाता, आरोग्यदाता व मुक्तीदाता आहे हे  सर्वांनी अनुभवले. लोकांच्या विश्वासामुळे व येशू बरोबरच्या सहवासामुळे  त्यांना कृपा मिळाली.
समाजात आज सुद्धा अनेक माणसे भूकेने व्याकूळ आहेत. अनेकांना  शारीरिक व मानसिक आजार आहेत. अनेकजण ऐहिक सुखासाठी अनेक| प्रकारच्या बंधनात अडकलेले आहेत त्यांना प्रभू बोलावित आहे. 
✝️             

पहिले वाचन : २ राजांच्या ४:४२-४४

वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन  

"त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.”

बआल-शालीशा येथला कोणी मनुष्य आपल्या उपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलिशा त्याला म्हणाला, "या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे." त्याचा सेवक म्हणाला, "काय ? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ ?" तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे, त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, 'त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.' तेव्हा त्याने ते लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १४५:१०-११,१५-१८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पूरी करतोस.

१) हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात 
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
 ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि
 तुझा पराक्रम कथन करतात.

२) सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात, 
आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.
 तू आपली मूठ उघडून प्राणिमात्रांची इच्छा पूरी करतोस.

३) परमेश्वरा आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे,
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे, 
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात, 
त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


दुसरे वाचन पौलचे इफिसकरांस पत्र  ४:१-६

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"शरीर एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नानसंस्कारही एकच."

जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्माही एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वाच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.

हा प्रभूचा शब्द आहे

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; 
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.

 आलेलुया!

शुभवर्तमान योहान  ६:१-१५

वाचक: योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "येशूने बसलेल्यांना पाहिजे तितके दिले. "

येशू गालिली म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग आला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलीपला म्हणाला, “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या ?" हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले; कारण आपण काय करणार आहो, हे त्याला ठाऊक होते. फिलीप्पने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील प्रत्येकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत ?” त्याच्या शिष्यांपैकी एकजण म्हणजे शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, "येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा." त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”मग ते येऊन आपल्याला राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजच्या उपासनेतील वाचने परमेश्वराचे आपल्या लोकांवर जे आपार प्रेम आहे. त्या प्रेमाच्या अगाध सामर्थ्यावर चिंतन करण्यासाठी आपल्याला पाचारण करतात. पहिले वाचन आणि शुभवर्तमान यामध्ये नमूद करण्यात आलेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे ही परमेश्वराच्या प्रेमाचे सामर्थ्य प्रकट करतात. तर दुसरे वाचन आपण ह्या प्रेमाला कसा प्रतिसाद द्यावा त्याविषयी मार्गदर्शन करतात. 
१) परमेश्वर आपल्या जीवनातील कठीण प्रसंगी त्याचे सामर्थ्य प्रकट करतो: संदेष्टा अलिशा आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी केलेले भाकरींचे चमत्कार ऐन अडीअडचणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केलेले आढळतात. 
२) परमेश्वर साध्यासुध्या मार्गांनी त्याचे असामान्य सामर्थ्य प्रकट करतोः दोन्ही चमत्कारांत वापरण्यात आलेल्या भाकरी ह्या जवाच्या होत्या. श्रीमंत लोक गव्हाच्या भाकरी खात तर जवाच्या भाकरी हे गरीब व सर्वसामान्य लोकांचे अन्न होते. अलिशा व येशू त्यांचा वापर करून असंख्य लोकांना तृप्त करतात. 
३) परमेश्वराचे सामर्थ्य अगाध आहे आणि त्याचे प्रेम अमर्याद आहे: मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे जेवण झाल्यानंतर भाकरींचे कितीतरी तुकडे उरले. परमेश्वर अगदी तोलून मोलून मानवावर प्रेम करीत नाही. आपल्या अगाध सामर्थ्याने तो मानवावर प्रेमाची उधळण करीत असतो. 
४) हा अनुभव घेऊन आपणही आपल्या शेजाऱ्यांवर बिनशर्त प्रेम करायला हवे : इफिसच्या लोकांना त्याविषयी मार्गदर्शन करताना संत पौल म्हणतो, 'पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. 
५) असा अनुभव ख्रिस्ती लोकांमध्ये ऐक्य घडवून आणतो: शरीर एकच (ख्रिस्तसभा) आत्मा एकच (प्रेरणा), प्रभू एकच (श्रद्धा), बाप्तिस्मा एकच (प्रवास), पिता एकच (उगम) अशा शब्दांत संत पौल ख्रिस्ती लोकांच्या ऐक्याचे स्वप्न रंगवितो. आत्मपरीक्षण : परमेश्वराच्या सामर्थ्याचा व त्याच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला कुठे व कसा आलेला आहे ? त्या प्रेमाला व सामर्थ्याला आपण कसा कसा प्रतिसाद देतो ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझ्या आध्यात्मिक भोजनाची ओढ आम्हाला लागू दे, आमचे जीवन तुझ्या तारणदायी कृपेने भरुन टाक, आमेन.