Marathi Bible Reading | Friday 12th November 2021 |32nd week in ordinary Time |

             सामान्य  काळातील ३२वा सप्ताह 

शुक्रवार 

१२ नोव्हेंबर २०२१ 

“जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल."

संत जोसाफाट कुन्सेविच
- महागुरू, रक्तसाक्षी (१५८०-१६२३)

 ✝️  

सृष्टीतील अगाध सौंदर्य आणि अथांग वैभवाचे महत्त्व आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात आले आहे. पृथ्वीतलावरील ह्या सृष्टीसौंदर्याला आणि वैभवाला माणूस बऱ्याच वेळा भूलतो आणि त्यांनाच कसा देव मानू लागतो  खरे पाहता पृथ्वीतलावरील  सर्व सौंदर्य आणि वैभव न टिकणारे आहे.

प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात जीवनाची क्षणभंगूरता आणि खरे अविनाशी जीवन याबद्दल आपल्याला जाणीव करुन देत आहे. प्रभू म्हणतो, 'जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो  आपला जीव वाचविल.' प्रभू येशू ख्रिस्ताने खऱ्या वैभवशाली जीवनाचा मार्ग त्याच्या वचनाद्वारे आपल्याला दाखविला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या अंतिम समयी वैभवाने पुन्हा येणार आहे.
 त्याच्या स्वागतास आपण सदैव सज्ज असावे म्हणून आज प्रभू येशू आपल्याला  पूर्व सुचना देत आहे. प्रभूच्या येण्याची घटका आपल्याला माहित नाही म्हणूनच आपण त्याचे भय बाळगूण आपली नीतिमत्ता व पावित्र्य जपले पाहिजे.  स्वार्थत्याग, प्रेम व सेवा करुन जीवनात जागृत राहिले पाहिजे. केवळ जागतिक मोहजाळात न अडकता सतत स्वर्गीय सुखाचा शोध साठी आपण प्रयत्नशील बनू या.

✝️

पहिले वाचन : ज्ञानग्रंथ  १३:१-९
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन

"जर लोकांना जगाचा शोध घेता येतो, तर मग या साऱ्या गोष्टींच्या स्वामीला प्राप्त करून घेण्यात ते कसे कमी पडेल ?”

देवाबद्दल अज्ञानी असणारे सारेच स्वभावतः मूर्ख होते. दृश्य अशा चांगल्या वस्तूंवरून अस्तित्वात असणाऱ्या देवाला ओळखणे त्यांना शक्य झाले नाही. कारागिराच्या कलाकुसरीकडे पाहात असताना देखील त्यांना कारागिर ओळखता आले नाही. उलट अग्नी, वायू, वादळ, तारांगण तसेच पाण्यातील भोवरा आणि आकाशातील तेजोवलय यांना त्यांनी जगावर राज्य करणारे देव मानले. या वस्तूंच्या सौंदर्याने मोहित होऊन त्यांना त्यांनी देव मानले तर आता या साऱ्या वस्तूंचा उत्पन्नकर्ता आणि सौंदर्याचा निर्माता या साऱ्यांपेक्षा किती श्रेष्ठ आणि त्यांचा स्वामी आहे हे त्यांना कळू दे. जर लोकांना या वस्तूंच्या सामर्थ्याने आणि कार्याचे आश्चर्य वाटत असेल तर त्यांना या गोष्टीद्वारे कळून येवो की, साऱ्यांना घडवणारा आणखी किती तरी सामर्थ्यशाली आहे. कारण उत्पन्न केल्या गेलेल्या गोष्टींच्या सौंदर्यामुळे आणि त्यांच्या अगाधतेमुळे त्यांच्या निर्माणकर्त्याचे ज्ञान होते. तरीदेखील हे लोक काही प्रमाणात दोषी आहेतच. कारण देवाचा शोध घेत असता आणि त्याला मिळवण्याच्या प्रयत्नात ते कधीकाळी बहकले जातात. त्याच्या कार्याच्या सान्निध्यात राहताना ते शोध घेतात, ते जे पाहतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी सुंदर आहेतच. तथापि त्यांना देखील क्षमा करता कामा नये. जगाचा शोध घेता येतो हे जाणण्याची त्यांना शक्ती आहे, तर मग साऱ्या गोष्टींच्या स्वामीला प्राप्त करून घेण्यात ते कसे कमी पडले?
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १९:२-५

प्रतिसाद :  आकाश देवाचा महिमा वर्णिते

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
दिवस दिवसाशी संवाद करतो, 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

२) वाचा नाही, शब्द नाही,
 त्यांची वाणी ऐकू येत नाही, 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, 
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 तुम्ही आपली मने आज कठोर करू नका,
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १७:२६-३७

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसांपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते आणि लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते, परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी आणि गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल, त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. लोटच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बिछान्यावर दोघे असतील, एक घेतला जाईल आणि दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल आणि दुसरी तेथेच ठेवली जाईल." त्यांनी त्याला म्हटले, "प्रभो, कोठे?" त्याने त्यांना म्हटले, "जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनभीती माणसांना अस्वस्थ करीत असते. आजच्या लूककृत शुभवर्तमानातील वाचन देखील अशाच प्रकारची थोडी भीती निर्माण करीत आहे.नोहाचे तारू व सदोम प्रदेशामधून निघालेला लोट ह्या दोन उदाहरणाद्वारे प्रभूयेशू आम्हांस सावधगिरीचे संकेत देत आहे. नोहा व लोट या दोघांना फार कठीण परिस्थितीमधून जावं लागलं. लोकांनी वाईट मार्ग सोडून देऊन सत्याच्या दिशेने देवाकडे पश्चात्तापी हृदयाने जावे म्हणजे तो आपणास स्वीकारील अशी शिकवणुक ती देत गेले. लोकांनी पार्थिव जगातील गोष्टींच्या मोहात गुंतून पडू नये, सावध राहावे, लोटच्या बायकोचे भयानक उदाहरण नेहमी लक्षात ठेवावे. ज्यांनी स्वार्थी जीवनाचा त्याग केलेला आहे तेच यातून निभावून जातील. आपणा कुणाचाच नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. देवाच्या इच्छेला प्रमाण मानून स्वर्गीय राज्याचे भागीदार आपण सर्वजण व्हावेत म्हणून आजच्या दिवशी प्रभूकडे विशेष कृपा मागू या.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, सार्वकालिक जीवनाची रहस्ये जाणण्यास व तुझी वचने आचरणात आणण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या