Marathi Bible Reading | Saturday 24th July 2021| 16th week in Ordinary Time

    सामान्य काळातील 

सोळावा सप्ताह 

शनिवार   

२४ जुलै २०२१

संत फ्रान्सिस सोलानोचा सण 

- वर्तनसाक्षी (१५४९-१६१०)

"गहू आणि निंदण दोन्हीची वाढ होऊ द्या.

 देव विश्वसनीय आहे आणि तो त्याच्या निवडलेल्या लोकांवर सर्वदा प्रेम करतो, हा आजच्या पहिल्या वाचनाचा आशय आहे.
 प्रभू येशू ख्रिस्त निंदणाचा दृष्टांत देऊन त्याच्या  आज्ञांचे व मार्गदर्शक तत्वांचे महत्व पटवून देत आहे. प्रभू येशू म्हणतो, 'गहू आणि निंदण दोन्हीचा वाढ होऊ द्या'. चांगल्याबरोबर वाईटाची वाढ होऊ देणे आपल्याला योग्य वाटत नाही. मात्र प्रभूचे वचन सत्य आणि परिपूर्ण आहे. दोन्हींची वाढ झाल्यावर कोणता निर्णय घ्यायचा हे आपल्यापेक्षा प्रभूला जास्त ठावूक आहे. गव्हांपासून निंदण कसे वेगळ करायचे ते आणि प्रभूवर सोपवून द्यायचे.
आपल्या जीवनात  एखादी अघटित घटना घडत असताना योग्य तो निर्णय घेऊन कृती करणे खूप कठीण बनते. बऱ्याचवेळा आपला निर्णय चुकतो मात्र प्रभू परमेश्वर कधीच चुकत नाही. अशावेळी आपण सर्वस्वी प्रभूला शरण जाऊन सर्व काही परमेश्वरावर सोपवून देणेच योग्य आहे. आपल्याला काय हवे व कोणती गरज आहे हे परमेश्वराला ठावूक असते. आपले विचार, निर्णय आपली कृती सर्वकाहीं परमेश्वरावर सोपवू या. देवाच्या आज्ञेला आणि वचनांना प्राध्यान्य देऊ या.
✝️             

पहिले वाचन : निर्गम २४:३-८
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन

“पहा, परमेश्वराने तुम्हांशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय."

मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले, "जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू" मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभारले. त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले; ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगित आहे ते सर्व आम्ही करू आणि त्यांच्या आज्ञेत राहू.” नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, "पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ५० : १-२,५-६,१४-१५
प्रतिसाद : देवाला आभाररूपी यज्ञ कर.

१) देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, 
त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
 पृथ्वीला हाक मारली आहे.
 सौंदर्याचा केवळ कळस असा 
जो सियोन डोंगर त्यावरून देव प्रकाशला आहे.

२) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, 
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा. 
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; 
देव स्वतः न्याय करणारा आहे.

३) “देवाला आभाररूपी यज्ञ कर,
 परात्परापुढे आपले नवस फेड. 
संकटसमयी माझा धावा कर. 
मी तुला मुक्त करीन आणि 
तू माझा गौरव करशील.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बाळकांना प्रकट केल्या.
 आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १३:२४-३० 

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या."

येशूने लोकसमुदायापुढे दुसरा एक दाखला मांडला; “कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तेव्हा निंदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासानी येऊन त्याला म्हटले, 'महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निंदण कोठून आले?' तो त्यांना म्हणाला, 'हे काम कोण्या वैऱ्यांचे आहे.' दासांनी त्याला म्हटले, 'तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?' तो म्हणाला, 'नाही; तुम्ही निंदण गोळा करताना कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेला मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, आणि गहू माझ्या कोठारात साठवा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :जगात सर्वत्र वाईटाचा वाढत असलेला पगडा पाहून सतत जे लोक गोंधळून जात आहेत त्यांना येशू आजच्या शुभवर्तमानात योग्य उपदेश देत आहेत. चांगले आणि वाईट हे जगाच्या अंतापर्यंत एकत्र असणार आहे. प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले आणि वाईट दोन्ही एकत्र वास करीत असते. देव लोकांचा आदर करतो, त्याला माहीत आहे चांगल्या भावनेपेक्षा मोह जास्त प्रबळ असतो. म्हणून आपण नेहमी चांगले ते अंगिकारले पाहिजे. तो सांगतो की चांगले कोण आणि वाईट कोण हे सर्व शेवटीच ठरविले जाईल. तोपर्यंत आपण कोणालाही 'चांगले' किंवा 'वाईट' असा शिक्का मारू नये असे देव सांगत आहे.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, सर्वस्वी तुजवर अवलंबून राहण्यास व तुझी वचने । आचरणात आणण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दें, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या