Marathi Bible Reading |Thursday 29th July 2021| 17th Week in Ordinary Time

        सामान्य काळातील 

सतरावा  सप्ताह 

गुरुवार 

२९ जुलै २०२१

बेथानीची संत मार्था 

- कुमारिका (८४)

“मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस,

ख्रिस्तसभा आज बेथानी येथल्या लाझरस आणि मरिया ह्यांची बहीण मार्था हिचा सण साजरा करीत आहे. यहुदियात असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त मार्थाच्या घरी पाहुणा म्हणून उतरला. मार्थाने त्याचे आपल्या घरी स्वागत केले इतकेच नव्हे तर त्याच्या स्वागताची व्यवस्थित तयारी व्हावी म्हणून ती दिवाणखान्यात पुष्कळ गोष्टीविषयी दगदग व काळजी करीत राहिली.

मार्था, मरिया व त्यांचा भाऊ लाझरस ह्यांच्यावर येशूचे विशेष प्रेम होते. त्यामुळे लाझरस मरण पावल्यावर मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” ख्रिस्ताच्या केवळ उपस्थितीत जीवनाचा उगम आहे हेच मार्थाने आपल्या ह्या वाक्याद्वारे दर्शविलेले आहे. पुढे मार्थाच्याच आग्रहावरून ख्रिस्ताने उच्चारलेले, 'पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे' हे वाक्य इतिहासात अजरामर झाले आहे.


✝️             

पहिले वाचन : १योहान ४:७-१६

वाचक : योहानाचे पहिले पत्र  या पुस्तकातून घेतलेले वाचन 

प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आपणही एकमकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे आणि आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो आणि तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.


हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३४:२-११

प्रतिसाद : परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; 

१) माझा जीव परमेश्वराच्या ठायीं प्रतिष्ठा मिरवील;
दीन हे ऐकून हर्ष करितील.
 तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा;
 आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.

२) मी परमेश्वराला शरण गेलो आणि 
त्याने माझा स्वीकार केला; 
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविलें, 
ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; 
त्यांची मुखें लज्जेनें कदापि काळवंडणार नाहीत.

३) ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वरानें तो ऐकला, 
आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविलें.
 परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणान्यां सभोवतीं छावणी देतो 
आणि त्यांचे संरक्षण करितो.

४)परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; 
जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य !
परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा,'
कारण त्याचें भय धरणाऱ्यांना कांहीं उणें पडत नाहीं.

५) तरुण सिंहांसहि वाण पडते व त्यांची उपासमार होते;
पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याहि 
चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
मुलांनो या, माझें ऐका;मी तुम्हांला परमेश्वराचे 
भय धरावयाला शिकवीन.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

 आलेलुया!

शुभवर्तमान  योहान११ : १९-२७

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा असा मी विश्वास धरला आहे.'

यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था आणि मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल." मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय ?" ती त्याला म्हणाली, “होय, प्रभुजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

                          किंवा 

लूक १०:३८-४२

वाचक: लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

येशू एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबाळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करण्यास तिला सांगा.” प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :शुभवर्तमानात आपण पाहतो की, मार्था ही जागतिक गोष्टीविषयी जास्त दगदग करीत होती तर मरिया येशूचे वचन ऐकण्यात गुंग होती. येशू मरियेने केलेल्या निवडीला 'चांगला वाटा' असे संबोधितो. येशू आपणास आपले काम न करण्याचा उपदेश देत नाही. तर येशू सांगतो की, हे सर्व करत असताना, देवासाठी आपणाकडे वेळ राहत नाही. येशूच्या स्वागतात गुंतलेल्या मार्थाला स्वतःच्या अध्यात्म्याचा विसर पडलेला दिसतो. आपण समाजसेवेत गुंतलेलो असतो, कुटुंबाचा भार वाहत असतो, तेव्हा आपल्याला सुद्धा अध्यात्म्याचा विसर पडलेला असतो का? त्याचा शोध आपण आपल्या रोजच्या कामात केला पाहिजे. थोडा वेळ तरी देवाच्या वचनावर मनन करण्यास ठेवला पाहिजे. जर देवाचे वचन आपल्या हृदयात असेल तर आपण नेहमीच मरियेसारखा 'चांगला वाटा' निवडणार ह्यात शंका नाही.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, मरिया व मार्थासारखा विश्वास व प्रेम आमच्यामध्ये वाढीस लागावे व आमचे जीवन परिवर्तन घडावे म्हणून आम्हाला कृपा दे,
आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या