सामान्य काळातील ३२वा सप्ताह
गुरुवार
११ नोव्हेंबर २०२१
स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला.
टुअर्सचे संत मार्टिन
- महागुरू, वर्तनसाक्षी (३१६-३९७)
✝️
हंगेरीमधील पलोनिया नामक प्रांतात सुरक्षादलामध्ये मोठ्या हुद्यावर कार्य करीत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरी मार्टिनचा जन्म झाला. मार्टिनला गॉल शहरातील एमियन्स ह्या ठिकाणी राजकीय दरबारात भरती करण्यात आले. त्यावेळी तो केवळ १५ वर्षांचा होता.
एकदा आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्मशिक्षण तो घेत होता. त्याचा जबरदस्त पगडा त्याच्यावर बसला होता. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रँकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चॅपलमध्ये बरीच वर्षे जपून ठेवण्यात आला. ह्या घटनेनंतर आपल्याला लवकरच ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा मिळावा म्हणून मार्टिन धडपडू लागला. लवकरच त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने मिलिटरीमधून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो संत हिलरीच्या (सण १३ जाने.) संस्थेत दाखल झाला. पेव्हिया येथे कुटुंबांना भेटी देत असताना त्याला त्याची आई भेटली. तिचे मनपरिवर्तन करून त्याने तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. मात्र त्याच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.
दरम्यानच्या काळात एरियस नावाचा एक पाखंडी धर्मगुरू ख्रिस्तसभेमध्ये उदयास आलेला होता. त्याच्या मते पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समस्वरुपाच्या नसून एक दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हा विचार गॉल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला की संत हिलरी ह्यांनाच गॉल शहरातून हद्दपार करण्यात आले. आता त्यांची जागा मार्टिनने घेतली आणि तो भूमध्य समुद्राच्या किनारी एक साधू व मठवासी बनून जीवन जगू लागला.
इ. स. ३६१ मध्ये पुन्हा एकदा संत हिलरी ह्यांना बोलावण्यात आले आणि मार्टिन पुन्हा पोईटिएर्स येथे परतला. तेथे बरेचसे अनुयायी त्याला मिळाले. त्यांच्या सहाय्याने त्याने गॉलमधील पहिला बेनेडिक्टाईन मठ स्थापन केला. जिथे जिथे मूर्तिपूजेला स्थान आहे तिथे तिथे खऱ्या देवाची पूजा सुरू व्हावी ही मार्टिनची तीव्र इच्छा होती. म्हणून अधूनमधून तो आपला मठ सोडून प्रेषित कार्यासाठी संपूर्ण गॉल शहरात हिंडत असे.
अशा प्रकारे दहा वर्षे गेली. त्यानंतर मार्टिनला फ्रान्समधील टुअर्स नावाच्या शहरातून बोलावणे आले आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याला महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली. महागुरू म्हणून तो अत्यंत साधे आणि क्लेशमय जीवन जगत असे. इतर साधूसंतांना आपला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःसाठी एक वेगळी खोली बांधून घेतली होती, परंतु तिथेही त्याच्या खोलीभोवती इतर मठवाशांनी आपापले मठ उभारले. आजपर्यंत हा मठांचा समूह मारमोटूर इथे अस्तित्वात आहे.
रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील बरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे. मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.
चिंतन : हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.संत मार्टिन
देवराज्य अनुभवण्यास व सार्वकालिक जीवनाचे सहभागिदार बनण्यास आपण पात्र बनावेत म्हणून आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडू या -आणि देवाच्या ज्ञानाने आपले जीवन परिपूर्ण बनवू या.
✝️
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ ७:२२-८:१
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्ञान शाश्वत प्रकाशाचा कडवसा आहे, देवाच्या करणीचा एक निष्कलंक आरसा आहे."
