Marathi Bible Reading | Tuesday 20th July 2021| 16th week in Ordinary Time

 सामान्य काळातील 

सोळावा सप्ताह 

मंगळवार    

२० जुलै २०२१


संत अपॉलिनरीस  

(सीरियन बिशप व  रक्तसाक्षी )

" जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई."

इस्त्राएली जनतेला फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी परमेश्वराने मोशेव्दारे योजना तयार केली. परमेश्वराच्या सामर्थ्याने मोशेच्या नेतृत्वाखाली इस्त्राएली लोक  भर समुद्रात कोरड्या जमिनीवरुन चालून गेले. फारोचे सैन्य पाठलाग करीत असतांना परमेश्वराने चमत्कार करुन समुद्र दुभंगवला आणि इस्त्राएली जनतेचे संरक्षण केले.
 प्रभू  येशू आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे,' जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्यांच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहिण व आई. परमेश्वर पित्याची इच्छा आहे की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्यावर व त्याच्या शिकवणुकीवर आणि वचनांवर आपण विश्वास ठेवावा. त्याप्रमाणे आचरण करावे आणि आज्ञा पाळाव्यात. इस्त्राएली जनतेने परमेश्वरावर विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या म्हणूनच त्यांची मुक्तता झाली. 

आपले देवपित्याबरोबरचे व प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचे नाते दृढ बनावे म्हणून सतत प्रयत्नशील बनू या. आपले आपल्या बंधु भगिनीबरोबरचे संबंध प्रेमाचे, सौख्याचे व शांतीचे असावेत म्हणून आपण सतत सकारात्मकतेने आचरण करु या. ख्रिस्ताठायी आपण एक दिलाचा व एकमनाचा खरा ख्रिस्ती समाज उभारण्यासा प्रयत्नशील बनू या.
✝️             

पहिले वाचन :  निर्गम १४:२१-१५:१

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन

"इस्राएली लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले. "

मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले आणि मधली जमीन कोरडी झाली. इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील आणि डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा इजिप्तवासियांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ आणि स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या आणि मेघाच्या स्तंभातून इजिप्तच्या सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले, "आपण इस्राएलपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने आपल्याशी लढत आहे.”
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून इजिप्तवासियांवर, त्यांच्या रथांवर आणि स्वारांवर येईल." मोशेने समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला; त्यापुढे इजिप्तचे लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्याच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली; त्यातला एकही वाचला नाही. पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले आणि उजवीकडील आणि डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.
अशाप्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इजिप्तच्या हातातून इस्राएल लोकांना तारले आणि इजिप्त लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएलांनी पाहिले. परमेश्वराने इजिप्तवासियांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्यांच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला गीत गाईले; ते म्हणाले: “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात गडप केले आहेत."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  निर्गम १५:८-१०,१२,१७

प्रतिसाद : मी परमेश्वराला गीत गाईन.

१ ) तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या; 
जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, 
गहिरे जल समुद्राच्या उदरी थिजून गेले. 
शत्रू म्हणाला, "मी पाठलाग करीन आणि मी गाठीन, 
मी लूट वाटून घेईन, त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
 मी तरवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन."

२) तू आपल्या फुंकरीचा वायू सोडला, 
तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले.
ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. 
तू आपला उजवा हात उगारला आणि पृथ्वीने 
त्यांना गिळून टाकले.

३) तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील;
 हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे, 
हेच, हे प्रभो, तुझ्या हातांनी स्थापन केलेले पवित्रस्थान आहे.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करतो, 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १२:४६-५०

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशू (आपल्या शिष्यांकडे) हात करून म्हणाला, "पाहा, माझी आई आणि माझे भाऊ"

येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत." तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, "कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?" आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई आणि माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन -आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर त्याच्या प्रजेला कसे वाचवतो हे आपण ऐकतो. देवाने इस्रायली लोकांना लाल समुद्रातून पार नेले ही घटना त्यांच्यासाठी फारच महत्वाची होती. देव आपल्या लोकांची नेहमीच काळजी घेतो हे पुन्हा एकदा प्रकट होते. आपल्या जीवनात सुद्धा अनेक वेळेला देवाने आपणास संकटांच्या सागरातून पार नेले असणार, निराशेच्या गर्तेतून वर आणले असणार, दुःखाच्या डोंगराखालून सुखाच्या शिखरावर नेले असणार! अश्या अनेक प्रसंगांचे आपण आता स्मरण करुया. देवाकडे वर मागण्यात आपण इतके गुंग असतो की त्याने केलेल्या उपकारांबद्दल आभार मानायचे विसरून जातो. आपल्या जीवनातील वल्हांडण प्रसंगांबद्दल देवाला इस्रालयी लोकांप्रमाणे विजयाचे गीत गाऊया.

प्रार्थना: हे परमेश्वर पित्या, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हांला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या