सामान्य काळातील ३२वा सप्ताह
बुधवार
१० नोव्हेंबर २०२१
“उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
संत लिओ पहिले महान
परमगुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (-४६१)
✝️
हे प्रभो, तुझा क्रूस हा सर्व आशीर्वादांचा उगम व सर्व कृपादानांचा झरा आहे. त्यामध्ये श्रद्धावंतांना दुर्बळतेत शक्ती, अपमानात गौरव व सन्मान आणि मृत्यूमध्ये जीवन लाभते. संत लिओ महान.
आजच्या शुभवर्तमानातील दहा कुष्ठरोग्यांनी मोठ्या विश्वासाने प्रभू येशूकडे याचना केली, प्रभू येशू दयेचा अथांग सागर आहे. त्याने त्या कुष्ठरोग्यांवर दया केली आणि ते सर्व बरे झाले. त्या दहापैकी शोमरोनी म्हणजे परराष्ट्रीय असलेल्या माणसाने येशूला धन्यवाद दिले. तो शोमरोनी देवाचा महिमा वर्णीत आला, तो येशूच्या चरणावर पालथा पडला आणि त्याने येशूचे आभार मानले. देवाच्या कृपेबद्दल, दयेबद्दल, प्रेमाबद्दल आणि चांगुलपणाबद्दल आपण नेहमीच कृत्तज्ञ असायला हवे. आपले जिवंत असणे, चालणे, बोलणे हाच मोठा चमत्कार आहे.
आपल्या कठीण समयी, आजारपणात, दु:खात, अपयशात, निराशेत व संकटसमयी देवाची स्तुति आराधना करुन त्याच्या चरणी सर्वस्व समर्पित करु या.
✝️
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ ६:१-११
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
"राजांनो, ज्ञान काय ते जाणून घेण्यासाठी ऐका."
अहो, राजाधिराजांनो, ऐका आणि ध्यानात घ्या. दिगंतापर्यंत पृथ्वीचा न्याय करणाऱ्या न्यायाधीशांनो, लक्षात घ्या. असंख्य प्रजेवर राज्य करणाऱ्यांनो, तसेच अनेक राष्ट्रांचा अभिमान बाळगणाऱ्यांनो, कान देऊन ऐका. कारण प्रभूकडून तुम्हांला सत्ता मिळाली आहे. परात्पराकडून तुम्हांला वर्चस्व लाभले आहे. तोच तुमच्या कार्याचा हिशेब घेईल. तोच तुमच्या योजनांची चौकशी करील. त्याच्या राज्याचे सेवक असून तुम्ही योग्य रीतीने राज्य केले नाही, कायदे पाळले नाहीत, देवाच्या हेतूप्रमाणे तुम्ही चालला नाहीत, तर तो तुमच्यावर भयंकर रीतीने आणि त्वरीत चाल करील. कारण उच्चाधिकारावर असणाऱ्यांना कठीण कसोटीला तोंड द्यावे लागते. कारण सामान्य माणसाना दयेने क्षमादान मिळू शकेल, पण सत्ताधाऱ्यांची अत्यंत कडक परीक्षा घेतली जाईल. कारण सर्वांचा स्वामी प्रभू कोणाचे भय बाळगणार नाही, मोठ्यांना तो वेगळी वागणूक देणार नाही.मोठे आणि लहान त्यानेच निर्माण केले. तो साऱ्यांचा सारखाच विचार करील. मात्र अधिकाऱ्यांची कसून तपासणी होईल. जुलमी सत्ताधीशांनो, राजाधिराजांनो, म्हणून आपण जा, ज्ञान आत्मसात करा. तुमच्या हातून अपराध घडू नये म्हणून मी हे शब्द बोलत आहे. पावित्र्याने पवित्र गोष्टी पाळणारे पवित्र केले जातील. या गोष्टी आत्मसात करणाऱ्यांचे रक्षण होईल. म्हणून माझ्या शब्दांचीच तुम्ही अपेक्षा करा, त्यांचा ध्यास घ्या आणि तुम्हांला शिक्षण लाभेल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८२:३-४,६-७
प्रतिसाद :हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर.
१) गरीब आणि अनाथ ह्यांचा न्याय कर,
दीन आणि कंगाल ह्यांची दाद घ्या
गरीब आणि गरजवंत ह्यांना मुक्त करा,
दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.
२) मी म्हणालो, "तुम्ही देव आहा."
तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा.
तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल,
एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
शुभवर्तमान लूक १७:११-१९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करायला परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ?"
येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, "अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा, " त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, "तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो, असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? “आणि येशूने त्याला म्हटले," ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूच्या नजरेत करुणा व चांगुलपणाचा झरा सतत वाढत असतो. दहा कुष्ठरोगी त्यांच्यामध्ये असलेल्या पात्रतेमुळे ते शुद्ध झाले नाही तर येशूमध्ये असलेल्या त्या गुणांमुळे ते बरे झाले. कुष्ठरोग्यांत आदर दिसतो. दूरवर उभे राहून विनवणी करणे, येशूला गुरू ह्या नावाने हाक देणे व मंदिरातील पुरोहितांना जाऊन दाखवा या येशूने सांगितलेल्या गोष्टीचं पूर्णपणे पालन करणे ह्या गोष्टी येशू पाहतो. त्यांनी येशूकडे मानवी दृष्टीने दयेची भीक मागितली मात्र येशूने दैवी दृष्टीने त्यांनी मागितले त्याही पलीकडचे दिले. त्यांना समाजात वावरण्यासाठी आपल्या बांधवामध्ये आणले. येशूचा हा दैवी दयेचा गुण आम्हांस स्पर्जून जातो. दहापैकी एकजण येशूमध्ये देवाला पाहतो, हे त्याने लोटांगण घातले यामधून स्पष्ट होते. एक परकीय येशूकडे येऊन कृतज्ञता व्यक्त करतो हे त्याच्यासाठी मिळालेले फार मोठे दान आहे. जन्मापासून आपण ख्रिस्ती म्हणून समाजात वावरत आहोत. एक परकीय (शोमरोनी) माणसाप्रमाणे येशूमध्ये देवाला आपण पाहिले आहे का ? माझ्या जीवनात देवाने मला असंख्य कृपादाने दिलेली आहेत त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, सर्वदा तुझे आभार मानून तुला गौरविण्यासाठी मला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या