चतुर, पवित्र, एकमेव, विविधांगी, सूक्ष्म, गतिशील, स्पष्ट, मंगल, वेगळा, अदाह्य, चांगल्या गोष्टींची आवड असणारा, तीक्ष्ण, अजिंक्य, लाभदायक, मानवीय, पक्का, खात्रीचा, निश्चित, सर्वसमर्थ, सर्वज्ञ तसेच शुद्ध असा साऱ्या आत्म्याचा ठाव घेणारा आत्मा ज्ञानाच्या ठायी असतो. ज्ञान कोणत्याही गतीपेक्षा अधिक गतिशील आहे. कारण त्याची शुद्धता साऱ्याच गोष्टींमध्ये प्रवेश करते व त्याचा छेद घेते. कारण देवाच्या सामर्थ्याचा तो श्वास आहे. सर्वसमर्थाच्या वैभवाचा तो शुद्ध स्फुरण आहे. त्यामुळे कलंकित असे काहीच त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्ञान शाश्वत प्रकाशाचा कवडसा आहे. देवाच्या करणीचा एक निष्कलंक आरसा. त्याच्या चांगुलपणाची प्रतिमा. जरी ते एकटेच असले तरी साय गोष्टी करणे त्याला शक्य असते. स्वयंसिद्ध राहून ते साऱ्याच गोष्टींना नवे करते. प्रत्येक पिढीमध्ये ते पवित्रजनांमध्ये स्वतः प्रवेश करून देवाचे भक्त आणि प्रवक्ते निर्माण करते. ज्ञानाच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांवर देव नक्कीच प्रेम करतो. कारण ज्ञान सूर्यापेक्षाही सुंदर आहे. तारांगणातील हरेक नक्षत्रांहून ते श्रेष्ठ आहे. प्रकाशाशी तुलना करता ते अधिक तेजोमय आहे. कारण दिवसानंतर रात्र येतेच पण दुष्टाई कधीही ज्ञानावर मात करणार नाही. ज्ञान पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोठ्या सामर्थ्याने पोहोचते, ते साऱ्या गोष्टींची सुव्यवस्था राखते.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९ : ८९-९०,९१,१३०,१३५-१७५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझे वचन सर्वकाळ अढळ आहे.
१) हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ अढळ आहे.
तुझी सत्यता पिढ्यान्पिढ्या आहे,
तू पृथ्वी स्थापन केली आणि ती तशीच कायम आहे.
२) तुझ्या निर्णयाविषयी म्हणावे तर
ते आजपर्यंत टिकून आहेत,
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त
होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.
३) तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड,
आणि तुझे नियम मला शिकव. माझा जीव वाचो,
म्हणजे तो तुझी स्तुती करील,
तुझे निर्णय मला सहाय्य करोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
शुभवर्तमान लूक १७:२०-२५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, 'पाहा, ते येथे आहे!'
देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता येशूने त्यांस उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, 'पाहा, ते येथे आहे!' किंवा 'तेथे आहे!' असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” त्यावर त्याने शिष्यांस म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांस दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे!' 'पाहा, येथे आहे!' तर तुम्ही जाऊ नका आणि त्यांच्यामागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या आगमनाच्या दिवशी होईल.. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे आणि ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: राज्य प्रभूचे शोधा आधी, जपा सदा त्याचे नाव ! सन्मार्गाने चाला नीट, सदैव गर्जा जयदेव । या गीताच्या ओळी जेव्हा आपण गुणगुणायला लागतो तेव्हा आपल्या मनात देखील देवाच्या राज्याविषयी संकल्पना आपण निर्माण करीत असतो. देवाचे राज्य केव्हा येईल? परूश्यांनी विचारलेला प्रश्न स्वाभाविकच होता. म्हणजे त्यासाठी काही दृश्य अशी चिन्ह आहेत का ? मनात एक ज्वलंत उत्कंठा होती, आपण बहकून जाऊ नये व चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये म्हणून ते येशूकडे विचारपूस करतात. देवाचे राज्य हे तुमच्यामध्ये आहे. आपल्या सत्कृत्यांना व नीतीच्या दिशेने जाणाऱ्या गोष्टींना विसरू नये तर जो देव आपल्यामध्ये वस्ती करतो त्याला आपणास मार्गदर्शन करण्यास व आपणावर अधिकार गाजवण्यास मुभा द्यायला हवी.
प्रार्थना :- हे स्वर्गीय पित्या, तुझे राज्य आम्हा मध्ये येवो व आम्हाला पूर्णात्वास येवो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या