सामान्य काळातील
अठरावा सप्ताह
सोमवार
२ ऑगस्ट २०२१
व्हर्सेलीचे संत युजेबियुस
- महागुरु, रक्तसाक्षी धर्मपाल (२८३-३७१)
“ते सर्व जेवून तृप्त झाले.”
इस्त्राएली लोकांना अरण्यात भूक लागली असताना, देवाने आकाशातून स्वर्गीय मान्ना पाठविला. मात्र इस्वाएली लोकांचे समाधान झाले नाही व त्यांनी मोशेकडे मांसाहाराची मागणी केली. देवाचा कोप त्यांच्यावर झाला. परमेश्वर दयाळू आहे मात्र न्यायनीतिचे जीवन जगणे गरजेचे आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने हजारो लोकांना आजारमुक्ती दिली व त्यांना बंधमुक्त केले. त्याचबरोबर प्रभूने त्यांची शारीरिक भूक भागविण्यासाठी पाच भाकरी व दोन माशांचा चमत्कार करुन भोजनाचा आस्वाद दिला. शुभवर्तमानात म्हटले आहे की, “ते सर्व जेवून तृप्त झाले.' " जणू स्वर्गीय भोजनाद्वारेच ते तृप्त झाले. कारण प्रभू येशू स्वतःच जीवनाची भाकर आहे. आपल्या सर्वांचे आध्यात्मिक पोषण व्हावे आणि प्रभूमध्ये आपण एक व्हावेत म्हणून प्रभू येशूने स्वतः त्याचे शरीर व रक्त आपल्या सर्वांसाठी दिलेले आहे. अति पवित्र ख्रिस्तशरीर संस्कारामध्ये प्रभू स्वतः जीवनाची भाकर बनून आपल्याला तृप्त करीत असतो. जोपर्यंत निर्मळ अंत:करणाने आपण त्याला स्वीकारत नाही तो पर्यंत आपण प्रभू बरोबर एकरुप होऊ शकत नाही.
आपण प्रभू भोजनाद्वारे तृप्त व्हावेत व जीवनातील प्रवासात आपल्याला समाधान मिळावे म्हणून प्रभूकडे कृपा मागूया.
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या एकट्याच्याने ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही.'
इस्राएल लोकही पुन्हा रडगाणे चालवून म्हणाले, “आम्हांला खायला मांस कोण देईल ? इजिप्त देशात आम्हाला मासे अगदी फुकट खावयाला मिळत त्याची आम्हांस आठवण होते; त्याचप्रमाणे काकड्या, खरबूजे, शाकभाजी, कांदे, लसूण, यांचीही आम्हांला आठवण होते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे, येथे काहीच नाही; येथे पाहावे तो ह्या मान्नाखेरीज काही एक दृष्टीस पडत नाही." हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. लोक चोहोकडे फिरून तो जमा करीत आणि जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. रात्री तळावर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्ना पडत असे.सर्व कुटुंबातील लोक आपआपल्या तंबूंच्या दाराशी येऊन रडत आहेत आणि त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला आहे, हे मोशेने ऐकले तेव्हा त्याला फार वाईट वाटले. मोशे परमेश्वराला म्हणाला “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, यावरून तुझी माझ्यावर कृपादृष्टी नाहीशी दिसते, असे का? तू मला सांगतोस की, जसा पिता तान्या बाळाला वाहून नेतो तसे तू त्यांना त्यांच्या पूर्वजांना मी शपथपूर्वक देऊ केलेल्या देशाप्रत आपल्या उराशी धरून घेऊन जा; तर मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे. काय? या सर्वांना मी प्रसवलो आहे काय ? या सर्व लोकांना पुरेल एवढे मांस मी कोठून आणू ? ते माझ्याकडे रडगाणे करत आहेत की, आम्हांला खावयास मांस दे. माझ्या एकट्याच्याने ह्या सर्व लोकांचा भार सोसवत नाही; तो मला अतिशय जड जात आहे. माझ्याशी असेच वर्तन ठेवण्याची तुझी इच्छा असली तर आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचे मारून टाक; माझी दुर्दशा मला पाहू देऊ नकोस.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८१:१२-१६
प्रतिसाद : देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान करा.
१) माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही,
इस्राएलने माझे ऐकले नाही,
ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या निष्ठुरतेप्रमाणे वागू दिले;
ते आपल्याच संकल्पांप्रमाणे चालले.
२) माझे लोक माझे ऐकतील,
इस्राएल माझ्या मार्गानी चालेल,
तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा बीमोड करीन,
त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन.
३) परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील,
पण इस्राएलचा काल अखंड राहील.
मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि
पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, “मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले, ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे.
शुभवर्तमान मत्तय १४:१३-२१
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने वर आकाशाकडे पाहून सर्व मासे आणि भाकरी आशीर्वादित करून मोडल्या आणि शिष्यांना आणि लोकसमुदायांना दिल्या.”
योहान बाप्तिस्ताच्या मरणाविषयी ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला आणि त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावात जाऊन स्वतः करिता खाण्यासाठी विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या." येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या. ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत." तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसायची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या, शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया आणि मुले होतीच.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : हेरोद राजाने योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद केला ही बातमी ऐकून येशू ताबडतोब निघाला व तारवात बसून अरण्यात एकांती गेला.. योहान बाप्टिस्ता हा येशूचा नातलग होता. योहान बाप्तिस्ताचे मरण हे येशूचे वैयक्तिक दुःख होते. येशूला एकांत हवा होता. पण लोक तर त्याच्या मागे मागे अरण्यात पोहोचले. येशू स्वतःचे दुःख बाजूला सारून दुखणाइतांना सामोरे गेला. त्यांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. पुष्कळ लोकांना त्यांने बरे केले. एवढेच नव्हे तर त्या भुकेलेल्या जमावाला अन्न सुद्धा दिले. केवळ पाच भाकरी व दोन मासे यांस आशीर्वाद दिला. पाच हजार, पुरुष, स्त्रिया व मुले तृप्त झाली. येशू किती मायाळू, किती दयाळू आहे. तो आपला वैदय आहे, आपला मेंढपाळ आहे. येशूचे सामर्थ्य किती महान आहे. जो येशूला स्वीकारतो, येशूच्या मार्गाने चालतो त्याला परिपूर्ण जीवनाचा आनंद मिळतो. जो स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्यांची दुःखे दूर करतो तोच येशूचा खरा सेवक आहे. हो ना ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, तू देत असलेल्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.
0 टिप्पण्या