Marathi Bible Reading | 18th July 2021| 16th Sunday in Ordinary Time

        सामान्य काळातील 

सोळावा रविवार  

१८ जुलै २०२१

 "येशूला लोकांचा कळवळा आला."

बहकलेल्या सर्व मेंढरांना जसा मेंढपाळ एकत्र करतो, तसे परमेश्वर इस्त्राएलच्या बहकून भरकटलेल्या लोकांना परत एकत्र आणीत , असे 
प्रभू येशूची देवराज्याची शिकवण आणि केलेले अनेक चमत्कार यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता. प्रभू येशू जाईल तेथे लोक त्याचा शोध करीत फिरत होते.  प्रभू येशूला विश्रांती घ्यायची होती, मात्र मोठा जनसमुदाय त्याच्या जवळ गोळा झाला.  प्रभूने बहकलेल्यांना एकत्र केले, त्यांना बंधनातून मुक्त केले व देवराज्याची शिकवण दिली. 
आजसुद्धा प्रभू येशू आपला सर्वांचा मेंढपाळ आपल्याला देवपित्याचा मार्ग दाखवितो, देवाच्या जीवनदायी मळ्यात राखून ठेवतो. आपला सांभाळ  करतो, आपल्यावर अनेक कृपादानाचा वर्षाव करीत असतो. प्रभू येशूला| आपल्या सर्वांचा कळवळा येतो. प्रभू कनवाळू व दयाळू आहे. आपल्या सर्व समस्या, आजार, संकटे व दुःखे ह्यातून मुक्ती देणारा असा आपला प्रभू आहे. 
प्रभू येशू आपल्या सर्व समस्यांचे उत्तर आहे. श्रद्धेने आपण प्रभूच्या वचनावर चिंतन करु या. त्याची वचने व आज्ञा पाळून त्याचा तारणदायी स्पर्श  अनुभवू या.. 
✝️             

पहिले वाचन :  यिर्मया २३:१-६

वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

" मी माझ्या कळपाचा अवशेष जमा करीन आणि त्यांस त्यांच्या मेढवाड्यात परत आणीन."

"जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात आणि त्यांना विखरतात ते हाय हाय करतील." माझ्या लोकांना चारणाऱ्या मेंढपाळांविषयी इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पाहा, मी तुमच्या कर्माचा अनिष्ट परिणाम तुम्हांवर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशांतून मी त्यांचा अवशेष जमा करीन आणि त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत.
“पाहा, परमेश्वर म्हणतो, मी दावीदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील, असे दिवस येत आहेत. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल आणि 'परमेश्वर आमची धार्मिकता.' " हे नाव त्याला देतील.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २३:१- ६

प्रतिसाद :   “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; .”

१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो,
 तो मला संथ पाण्यावर नेतो, 
तो माझा जीव ताजातवाना करतो.

२ )तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. 
मृत्यूच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो 
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही
कारण तू माझ्याबरोबर आहेस;

३)  तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
तू माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढतोस; 
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;
 माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला
 कल्याण आणि दया ही लाभतील आणि 
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


दुसरे वाचन इफिसकरांस पत्र  २:१३-१८

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

 "ख्रिस्त आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांना एक केले. "

परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली; त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र; ह्यासाठी स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण क्रुसावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हांला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्यांच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे; सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ६:३०-३४

वाचक: मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. "

प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयासदेखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला, ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन ‘सुबह और शाम, काम ही काम' असा मंत्र जपणारे लाखो लोक आजच्या धावपळीच्या व धक्काधकीच्या जगात आपल्याला पाहायला मिळतात. त्यातूनच टेन्शन, ताणतणाव, चिडचिडेपणा, संघर्ष, नैराश्य, वैफल्य, चिंता असे मनोविकार आणि हृदयरोग, रक्तदाब, अॅसिडीटी, लठ्ठपणा असे शारीरिक आजार बळावत जातात. काम आणि विश्रांती ह्यांच्यात पुरेसा समतोल जर साधला गेला नाही तर माणसाच्या जीवनात बेचैनी व अस्वस्थता वाढत जाते व एक दिवस ह्या सगळ्याचा कडेलोट होतो. 
१) हिरवेगार कुरण आणि संथ पाणीः आजच्या तिन्ही वाचनात मेंढपाळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यिर्मया आपल्या काळातील मेंढपाळांना धारेवर धरतो. संत पौल एक मेंढपाळ म्हणून येशूने यहुदी व हेल्लेणी (ग्रीक) ह्यांच्यातील समेटाचे कोणकोणते कार्य केले त्याचे सविस्तर वर्णन करतो. तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे गांजलेले लोक पाहून येशूला आजच्या शुभवर्तमानात त्यांचा कळवळा येतो. ह्या विषयाला धरूनच प्रतिसाद स्तोत्रात दावीद परमेश्वर आपणाला कसा हिरव्यागार कुरणात वसवितो व संथ पाण्यावर नेतो ते नमूद करतो. 
२)रानात एकांती चला, थोडा विसावा घ्याः लोकांची गर्दी वाढत राहिल्याने प्रेषितांना जेवावयासही सवड होत नसल्याचे पाहून येशू आपल्या प्रेषितांना मचव्यातून समुद्रापलीकडे रानात एकांती घेऊन जातो. त्याआधी येशूने त्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठविलेले होते. आता ते येशूजवळ येऊन आपल्या कार्याचा अहवाल देतात. येशू त्यांची गरज जाणून त्यांना विश्रांती घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो. 
३) परिश्रम आणि श्रमपरिहार : मनुष्य आपल्या मूलभूत, भावनिक, सामाजिक व आर्थिक गरजा भागविण्यासाठी परिश्रम करतो त्या परिश्रमामुळे कामाची प्रतिष्ठा वाढते. समाजाची उन्नती होते. त्याच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त होते. मात्र लोभ, हाव, संचयवृत्ती, आसक्ती, स्पर्धा आणि यशाच्या चुकीच्या कल्पना यामुळे त्याच्या परिश्रमाला श्रमपरिहाराची जोड मिळत नाही. शब्बाथ पवित्र पाळ या आज्ञेत अशा विश्रांतीसाठी वाव देण्यात आलेला आहे. वेळीच विश्रांती न घेतल्यामुळे सक्तीची व खर्चिक विश्रांती घेण्याची वेळ माणसावर येते.
आत्मपरीक्षण : कामाचे नियोजन करीत असताना आपण विश्रांतीचेही नियोजन करतो का ? त्यात कोणकोणते अडथळे येतात ?

प्रार्थना:हे प्रभू येशू, आमच्या प्रभो, आम्ही बहकलो असताना तू आम्हाला जवळ आणतोस, आम्हावर दया कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या