Marathi Bible Reading | Saturday 31th July 2021 | 17th Week in Ordinary Time

         सामान्य काळातील 

सतरावा  सप्ताह 

शनिवार 

३१ जुलै २०२१

लोयोलाचे संत इग्नेशिअसचा सण  :

वर्तनसाक्षी (१४९१-१५५६)  

उत्तर स्पेनमधील लोयोला येथल्या राजघराण्यात इनिगो ह्याचा जन्म झाला. पाम्पलोना येथल्या युद्धात जखमी झाल्यानंतर आपल्या बिछान्यात विश्रांती घेत असताना त्याने ख्रिस्ताचे चरित्र आणि संतांची जीवनचरित्रे ह्यांचे वाचन केले. त्यावरून आपले जीवन किती पोकळ आणि अर्थहीन आहे ह्याची जाणीव इग्नेशिअस ह्यांना झाली. त्याने स्वतःशी प्रश्न केला, “जर ही सगळी माणसे संतपदाला जाऊन पोहोचू शकत असतील तर मी का नाही?”

आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर इग्नातीने मानरेसा येथील एकांतवासात एक वर्ष घालविले. देवाची आपल्याबाबत काय इच्छा आहे ते त्याने शोधण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. बार्सेलोना येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने लॅटीन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे एवढे होते. त्यापुढील ११ वर्षे इग्नाती ह्याने तत्वज्ञान आणि ईशज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली.

पॅरीस शहरातील विश्वविद्यालयात इ. स. १५३५ साली त्याने पदवी संपादन केली. त्यावेळी आत्मक्लेश, गरिबी आणि आध्यात्मिक साधना या गुणांनी सजविलेल्या जीवनपद्धतीने त्यांनी ६ तरुणांना आपणाकडे आकर्षून घेतले. त्यातील दोघे पुढे संतपदाला पोहोचले. एक होते संत पीटर फेबर आणि दुसरे संत फ्रान्सिस झेवियर (सण ३ डिसेंबर).

ह्या सात जणांनी पोप पॉल दुसरे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचे ठरविले, ख्रिस्तसभेच्या शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी ह्या जगाच्या आकर्षणात अडकून पडलेल्या भाविकांना शाश्वत सुखाची ओळख करून देण्यासाठी ह्या सात जणांच्या समुहातून परमेश्वर एका नवीन सोसायटीची योजना हळूहळू आपणासमोर साकार करीत आहे ह्याची जाणीव पोपमहाशयांना झाली.

इ. स. १५४० साली पोपमहाशयांनी “द सोसायटी ऑफ जिझस" जेसुईट्स किंवा येशूसंघ, ह्या धार्मिक व्रतस्थांच्या संस्थेला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर इग्नाती लोयोलाकर ह्यांना या संस्थेचे पहिले जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. त्यात कोणत्याही एका विशिष्ट पेहरावाचा समावेश करण्याचे त्यांनी टाळले. दैनंदिन भक्तीच्या प्रार्थना आपल्या आचारसंहितेतून वगळली. त्याऐवजी आपल्या धर्मगुरूंनी आत्मपरीक्षण- चिंतन- ध्यान-साधना करावी, प्रवचने दयावीत, कुमसार ऐकावे, शाळा कॉलेजांतून मुलामुलींना शिक्षण दयावे, यासाठी तपसाधना आयोजित करावी ह्यावर त्यांनी भर दिला.

