Marathi Bible Reading | Tuesday 3rd August 2021 | 18th Week in Ordinary Time

          सामान्य काळातील 

अठरावा सप्ताह 

मंगळवार 

३ ऑगस्ट  २०२१


प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."

संत वॉल्थेऊफ
वर्तनसाक्षी ( ११६०)

एखाद्या गोष्टीचा सार्वकालिक जीवनासाठी मला काय लाभ होणार असा प्रश्न आपण सतत आपल्या मनाला विचारला पाहिजे. संत वॉल्थेऊफ


आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर मोशेला त्याचा विश्वासू आणि  निवडलेला नेता असे जाहीर करतो. मोशेविरुद्ध कूरकूर करणाऱ्यांना परमेश्वर  शिक्षा करतो मात्र मोशे त्यांच्यासाठी देवाकडे मनधरणी करतो. परमेश्वराच्या सेवकांवर परमेश्वराचा वरदहस्त असतो व तो त्याची बाजू सावरुन धरतो . 
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशू  स्वतः एकांती डोंगरावर प्रार्थनाकरावयास जातो. शिष्य रात्रीच्या प्रहरी समुद्रातील लाटांमुळे हैराण झालेले ! असताना प्रभू समुद्राच्या पाण्यावरून चालत त्यांच्या होडीजवळ येतो. घाबरलेल्या शिष्यांना प्रभू येशू म्हणत आहे, 'धीर धरा मी आहे, भिऊ नका.' संकटात, अडचणीत, आपत्तीत व आजारात किंवा अन्य बिकट परिस्थितीत असताना प्रभू येशूवरील आपला विश्वास आपण मजबूत करायला हवा.  प्रभू येशू सदैव आपल्याला सर्व अनिष्टांपासून सोडवू इच्छित आहे. प्रभूवरील अशा स्थिर विश्वासामुळे आपल्याही जीवनात चमत्कार पडू शकतो. आपल्या जीवनातील प्रभू येशूचे अस्तित्व  अनुभवण्यासाठी आणि प्रभूवरील विश्वासात दृढबनण्यासाठी आपण प्रेरणा मागू  या.

✝️             

पहिले वाचन :गणना १२:१-१३

वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मोशेसारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत जन्मला नाही; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली ?"

मोशेने कुशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम आणि अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकांतली स्त्री बायको करून घेतली आहे; ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय ? आमच्याशी पण नाही का बोलला?" परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन आणि मिर्याम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला, “तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या." तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन आणि मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, "माझे शब्द ऐका; तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे समोरासमोर बोलत असतो. गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरूद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली ?" परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला आणि तो तेथून निघून गेला; तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनने मिर्यामकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, "माझ्या प्रभो, आम्ही मूर्खपणाने वागून पाप केले. त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये,” मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, "हे देवा, कृपा करून हिला बरे कर.'

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ५२:३-७,१२-१३

प्रतिसाद : हे देवा आम्हावर दया कर.

१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून 
माझ्यावर कृपा कर, 
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून 
माझे अपराध काढून टाक. 
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक,
 माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.

२) कारण मी आपले अपराध जाणून आहे; 
माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. 
तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्ध मी पाप आहे; 
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.

३) म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील 
आणि निवाडा करशील तेव्हा निःस्पृह ठरशील. 
पाहा, मी जन्माचाच पापी आहे, 
माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे.

४) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; 
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. 
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस 
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
  प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे; तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १४:२२-३६

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."

'मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने लागलेच शिष्यांना पाठवून दिले; मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकान्ती गेला आणि रात्रभरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी त्याला समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून ते घाबरून गेले. ते भिऊन ओरडले. “भूत आहे" परंतु येशू त्यांना लागलीच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”

तेव्हा पेत्रने उत्तर दिले, “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा." त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला; परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभुजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?" मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा.'

नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रातांत माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी त्याला विनंती केली; आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन पहिल्या वाचनात आपण पाहातो, मो एकमेव संदेश आहे की ज्याच्या बरोबर देव आमने सामने बोलला. पण निर्याम बोलली की, देव माझ्याबरोबर सुद्धा बोलतो, तिच्या गर्वाची शिक्षा देवाने तिला दिली, निर्या कोडाने बर्फासारखी झाली, शुभवर्तमानात आपण पाहातो रात्रीच्या वेळी शिष्य तारवात होते, येशू पाण्यावरून चालत त्यांच्या जवळ पोहोचला, तरी शिष्यांनी त्याला ओळखले नाही, भूत म्हणून ते ओरडले. आपण नाही का एखाद्या छोट्याशा संकटात किंवा आजारात येशूवरील विश्वास हरवून बसतो, पण गनेसरेताच्या भागातील लोकांचा विश्वास किती दृढ आहे, "आम्हाला केवळ येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवू दे.” असे म्हणून जेवढे येशूच्या गोंड्याला शिवले ते सर्व बरे झाले. हीच खरी श्रद्धा आहे. जे श्रद्धेने येशूकडे मागतात त्यांना येशू देतो आणि भरपूर प्रमाणात देतो. आपल्या अंतःकरणात अशी श्रद्धा कधी निर्माण होईल ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, विश्वासाने तुला तारणारा म्हणून स्वीकारण्यास व सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या