Marathi Bible Reading | Monday 26th July 2021| 17th Week in Ordinary Time

     सामान्य काळातील 

सतरावा  सप्ताह 

सोमवार 

२६ जुलै २०२१

 संत जोकिम आणि आन्ना

पवित्र मरियेचे मातापिता (पहिले शतक)

नव्या करारातील शुभवर्तमानांमध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेचे मातापिता कोण होते ह्याचा उल्लेख आलेला नाही. मात्र दुसऱ्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार पवित्र मरियेच्या आईचे नाव आन्ना (कृपा) असे होते आणि वडिलांचे नाव जोकिम (देव तयारी करतो) असे होते. मरिया हे या दांपत्याला त्यांच्या म्हातारपणी झालेले अपत्य होते आणि ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ होते असे मानले जाते. कारण दोघेही वयातीत असून निःसंतान होती. संत आन्ना ही येशूची 'आजी' होती, हे सत्य पौर्वात्य ख्रिस्तसभेत चौथ्या शतकात आणि पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत आठव्या शतकात लोकांच्या भक्तीचा विषय बनले आणि चौदाव्या शतकात तर ते संपूर्ण जगभरच्या भक्तीमध्ये सामावले गेले. इ. स. १५४८ साली विश्वव्यापी ख्रिस्तसभेत त्यांचा सण समाविष्ट करण्यात आला. प्रसूतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांची ती आश्रयदाती संत म्हटली जाते.

जोकिम हे पवित्र मरियेचे पिता अत्यंत धार्मिक होते. एका प्राचीन दंतकथेनुसार ते मूळचे गालिली येथील होते. तेथून ते येरुशलेम येथे आले आणि तिथेच मरण पावले. त्यांच्या राहत्या घराशेजारीच त्यांना पुरण्यात आले. पुढे हेल्लेना या राणीने (सण १८ ऑगस्ट) त्यांच्या थडग्यावर संत जोकीम व आन्ना ह्यांच्या स्मरणार्थ एक चर्च बांधले. तिथून त्यांची भक्ती फोफावत गेली.

 ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरीयेचे आई-वडिल, संत आत्रा व संत ज्योकिम ह्यांचा सण साजरा करीत आहे. परमेश्वराच्या वचनावर आणि त्याने दिलेल्या दहा आज्ञांवर चिंतन करीत असताना आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. आई-वडिल ह्या नात्याने आपण आपल्या मुलांना देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळावयास प्रोत्साहन देत आहोत का? संत ज्योकिम आणि संत आना ह्यांनी पवित्र व धन्य कुमारी मरियेला देवप्रीतिच्या महान आज्ञेमध्ये घडविले. आपण आज त्यांचा आदर्श आपल्या कुटुंबात आचरणात आणतो का ? प्रीतिच्या आज्ञांचे पालन कुटुंबातच शिकविले जाते व पाळले जाते.

ज्या कुटुंबात देवाचा शब्द आचरणात आणला जातो व जे कुटुंब एकत्र प्रार्थना करुन देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा आचरणात आणतात तेच खरे ख्रिस्ती कुटुंब होय.


✝️             

पहिले वाचन : निर्गम  ३२: १५-२४, ३०-३४

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"ह्या लोकांनी पाप केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. "

मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; ह्या पाट्यांवर पुढल्या आणि मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे." तो म्हणाला, "हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे, अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे." मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू आणि तो नाच-तमाशा त्याने पाहिला. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले आणि कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला आणि ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.
तेव्हा मोशे अहरोनला म्हणाला, "तू ह्या लोकांवर एवढा पापभार लादला असे ह्यांनी तुझे काय केले होते ?” अहरोन म्हणाला, "माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की, 'आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला इजिप्त देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले आहे ते आम्हांला कळत नाही.' मी त्यांना सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडील सोने ..मला दिले; ते मी अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.दुसऱ्या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही हे घोर पापकृत्य केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो; कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल.” मोशे परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, "हाय ! हाय ! ह्या लोकांनी घोर पापकृत्य केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. तरी आता तू त्यांच्या पापांची क्षमा करशील तर, न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” परमेश्वर मोशेला म्हणाला, "ज्या कोणी माझ्याविरूद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. आता तू जा, स्थळाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पाहा, माझा दूत तुझ्यापुढे चालेल. तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्यादिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १०६:१९-२३

प्रतिसाद : परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे.

१) त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, 
ओतीव मूर्तीची पूजा केली; 
त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर 
त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.

२) ते आपल्या उद्धारक देवाला विसरले, 
त्याने इजिप्त देशात महत्कृत्ये, 
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये,
 तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये, केली होती.

३) तेव्हा तो म्हणाला,
"ह्यांचा नायनाट केला पाहिजे;
पण त्याचा क्रोध शांत करावा आणि 
त्याने त्यांचा नाश करू नये,
शीतल म्हणून त्याचा निवडलेला
 मोशे त्याला आडवा आला.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 जे वचन ऐकून शुद्ध नि प्रामाणिक अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.

 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १३ : ३१-३५

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"त्या मोहरीच्या दाण्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. "

येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला तो असा की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे तरी वाढल्यावर इतर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पांखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. "
त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही. ह्यासाठी की, संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की, "मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आज आपण येशूचे आजी आजोबा व मरियेचे आई वडील संत जोकीम व अण्णा ह्यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. त्यांनी मरियेला देवाच्या सानिध्यात वाढविले म्हणूनच येशूची आई होण्याचा मान तिला लाभला. त्यांनी केलेल्या ह्या महान कार्यामुळे आजही आपण त्यांचा सन्मान करतो. आईवडील म्हणून जर आपण योग्य आचरण करून मुलांना चांगला आदर्श दिला तर आपली मुलेसुद्धा आपला नेहमीच सन्मान करतील. आपले चांगले धार्मिक व सामाजिक जीवन आपल्या येणाऱ्या पिढीसाठी देवाकडून आशीर्वाद कमावते हे आपण पहिल्या वाचनात ऐकतो. आईवडील ह्या नात्याने आपण कसे वागतो ह्यावर मनन करू या.

प्रार्थना:  हे प्रभू, परमेश्वरा, आम्ही सर्वदा आमच्या आई-वडिलांचा सन्मान करावा आणि त्यांना आदराने वागवावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या