लवकरच ही संस्था झपाट्याने फोफावत गेली. येशूसंघीय धर्मगुरू इटालीच्या रस्त्यारस्त्यांतून साध्यासोप्या भाषेत प्रभूची सुवार्ता घोषवू लागले. आजारी व गरीब ह्यांची सेवा करू लागले. लोकांना वारंवार संस्कार स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करू लागले. युरोपातील इतर देशांतही त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला. आफ्रिका, अमेरिका, भारत व जपान इत्यादी देशात येशूसंघीय धर्मगुरूंचे कार्य व संख्या भराभर वाढत गेली.१६ वर्षांनंतर ३१ जुलै १५५६ रोजी जेव्हा इग्नेशिअस लोयोलाकर मरण पावले तेव्हा येशू संघीयामध्ये १,००० धर्मगुरू आणि जगभर संस्थाच्या १०० शाखा इत्यादींचे कार्य सुरू होते. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी येशूसंघाचे कार्य पाहून इ. स. १६६२ साली इग्नेशियस ह्यांना संतपद बहाल केले.

चिंतन : जितकी परिस्थिती निराशाजनक भासेल तितकी अधिक आशा व भरवसा आपण परमेश्वरावर दाखवला पाहिजे. जेव्हा मानवी श्रम व सहाय्य कमी पडते तेव्हा ईश्वरी कृपा कार्यरत होते. - लोयोलाचे संत इग्नेशिअस


✝️             

पहिले वाचन : लेवीय २५: १,८-१७

वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन

“योबेलवर्षी तुम्ही सर्वांनी आपआपल्या वतनात परत जावे."

सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, शब्बाथवर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा; ह्या सात शब्बाथवर्षाचा काल एकूणपन्नास वर्षे होय. मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवाशी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही 'योबेल' म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपआपल्या वतनात आपआपल्या कुटुंबात परत जावे. हे पन्नासावे वर्ष तुमचे योबलवर्ष होय त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलींची फळेही तोडू नयेत. कारण हे योबेल वर्ष होय; हे तुम्हाला पवित्र असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
"ह्या योबेलवर्षी तुम्ही सर्वांनी आपआपल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्यांच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. योबेलवर्षांनंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजाऱ्यापासून मोल घ्यावे आणि तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी. उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्यामानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्यामानाने कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्याच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ६७:२-३,५,७-८

प्रतिसाद :  हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत.

१) देवाने आमच्यावर दया करावी 
आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा.
 पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, 
म्हणून आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा. 
व तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना जाहीर व्हावे.

२) राष्ट्रे हर्ष करोत आणि जयघोष करोत; 
कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील, 
आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील.

३) भूमीने आपला उपज दिला आहे; 
देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो, 
देव आम्हाला आशीर्वाद देवो, आणि 
पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
 ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
 आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १४:१-१२

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"हेरोदने माणूस पाठवून योहानचा शिरच्छेद करवला. योहानच्या शिष्यांनी जाऊन येशूला ही गोष्ट सांगितली. "

मांडलिक हेरोदने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. कारण हेरोदने आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, हिच्यासाठी योहानला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही,” आणि तो त्याला जिवे मारायला पाहात असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत होते. नंतर हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदला खूष केले, त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या."तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथेमुळे आणि जे पंक्तीला बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात आपण योहानाच्या मृत्युविषयी ऐकतो. हेरोदाला तो करीत असलेल्या चुकीची जाणीव केल्यामुळे योहानाला मरणाला सामोरे जावे लागले. अनेक वेळेला जे लोक सत्याची साथ देतात किंवा जे लोक अनीतीच्या मार्गाने चालत असतात त्यांना त्याची चूक दाखवतात त्यांना अशाचप्रकारे मानहानी, अपमान व वेळप्रसंगी मरणाला सामोरे जावे लागते. जे लोक आपली कानउघाडणी करतात, आपण चांगल्या मार्गाने चालावे म्हणून नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना आपण कशी वागणूक देतो. आपणांस चांगला सल्ला देणारे लोक हे संदेष्ट्याप्रमाणे असतात, आपल्या वाईट वागण्याने आपला विनाश होऊ नये म्हणून ते आपणांस सावध करीत असतात.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझी कृपा मला पूरे आहे. मला क्षमाकर आणि सर्व  वाईटापासून दूर राहण्यास कृपा दे, आमेन.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या