सामान्य काळातील
सोळावा सप्ताह
बुधवार
२१ जुलै २०२१
ब्रिन्डीसीचे संत लॉरेन्स
• वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित (१५५९-१६१९)
“काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट,.... असे पीक आले.
देवाने इस्त्राएल जनतेची फारोच्या गुलामगीरीतून मोशे व अहरोनच्या सहाय्याने सुटका केली, मात्र इस्त्राएली जनता अन्नासाठी कुरकुर करु लागली असता देवाने त्यांना आकाशातून मान्ना पाठवून त्यांची भूक भागवली. देवाची मानवासाठी केलेली प्रत्येक योजना देव काळजीपूर्वक अमलात आणतो. देव सर्व आपत्तीत माणसांचे रक्षण करतो व त्यांच्या सर्व गरजा पुरवतो, ह्याचा वृतांत आजच्या पहिल्या वाचनात देण्यात आला आहे.
शरीराच्या पोषणासाठी देव अन्नाचा पुरवठा करीत असतो. तसाच देव आपल्या आध्यात्मिक पोषणासाठी त्याच्या वचनांची पेरणी करीत असतो. तारणाच्या इतिहासात देवाने त्याच्या वचनाद्वारे जनतेचे तारण केले. आपल्या पवित्र शास्त्रातील वचने स्वर्गामध्ये निरंतर स्थिर आहेत (स्तोत्र) ११९:८९) देवाची वचने जिभेला मधूर आणि मधापेक्षा गोड लागतात (स्तोत्र | ११९:१०३) देवाची वचने आपल्या मार्गावर प्रकाशासारखी आहेत. (स्तोत्र) ११९:१०५). देवाची वचने सत्य आहेत (स्तोत्र ११९:१६०). पेरणाऱ्याचा दाखला देऊन प्रभू येशूने देवाच्या वचनाची वाढ आपल्यामध्ये करण्यासाठी आज आवाहन केलेले आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक, असलेले पोषक अन्न प्रभू आपल्याला देत आहे. आपण नियमशास्त्र आणि पवित्र बायबल समजून आज प्रभू वचनांवर विशेष रितीने चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन : निर्गम १६:१-५,९-१५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी आकाशातून अन्नवृष्टी करीन."
एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय इजिप्त देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सिनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन ह्यांच्यासबंधांने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही इजिप्त देशात मांसाच्या भांड्यांभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर चालले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मरावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे."
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, "पाहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवतील ते ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे.”
मोशे अहरोनला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळींना सांग की, 'तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.' " अहरोन इस्त्राएलच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तो ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, "इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की, "संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल."
संध्याकाळी असे झाले की, लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यांसारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्राएल लोक हे पाहून एकमेकांना म्हणाले, "हे काय ?" कारण हे काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७८ : १८-१९,२३-२८
प्रतिसाद : परमेश्वराने त्यांना स्वर्गातले धान्य दिले.
१) त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली. ते देवाविरूद्ध बोलले. ते म्हणाले,
“रानात भोजनाची सिद्धता करायला देव समर्थ आहे काय ?"
२) तरी त्याने वरती आभाळाला आज्ञा केली आणि आकाशदारे उघडली. खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले.
३) दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली.पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले. त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहविला आणि आपल्या सामर्थ्याने 'दक्षिणेचा वारा आणला.
४) त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू आपल्या वचनाला जागतो,
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १३:१-९
वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याचे शतपटीने पीक आले. "
येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज आपण पेरणाऱ्याच्या दाखल्यावर मनन करू या. देवशब्द आपणा सर्वांस सारखाच प्रकट केला जातो. ह्या देव वचनाचा वापर आपण कसा करणार हे सर्व आपणा प्रत्येकावर अवलंबून असते. हे स्पष्ट करण्यासाठी येशू वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत पडलेल्या बियाण्याचे उदाहरण देतो. देवाचे वचन हे उत्तम बियाण्यांप्रमाणे आहे जिथे बियाणे पडले आहे ती जमीन (आपले मन) जर योग्य नसेल तर आपण कितीही देवशब्द ऐकला तरी त्याचा चांगला परिणाम आपल्यावर दिसून येणार नाही. आपण (आपले मन) कोणत्या प्रकारच्या जमिनीत येतो यावर विचार करूया. देवाचा शब्द रुजविण्यासाठी माझ्या अंतःकरणाची तयारी आहे का ? देवाच्या शब्दाप्रमाणे मी जीवन जगतो का? परमेश्वराचा शब्द माझ्या पावलांसाठी दिव्यासारखा व माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखा आहे ह्यावर माझा विश्वास आहे का ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, जीवनासाठी पोषक असलेले आध्यात्मिक अन्न स्वीकारण्यास व तुझे वचन आत्मसात करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

0 टिप्पण्या