सामान्य काळातील
सतरावा सप्ताह
मंगळवार
२७ जुलै २०२१
संत इनोसेंट पहिले
परमगुरू, वर्तनसाक्षी ( ४१७)
"नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सुर्यासारखे प्रकाशतील."
'परमेश्वर दयाळू व कृपाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर हजारो पिढ्यांवर दया करणारा (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो.’ परमेश्वर प्रेमळ आहे मात्र त्याची आज्ञा न पाळणाऱ्यावर तो अरिष्ट आणीत असतो.
प्रभू येशू स्पष्टीकरण देताना सांगत आहे की, 'शेत हे जग आहे, चागंले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निंदण हे ह्या दुष्टाचे पुत्र आहेत.' आपल्यामध्ये अनाचार, दुष्टाचार, व्यभिचार व पापवासना असतील तर ते कार्य सैतानाचे आहे. आपण आज विचार करु या आपल्यामध्ये निंदण वाढत असेल तर प्रभू म्हणतो, 'त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील.' आपल्यामध्ये चांगले बीज असेल तर निशितच प्रभू म्हणतो त्याप्रमाणे 'नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात| सुर्यासारखे प्रकाशातील.'
स्वर्गराज्याचे बीज म्हणजेच देवाचे वचन. शुद्धतेचे, पवित्रतेचे, जीवन देणारे व देवाकडे पोहोचणारे वचन आपल्या अंत: करणात वाढत राहावे म्हणून आज आपण पश्चातापी अंत:करणाने प्रभू जवळ क्षमायाचना करु या. आपले जीवन फलदायी बनावे व देवाच्या राज्यात आपणासर्वांचे स्वागत व्हावे म्हणून कार्यशील बनू या. जे जे आपणास देवराज्यापासून दूर घेऊन जाते त्याचा धिक्कार करुन देवाच्या वचनाला मिठी मारु या.
पहिले वाचन : निर्गम ३३:७-११, ३४:४-९,२८
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे."
मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी आणि त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणांला परमेश्वराशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणी बाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जाई. जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपआपल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपआपल्या तंबूच्या दाराशी वंदन करीत. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे.
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वर त्यांच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, “परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा आणि सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध आणि पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टपणाबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो." तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, “हे प्रभो, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय आणि पापे ह्यांची क्षमा कर आणि आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर.'
मोशे तेथे परमेश्वरासमीप चाळीस दिवस आणि चाळीस रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, आणि त्या पाट्यांवर त्याने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून काढल्या.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०३:६-१३
प्रतिसाद : परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
१) जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची
आणि न्यायाची कृत्ये करतो.
त्याने आपले मार्ग मोशेला आणि
आपली कृत्ये इस्राएलच्या वंशजांना जाहीर केली.
२) परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही;
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
३) आमच्या पापांच्या मानाने
त्याने आम्हाला शासन केले नाही.
त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने
आम्हाला प्रतिफळ दिले नाही.
कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया आणि त्याचे भय धरणाऱ्यांवर अमाप आहे.
४) पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
तितके त्याने आमचे अपराध
आमच्यापासून दूर केले आहेत.
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो,
तसा परमेश्वर आपले भय
धरणाऱ्यांवर ममता करतो.
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
शुभवर्तमान मत्तय १३ : ३६-४३
वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल."
येशू लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, "शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा."
त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दुतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :निंदण व चांगले बी या दाखल्यावर आपण मनन करूया. चांगले बी हे नेहमीच भरपूर पीक देते. तर निंदण हे निरुपयोगी असून फक्त जागा व्यापून टाकते. आपण आपली तुलना चांगले बी व निंदणाशी करू या. ह्या जगात देवाने आपणास जणूकाही पेरले आहे. आपण चांगल्या बियाप्रमाणे चांगले कार्य करून देवास भरपूर मोबदला देतो की निंदणाप्रमाणे काहीही न करता जीवन जगत आहोत. आपल्या अश्या निरुपयोगी वागण्याचा सध्या काहीही परिणाम दिसून येणार नाही. कारण येशू म्हणतो शेवटच्या प्रसंगी तो चांगले पीक व निंदण वेगळे करणार आहे. दोघांना ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळणार आहे.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुला जाणण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या