सामान्य काळातील
सोळावा सप्ताह
गुरुवार
२२ जुलै २०२१
संत मेरी माग्दालेनचा सण
पश्चात्तापी (८४)
गालील समुद्राच्या किनारी तिबिर्याच्या जवळ माग्दाला नावाचे गाव वसलेले होते. त्या गावाच्या नावावरून मरिया हिला माग्दालेन हे आडनाव मिळाले असावे. प्राचीन ख्रिस्त सभेतील एका रूढ परंपरेनुसार पापी स्त्री-मरिया ही बेथानी येथल्या लाझरस व मार्थाची बहीण मरिया किंवा मरिया माग्दालिया असावी असे मानले जाते. ह्याच मरियेमधून आपल्या प्रभू येशूने सात भूते (सात भयानक पापप्रवृती किंवा सर्व प्रकारच्या विकृती) काढलेली होती. ह्या पापी स्त्रीने येशूला तैलाभ्यंग केला होता.
नव्या करारातील शुभवर्तमानात मरिया माग्दालिया म्हणजे नक्की कोणती स्त्री ह्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे पौर्वात्य ख्रिस्तसभेत तीन वेगवेगळ्या मरिया नामक स्त्रियांचा सन्मान केला जातो. मरिया माग्दालिया, बेथानीची मरिया आणि पापी स्त्री- मरिया. संत योहान लिखित शुभवर्तमानानुसार येशूच्या चरणांना तैलाभिषेक करणारी पापी स्त्री ही मार्थाची बहीण, बेथानी येथली मरिया असावी. एकदा येशू तिच्या घरी आलेला असताना मार्था बऱ्याच गोष्टींविषयी दगदग व काळजी करीत होती. परंतु मरिया मात्र प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे म्हणणे ऐकत होती.
मरिया माग्दालिया ही प्रभू येशूच्या क्रुसाजवळ उभी राहिली होती. तिने येशूचे दु:खसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. येशूच्या पुनरुत्थानाची ती प्रथम साक्षीदार होती. कॅथलिक ख्रिस्तसभेने तिला चिंतनशील स्त्रियांचा आदर्श म्हणून गौरविलेले आहे. संत मेरी माग्दालेन एफसस येथे मरण पावली असावी. मात्र एका प्राचीन दंतकथेनुसार मार्था, मरिया व लाझरस ह्या तिघांनी फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात सुवार्ताप्रसार केला असे मानले जाते.
मरिया मग्दालेनाचा आदर्श समोर ठेवून आपण मोठ्या श्रद्धेने व आशेने अंत:करणापासून येशूचा शोध घेऊ या. पुनरुत्थित प्रभूच्या दर्शनासाठी आपण ख्रिस्त मंदिरातील उपासनेत सहभागी होऊ या.
पहिले वाचन : २ करिंथ ५ :१४-१७
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही."
ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्टया ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे...
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६३ : २-९
प्रतिसाद : प्रभो, माझ्या देवा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.
१) हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क रुक्ष आणि निर्मल प्रदेशात
जीवन तुझ्यासाठी तहानलेले आहे,
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
२) अशा प्रकारे तुझे बळ आणि वैभव पाहण्यास
पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुझे स्तवन करतील.
३) मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद देईन,
तुझ्या नामाने मी आपले हात उभारीन.
मज्जेने आणि मेदाने व्हावा तसा माझा
जीव तृप्त होईल आणि माझे मुख
हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
४) कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस,
म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.
मी तुझी कास धरली आहे,
तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो.
आलेलुया, आलेलुया !
मरिया आम्हांस सांग, तू वाटेत काय पाहिलेस ?
तू जिवंताला बंदिस्त करणारे थडगे
आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचे वैभव मी पाहिले,
शुभवर्तमान योहान २०: १-२,११-१८
वाचक: योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?"
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया माग्दालेना कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, "त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस ?" ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, "बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस ?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरिये.” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी !" (म्हणजे गुरुजी) येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो." मरिया माग्दालेना गेली आणि “आपण प्रभूला पाहिल्याचे" व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांस कळवले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आज आपण जिच्यामधून येशूने सात भुते काढली होती त्या मारिया माग्दालेनाचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. येशूने तिला बरे केल्यानंतर ती येशूची शिष्या झाली, जिथे जिथे तो गेला तिथे ती त्याच्याबरोबर गेली. अगदी येशूच्या मरणापर्यंत ती त्याच्याबरोबर राहिली इतकेच नव्हे तर पुनरुत्थित येशूचे दर्शन प्रथम तिला घडते. तिच्या जीवनाला येशूने स्पर्श केल्यानंतर तिचे पूर्णतः नूतनीकरण झाले. संत पॉल आपणांस सांगतो की, ख्रिस्ताठायी असलेले प्रत्येक जण नवीन उत्पत्ती आहे. म्हणून आपणसुद्धा आपले वैचारिक नूतनीकरण करणे गरजेचे आहे. वैचारिक नूतनीकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टी अंगीकारणे गरजेचे आहे ह्यावर मनन करू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुला शोधण्यास व जाणण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमचे जीवन परिवर्तन कर, आमेन.
0 टिप्पण्या