Marathi Bible Reading | Friday 30th July 2021 | 17th Week in Ordinary Time

        सामान्य काळातील 

सतरावा  सप्ताह 

शुक्रवार 

३० जुलै २०२१



संत पीटर क्रिस्तॉलॉगस
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३८०-४५०)

पावित्र्याची शस्त्रे धारण करा. आपली कंबर शुद्धतेच्या कमरबंदाने , ख्रिस्त तुमचे शिरस्त्राण बनो. ख्रिस्ताचा क्रूस तुमच्या मुखाचे रक्षण करो..  आपल्या उरात ईश्वरी ज्ञानाचे भांडार साठवा, तुमच्या प्रार्थनांचा धूप उंचस्थानी पोहोचो.-संत पीटर क्रिस्तॉलॉगस

“संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत सन्मान मिळत नाही. ” 

 देवाने माणसांच्या भल्यासाठी केलेल्या नियमांचे, विशेषत: आपल्या सर्वकृतीबद्दल करावयाच्या समर्पणाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. होमार्पण, अन्नार्पणा, शांत्यर्पण आणि पेयार्पणाची सविस्तर माहिती देऊन पवित्र मेळे भरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परमेश्वराने अशा नियमाद्वारे इस्त्राएली जनतेचा सांभाळ केला.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभू येशूची अलौकिक शिकवण लोकांनी ऐकली, येशूने केलेले अनेक चमत्कार आणि अद्भूत कृत्यांचे सर्वजण प्रत्यक्ष साक्षीदारी बनले. येशू केवळ सुताराचा मुलगा व आपल्या ओळखीचा आहे म्हणून येशूचा आपल्या जवळच्या माणसांनी स्वीकार केला  नाही. 

प्रत्येक व्यक्ती देवाची प्रतिमा आहे, कोणाही माणसाची निवड करुन देव त्याच्या योजना व कार्य पूर्णत्वास नेत असतो. माणसांच्या विचारापेक्षा देवाच्या योजना अनाकलनीय असतात. म्हणूनच प्रभू येशूच्या सुवार्तेचे कार्य करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमि आणि त्याची बुद्धीमत्ता तपासण्यापेक्षा, देवाच्या सामर्थ्यावर व प्रकटीकरणावर आपण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करणाऱ्या सर्वाचा आपण विश्वासाने स्वीकार करुन देवाची कृपा अनुभवू या.


✝️             

पहिले वाचन : लेवीय २३: १,४-१,१५-१६,२७,३४-३७

वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन

“परमेश्वराने नेमलेल्या समयी पवित्र मेळे भरवावे असे जाहीर करा."

परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराने नेमलेले पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावयाचे ते हे: पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीला संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशीतुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल आणि त्यातील पीक कापाल तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी; शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी.
शब्बाथच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावे; सातव्या शब्बाथाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे.
त्याच सातव्या महिन्याच्या दशमीला प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवाला दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ मांडवांचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे आणि आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोप दिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
परमेश्वराने नेमलेले समय हे होत. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण आणि पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पिण्यासाठी पवित्र मेळे भरवावे असे तुम्ही जाहीर करावे."

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ८१:३-६,१०-११

प्रतिसाद :  देव आमचे सामर्थ्य आहे त्याचे मोठ्याने गुणगान गा.

१ ) सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, 
मंजुळ वीणा आणि सतार वाजवा; 
शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस आमच्या
 सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.

२) कारण ह्या इस्राएलसाठी नियम आहे;
 हा याकोबच्या देवाचा निर्बंध आहे. 
तो इजिप्त देशावरून गेला, 
तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निबंध साक्षीसाठी नेमला.

३) तुम्हाला अन्य देव नसावा,
 तुम्ही परक्या देवाच्या पाया पडू नये, 
मीच तुमचा देव परमेश्वर आहे, 
मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.

 आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १३:५४-५८

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"हा सुताराचा मुलगा आहे ना? मग हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ?"

स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना ? ह्यांच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून प्राप्त झाले ?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, "संदेष्ट्याला आपला देश आणि आपले घर ह्यात सन्मान मिळत नाही.” तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :येशू जेव्हा स्वतःच्या गावी येतो तेव्हा त्याचे लोक त्याच्यावर अविश्वास दाखवतात. हा ख्रिस्त आम्हाला काय सांगणार? काय शिकवणार? तो तर योसेफ नावाच्या सुताराचा मुलगा, आमच्यातलाच एक म्हणून ते ख्रिस्ताला नाकारतात. त्यांच्या ह्या अविश्वासामुळे येशू तिथे जास्त चमत्कार किंवा अद्भूत कृत्ये करीत नाही. आपल्या जीवनात सुद्धा आपणांस हेच अनुभवायला मिळते. अनेक वेळेला आपल्या कमकुवत विश्वासामुळे आपल्याला येशूच्या सामर्थ्याचा अनुभव येत नाही. ख्रिस्ती म्हणून आपण अनेक वेळेला देवाची कृपा गृहीत धरतो. आपणास सर्वकाही सहज उपलब्ध असल्यामुळे देवाच्या महानतेला आपण पाहिजे तेवढे महत्त्व देत नाही. नाझरेथ येथील लोकांप्रमाणे न वागता ख्रिस्तावरील विश्वासाने जीवनात अनेक महत्कृत्ये अनुभवता यावीत म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, तुला विश्वासाने अनुभवण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या