पहिले वाचन : निर्गम २०:१-१७
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मोशेद्वारे नियमशास्त्र प्रकट करण्यात आले. "
देव हे सर्व शब्द बोलला: “ज्याने तुला इजिप्त देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.”
" आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस, किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान् देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो."
“तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
“शब्बाथ दिवसाची आठवन ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे आणि तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांनीही करू नये; कारण सहा दिवसांत • परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून • परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला." आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील."
“खून करू नकोस. व्यभिचार करू नकोस. चोरी करू नकोस. आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस."
"आपल्या शेजाऱ्यांच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १८ : ९-११
प्रतिसाद : प्रभो, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे,
ते मनाचे पुनरुज्जीवन करते.
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
तो साध्याभोळ्यांना शहाणपण देतो.
२) परमेश्वराचे नियम सरळ आहेत,
ते हृदयाला आनंदित करतात.
परमेश्वराची आज्ञा चोख आहे,
ती नेत्रांना प्रकाश देते.
३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
ते सर्वथैव न्याय्य आहेत.
४ )ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या
राशीपेक्षा इष्ट आहेत;
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या
मधापेक्षा गोड आहेत.
आलेलुया, आलेलुया !
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल
शुभवर्तमान मत्तय १३:१८-२३
वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो आणि ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो; परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :पहिल्या वाचनात आपण देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांविषयी ऐकतो. दहा आज्ञा हा देव आणि मानव ह्यामधील करार आहे. हा देवाचे आपणावरील अपार प्रेमाचे चिन्ह आहे. ह्यामार्फत देव आपणास सांगतो, 'मी तुमचा देव व तुम्ही माझी प्रजा आहात.' दहा आज्ञा ह्या इतर सामाजिक कायद्याप्रमाणे नाहीत. ह्या आज्ञांना आपण कायदे म्हणू शकत नाही. तर प्रेमळ परमेश्वराच्या सानिध्यात जीवन कसे जगावे ह्या विषयी दिलेल्या सूचना आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर दहा आज्ञा हा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. ह्या आज्ञा परमेश्वर आपणा प्रत्येकास वैयक्तिकरित्या सांगत आहे. दहा आज्ञांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे ? मी त्यांचा स्वीकार परमेश्वराचा मार्ग असा करतो की त्याने लादलेले ओझे अश्या नजरेने मी दहा आज्ञांकडे पाहातो ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, आमचे सर्वस्व आम्ही तुला समर्पित करतो. तुझ्या वचनात आम्ही सतत वृद्धिगंत व्हावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या