Marathi Bible Reading | Monday 19th July 2021| 16th week in Ordinary Time

सामान्य काळातील 

सोळावा सप्ताह 

सोमवार   

१९ जुलै २०२१


संत जुस्ता  व रुफीन 

(३च्या  शतकातील स्पेन मधील रक्तसाक्षी )

 "योनापेक्षा आणि शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे."

मोशेविरुद्ध कूरकूर करणाऱ्या इस्त्राएली जनतेला मोशेने दिलासा देऊन म्हटले, 'भिऊ नका स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा.' परमेश्वराने चमत्कार करून समुद्र दुभंगला आणि इस्त्राएली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले. देवाने महान चिन्ह इस्त्राएली जनतेला दिले.
शास्त्री परुशी प्रभू येशूवर अविश्वास दाखवून त्याच्याकडे दैवी चिन्हाची मागणी करतात. परंतु  प्रभू येशू स्पष्ट शब्दात म्हणतो,  'दुष्ट पिढी चिन्ह मागते.' योना तीन दिवस माशाच्या पोटात राहून जिवंत राहिला व त्याने नीनवेला पश्चात्तापाचा संदेश दिला.  
सैतानाच्या दास्यात व बंधनात असलेली माणसे येशूवर आणि त्याच्या दैवीपणावर अविश्वास दाखवित असतात. प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्या सर्वांना कोणत्याच बाह्य चिन्हाची गरज भासत नाही. विश्वास ठेवणाऱ्यांना आशीर्वाद व दानांचा वर्षाव अनुभवावयास मिळतो.
आपण आज आपल्या मनातील देवाविषयी व येशूविषयी असलेल्या सर्व शंका, अंत:करणातील अविश्वास व दुष्ट विचार ह्या प्रभूने समूळ नष्ट कराव्यात म्हणून प्रार्थना करु या. विश्वासाने प्रभूच्या अधिकाधिक जवळ जाऊन त्याची कृपा अनुभवण्यास प्रेरणा मागू या.
✝️             

पहिले वाचन :  निर्गम १४:५-१८

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन

"फारोवर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे, हे इजिप्तचे लोक ओळखतील."

इस्राएल लोक पळून गेले आहेत, हे वर्तमान इजिप्तच्या राजाला कळले तेव्हा फारोचे आणि त्याच्या सेवकांचे मन त्या लोकसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की, "इस्राएल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले ?" तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले; त्याने सहाशे निवडक रथ आणि इजिप्तमधले सर्व रथ त्यांवरील सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने इजिप्तचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्त्राएल लोक तर मोठ्या निर्भयपणे चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ आणि स्वार ह्यांसह इजिप्त सैन्याने त्यांचा पाठलाग करून पीहिरोथानजीक आणि बालसफोनासमोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळून पाहिले तो इजिप्तचे लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले, तेव्हा त्यांना फार भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, “इजिप्तमध्ये काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हांला येथे रानात मरायला आणलेस? आम्हांला तू इजिप्तमधून बाहेर आणलेस ते काय म्हणून? आम्ही तुला इजिप्तमध्ये नव्हतो का म्हणत की, 'आम्ही आहो ते ठीक आहो, आम्हाला इजिप्तच्या लोकांची गुलामगिरी करत राहू दे? येथे रानात मरून जावे त्यापेक्षा इजिप्तच्या गुलामगिरीत राहणे परवडते.' " मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा, कारण इजिप्तच्या ज्या लोकांना तुम्ही आज पाहत आहा ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल; तुम्ही शांत राहा."
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, "माझा धावा करीत काय बसलाय ? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार आणि त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील आणि पाहा, मी स्वतः इजिप्तवासियांची मने कठोर करीन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ आणि त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली होईन. फारो, त्याचे रथ आणि त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे हे इजिप्तचे लोक ओळखतील.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  निर्गम १५:१-६

प्रतिसाद : मी परमेश्वराला गीत गाईन.

१) मी परमेश्वराला गीत गाईन, 
कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. 
घोडा आणि स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.
 परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे,
 तो माझा उद्धारक झाला आहे. 
हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; 
हाच माझ्या पित्याचा देव, मी ह्याचा महिमा गाईन.

२) परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव,
 फारोचे रथ आणि त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत, 
त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.

३) गहिन्या जलांनी त्यांना गडप केले आहे;
 ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत.
हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; 
हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव आलेलुया !
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १२:३८-४२

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून तिला दोषी ठरवील. "

शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापैकी काहीजण येशूला म्हणाले; "गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, "दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना तीन दिवस आणि तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहिल. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन -येशूच्या शिकवणुकीमुळे पुष्कळ लोक येशूवर श्रद्धा ठेवू लागले होते. पण काही जण केवळ येशूने केलेल्या चमत्कारांनी येशूकडे आकर्षित झाले होते. चमत्कारांवर आधारलेली श्रद्धा फार काळ टिकून राहू शकत नाही. हे येशूलासुद्धा ठाऊक होते. म्हणूनच नवीन चमत्कारांची अपेक्षा करणाऱ्यांना येशू अगदी सडेतोड उत्तर देतो. आज आपण आपली येशूवरील श्रद्धा कशी आहे यावर मनन करूया. आपण सुद्धा केवळ येशूने आपल्या जीवनात केलेल्या महत्कृत्यांमुळे त्याच्यावर विश्वास ठेवतो की येशू आपला तारणारा आहे ह्या भावनेने त्याचे अनुकरण करतो ? आपला परमेश्वर सर्वशक्तिमान असला तरीदेखील त्याने प्रत्येकवेळी चमत्कार केला पाहिजे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आपल्या जीवनात आपण नेहमी देवाकडून चमत्काराची अपेक्षा करतो का ?

प्रार्थना: प्रभू येशू, तूच आमचे सर्वस्व आहेस, तुला शरण येण्यास व श्रद्धे  बळकट बनण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या