पहिले वाचन : निर्गम १६:२-४.१२-१५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन."
त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन ह्यांच्यासंबंधाने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही इजिप्त देशात मांसाच्या भांड्यांभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर बरे झाले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे."
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, "पाहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.
इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की, संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव आहे हे तुम्ही जाणाल."
संध्याकाळी लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्त्राएल लोक हे पाहून एकमेकांना म्हणाले, "हे काय ?" कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १७७:३-४,२३-२५,५४
प्रतिसाद : देवाने त्यांना स्वर्गातले अन्न दिले.
१) ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या,
आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या
त्या गोष्टी : परमेश्वराचा पराक्रम आणि
त्याने केलेली अद्भुत कृत्ये आम्ही पुढच्या पिढीला सांगू.
२) त्याने वरती आभाळाला आज्ञा केली आणि
आकाशद्वारे उघडली; खाण्याकरिता त्याने
त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला आणि
त्यांस स्वर्गातले धान्य दिले.
३) दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली.
त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे,
आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ४:१७.२०-२४
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. "
मी हे म्हणतो आणि प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही; तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल आणि येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही मात्र आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व आणि पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे; तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
शुभवर्तमान योहान ६:२४-३५
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."
येशू तेथे नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्णहूम येथे आले..तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, "गुरुजी, येथे कधी आला?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा." ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे ?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवावा." ह्यावरून ते त्याला म्हणाले, "असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा ? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला.” असे लिहिले आहे की, “त्याने त्यांना स्वर्गातूनभाकर खायला दिली." ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी , भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय." म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : यहुदी धर्मात 'नवे आकाश आणि नवी पृथ्वी' हे स्वप्न विशेषतः जुन्या करारातील संदेष्ट्यांनी लोकांसमोर चितारले. पुढे हेच स्वप्न ख्रिस्ती धर्मातील लोकांठायी नवजीवनाची आशा प्रज्वलित करणारे ठरले. प्रकटीकरणाच्या पुस्तकात ह्या स्वप्नात 'नवे येरुशलेम' हा आणखी एक घटक जोडला गेला. आजची वाचने श्रद्धावंताला नवीन जीवनाचे स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतात. त्यासाठी चार गोष्टींबाबत आपण आपल्या जीवनात बदल करावा अशी ही वाचने आपल्याला शिकवितात.
१) मानवी दुर्बळतेविषयी तक्रार करण्याऐवजी परमेश्वराच्या दानशूरतेवर भरवसा ठेवा : आजच्या पहिल्या वाचनात लोक परमेश्वरावरील श्रद्धेअभावी मोशेविरुद्ध कुरकूर करतात. संत जॉन मारी व्हियानी म्हणतात, 'संत कधी कुरकूर करीत नाहीत आणि जे कुरकूर करतात ते कधी संत होत नाहीत.'
२) जुनी विकृत विचारसरणी व जीवनशैली टाकून देऊन त्याऐवजी नवे सुसंस्कृत जीवन जगायला सुरुवात कराः 'तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सर्व दुष्कृत्यांसह टाकून दिले आहे आणि जो नवा मनुष्य धारण केलेला आहे असे इतर पत्रात (कलस्से. ३:९ १०) सांगणारा पौल आता इफिसच्या लोकांना जुनी जीवनपद्धती टाकून देण्यास व नवी मनोवृत्ती धारण करण्यास प्रवृत्त करतो.
३) नाशवंत गोष्टी ऐवजी अविनाशी गोष्टींचा आस धराः प्रभू येशूने भाकरीचा चमत्कार केल्यानंतर, लोक त्याचा शोध करीत आले तेव्हा येशूने त्यांना त्यांच्या जीवनात एक महत्वाचा बदल करण्यास सांगितले, 'नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जे अन्न देतो त्या अविनाशी अन्नासाठी श्रम करा.'
४) नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांचा अनुभव घेण्यासाठी येशूचा स्वीकार करा. कारण येशू म्हणतो, 'स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर मीच आहे. ही भाकर खाणारा सर्वकाळ जगेल, इथे नवे आकाश म्हणजे नवे अध्यात्म व नवी पृथ्वी म्हणजे भौतिक जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी. या गोष्टी मिळविण्यासाठी आपण येशूचा स्वीकार करायला हवा.
आत्मपरीक्षण: आपल्या जीवनात 'नवे आकाशव नवी पृथ्वी' हे परमेश्वराचे स्वप्न कशाप्रकारे साकार करता येईल? कोणकोणत्या बाबतीत मूलभूत बदल करून नवीन जीवन कसे जगता येईल ?
प्रार्थना: प्रभू येशू, आम्हाला सर्वदा तुझ्या स्वर्गीय भोजनाची भूक लागावी | म्हणून आमची अंत: करणे नवीन बनव, आमेन..
0 टिप्पण्या