Marathi Bible Reading | Wednesday 28th July 2021| 17th Week in Ordinary Time

       सामान्य काळातील 

सतरावा  सप्ताह 

बुधवार  

२८ जुलै २०२१

 संत सिस्टर अल्फोन्सा

 कुमारिका (१९१०-१९४६)

केरळातल्या कुदानाळूर नावाच्या गावात १९ ऑगस्ट १९१० साली जोसेफ व मेरी ह्यांच्या संसारवेलीवर आन्ना नावाचे चौथे अपत्य उमलले, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने आन्नाचे पालन पोषण केले. तिच्या बालपणी तिने वाचलेली लिझोची संत तेरेजा हिची कहाणी वाचून आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्या माध्यमातून संत व्हावे असे तिला वाटू लागले.

आन्ना हिला कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते, परंतु तिच्या मावशीने तिचे आधीच लग्न ठरविलेले होते. आपली सोयरिक मोडणे आता केवळ अशक्य आहे असे दिसताच तिने आपले सौंदर्य नष्ट करण्यासाठी मोठ्या अग्नी ज्वालेमध्ये आपला पाय घातला. परंतु सुदैवाने तो घसरला आणि ती स्वतः त्या ज्वालेत पडली व मोठ्या प्रमाणात भाजली. मात्र थोड्याशा औषधोपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिच्या मावशीने तिला व्रतस्थ जीवनात प्रवेश करण्यास परवनागी दिली.

या महत्त्वाच्या जीवनासाठी आपली तयारी करण्यासाठी ती भारानांगानाम येथील कॉन्व्हेंटमध्ये नवशिष्य म्हणून इ. स. १९२८ साली दाखल झाली. तिथे वैराग्याची वस्त्रे पांघरल्यानंतर सिस्टर अल्फोन्सा ह्यांच्या जीवनात तीन प्रसंग येऊन गेले.

इ. स. १९३५ साली कॉन्व्हेंटमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच तिला एका असाध्य रोगाने पछाडले. तीन महिने ती ह्या आजाराशी झुंज देत होती. त्यावेळी तिने धन्यवादित कुरियाकोस एलायस चावरा (सण ३ जानेवारी) ह्यांचा नोव्हेना केला आणि ती ठणठणीत बरी झाली.

दुसऱ्या एका प्रसंगात एका संध्याकाळी एक चोर त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलेला पाहून तिने इतका धसका घेतला की, ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिला तामिळ भाषेची देणगी मिळाल्याचे दिसून आले. त्याआधी तिने तामिळ ही भाषा कधी वाचली, लिहिली की बोलली नव्हती. आता ह्या नवीन दानामुळे ती तामिळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. बरेच लोक तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. तिला दूरदृष्टीची विलक्षण देणगी देखील लाभलेली होती.

तिसऱ्या एका घटनेत इ. स. १९४५ साली तिला येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. सुरूवाती-सुरूवातीला हे दुःखसहन केवळ शुक्रवारी ३ तासासाठी होई. पुढे ते कधीही होऊ लागले. परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकल्याची कुठलीही खूण दिसत नसे. उलट आगळाच ताजेतवानेपणा तिच्या मुखवट्यावर विलसत असे.

हे दु:खसहन प्रसंग मर्यादित व्हावे अशी प्रार्थना तू का करीत नाहीस? असा प्रश्न विचारणाऱ्या सिस्टरांना तिने दिलेले उत्तर सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे असेच आहे. ती म्हणाली मी केवळ हेच दुःखसहन नव्हे तर कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे, आजचे आधुनिक जग केवळ सुखासीनतेच्या सागरात पार डुंबलेले आहे. नाशाच्या मार्गावर असणाऱ्या जगासाठी म्हणा किंवा धर्मगुरू व धर्मभगिनींच्या उदासीन वृत्तीबद्दल म्हणा प्रभूला मला जितक्या यातना दयावयाच्या आहेत तितक्या सोसण्यास माझी पूर्ण तयारी आहे.

२८ जुलै रोजी सिस्टर अल्फोन्सा मरण पावल्या. पुढे इ. स. १९८६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे आपल्या भारत भेटीवर आले तेव्हा कोट्टायाम (केरळ) येथे त्यांना धन्यवादित  ही पदवी पोपमहाशयांनी बहाल केली. आणि Pope Benedict XVI approved Blessed Alphonsa for canonization on June 1, 2007. The fifty-five-year process of her canonization was completed just over a year later on October 12, 2008, when she was officially named a saint. St. Alphonsa was the second person of Indian origin to be canonized a saint and the first Indian woman to be elevated to the status of sainthood.

चिंतन : मी स्वत:ला सर्वस्वी येशूचरणी वाहिलेले आहे. माझ्याशी वागताना कृपया येशूला प्रसन्न करण्याचा आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू या.केवळ देवाच्या प्रेमाखातर दुःखसहन करण्यास आनंद मानणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. संत  सि. अल्फोन्सा

“स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, 

✝️             

पहिले वाचन : निर्गम  ३४:२९-३५

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"जेव्हा लोकांनी मोशेला पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास भ्याले."

मोशे सिनाय पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या घेऊन पर्वतावरून उतरून येत असता, परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत त्याचे त्याला भान नव्हते, मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनने आणि सर्व इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास भ्याले. मग मोशेने अहरोन आणि मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलावले; तेव्हा अहरोन आणि मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले; पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई, ती तो इस्राएल लोकांना सांगत असे. इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे.


हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ९९:५-७,९

प्रतिसाद : हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू पवित्र आहेस. 

१) परमेश्वराची, आमच्या देवाची, थोरवी गा 
आणि त्याच्या पदासनापुढे नमन करा.पवित्र तोच आहे.

२) त्याच्या याजकांपैकी मोशे आणि अहरोन 
आणि त्याच्या नामाचा धावा करणाऱ्यांपैकी शमुवेल, 
ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

३) मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला;
 त्याचे निर्बंध आणि त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.

४) परमेश्वर, आपला देव ह्याची थोरवी गा 
आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा; 
कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १३ : ४४-४६

वाचक: मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "तो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
"आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोण्या व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.”


प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :शेतात लपविलेल्या खजिन्याचे व मोत्याचे मोल समजल्यामुळे आपले सर्वस्व विकून शेतकरी व व्यापारी ते विकत घेतात. आपणसुद्धा आपणांस आवडणाऱ्या अनेक गोष्टी पुष्कळ पैसे खर्चून विकत घेत असतो. कधी कधी एखादी अनमोल गोष्ट मलाच मिळाली पाहिजे व ती मिळविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. देवराज्य मिळविण्यासाठी आपणा सर्वांसपाचारण केले आहे. देवराज्य मिळविण्यासाठी आपण अशीच धडपड करतो का ? देवराज्यात प्रवेश मिळवण्याची संधी घालवायची नसेल तर आपण ज्या जागतिक गोष्टींच्या मागे लागतो त्याचा त्याग करावा लागेल. हे सर्व आपण आनंदाने केले पाहिजे कारण आपणांस शेवटी जे मिळणार आहे ते मोती, खजिना ह्या पेक्षा किमती आहे आणि हे आपल्या आत्म्यासाठी गरजेचे आहे. आपण कितीही गोष्टींचा त्याग केला तरी देवराज्य त्यापेक्षा अनमोल आहे. देवराज्य मिळविण्यासाठी मी कोणत्या गोष्टीचा त्याग करणार आहे यावर मनन करू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास व त्याचा  शोध घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या