Marathi Bible Reading | Saturday 13th November 2021 |32nd week in ordinary Time |

              सामान्य  काळातील ३२वा सप्ताह 

शनिवार 

१३ नोव्हेंबर २०२१ 

“देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात."



संत स्टॅनिस्लॉस कॉस्तका
वर्तनसाक्षी (१५५०-१५६८)
हृदय विकार, प्राणघातक आजार आणि अंत्यसंस्काराविना येणारे मरण ह्यावर मात करण्यासाठी संत स्टॅनिस्लॉस ह्याचा धावा केला जातो. बऱ्याच संस्थांमध्ये नवशिष्यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.
चिंतन : मी विशिष्ट वेळेसाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी जन्मलेलो आहे. -संत स्टॅनिस्लॉस
 ✝️  

संत मोनिकाने वाह्यात गेलेला आपला मुलगा ऑगस्टीन ह्याच्यासाठी  आणि नास्तिक असलेल्या आपल्या नवऱ्यासाठी रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना  केली. खचून न जाता निरंतर केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच. आजच्या शुभवर्तमानातील अत्याग्रही विधवेचा दाखला देऊन प्रभू येशूने आपले प्रार्थनामय जीवन कसे असायला हवे ह्याविषयी प्रबोधन केलेले आहे. 
सतत सकारात्मकतेने व श्रद्धेने प्रार्थना करीत राहिल्यास आपली प्रार्थना फलदायी बनते. प्रभू म्हणतो, 'सर्वदा प्रार्थना करावी.' सर्वदा म्हणजेच आपण जेव्हा विचार करतो, बोलतो-चालतो, काम करतो, प्रवासात असतो अशा प्रत्येक वेळी परमेश्वराचे नाम स्मरण आपण केले पाहिजे. प्रभू पुढे म्हणतो, 'देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात, त्यांचा तो न्याय करील.' म्हणजेच आपल्या प्रार्थनेला देव ठरविक वेळी निश्चितच उत्तर देईल. आपण सर्वजण देवाचे निवडलेले प्रजाजन आहोत. सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू आपणास जणू सांगत आहे की, कोणत्याही कठीण प्रंसगी आपण खचून न जाता परमेश्वराचा धावा करावा. त्याची वचने व त्याच्या आज्ञा म्हणजेच आपल्यासाठी शाश्वत कृपादान आहे.
प्रभू येशूच्या मार्गावरुन जीवनाचा रथ चालत असतांना आपणास प्रभूकडून शक्ती व कृपा मागू या. 

✝️

पहिले वाचन : ज्ञानग्रंथ  १८:१४-१६,१९:६-९
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तांबड्या समुद्रातून मोकळा रस्ता तयार झाला आणि लोक कोकरांसारखे उड्या मारत गेले."

साऱ्याच गोष्टींवर आता महान शांतता पसरली आणि द्रुतगतीने मध्यरात्र सरली होती. सर्वसमर्थ असा तुझा शब्द स्वर्गातून अवतरला, राजासनावरून शिक्षापात्र प्रदेशामध्ये उतरला तुझ्या आदेशाची खरी धारदार तलवार हाती घेऊन बलाढ्य योद्धा आला, तो उभा ठाकला. त्यानेच साऱ्या गोष्टी मरणाने व्यापून टाकल्या आणि पृथ्वीतलावर उभे असता तो स्वर्गाला टेकला कारण सारी सृष्टीच तिच्या स्वभावधर्मानुसार तुझ्या आदेशांमुळे पुन्हा नवी अशी करण्यात आली, तुझ्या पुत्रांना कोणतीही इजा होऊ नये. छावणीवर छाया पसरली आणि पूर्वी पाणी असलेल्या जागेवर कोरडी भूमी तयार झाली आणि तांबड्या समुद्रातून मोकळा रस्ता आणि उसळणाऱ्या लाटांच्या जागी गवताळ मैदान तयार झाले. तुझ्या बाहुबलाने संरक्षण झालेले ते सारे एक राष्ट्र म्हणून सागर पार झाले. अनेक आश्चर्यकारक कृत्यांकडे ते टक लावून पाहात होते. घोड्यांसारखी दौड करत आणि कोकरांसारखे टुणटुण उड्या मारत त्यांनी हे प्रभो, तुझी स्तुती केली, तूच त्यांची सुटका केलीस.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०५:२-३, ३६-३७,४२-४३

प्रतिसाद :  परमेश्वराने केलेली अद्भुत कृत्ये आठवा.

१) परमेश्वराचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, 
त्याच्या सर्व अद्भुतकृत्यांचे वर्णन करा. 
त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, 
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत 
त्यांचे मन हर्षित होवो.

२) त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथम 
जन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषाचे 
प्रथम फळ मारले. त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित
 बाहेर नेले. त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता.

३) कारण आपला सेवक आब्राहाम 
याला दिलेल्या आपल्या पवित्र 
अभिवचनाची त्याला आठवण होती.
 त्याने आपल्या लोकांना आनंद 
जयोत्सव करत बाहेर आणले.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत,
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १८:१-८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "देवाचे जे निवडलेले लोक त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करील."

त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भित नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन सांगत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण बराच काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवामला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.” तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय ? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. मात्र मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन‘प्रार्थनेत चिकाटी व सातत्य असावे' ही शिकवणूक त्या विधवा बाईकडून शिकावयास मिळते. सोर व सीदोन भागातील एक कनानी बाई (मत्तय १५:२२-२८), यरिहो येथील बार्तीमय (मार्क १०:४६-५२) ही दोन उदाहरणे देखील आपणास सातत्याने विनवणी करीत राहणे यांचा संदेश देतात. न्यायाधीश त्या विधवा बाईकडे दुर्लक्ष करतो कारण ती गरीब आहे व तिच्याकडून काही लाच मिळू शकणार नाही. मात्र चिकाटीने आपली वारंवार तक्रार सांगणे एवढेच तिच्या हाती होते. अनेकदा देवाकडे केलेल्या प्रार्थनेला उत्तर लगेच मिळते असं नाही. मात्र देवाकडे सादर केलेल्या प्रार्थना निष्फळ नसतात मुळीच. देव विशिष्ट वेळी हवं ते आपणास देत असतो. अडचणीच्या प्रसंगी आपणास हव्या असलेल्या वस्तू पूर्ण करणारे आपले मित्र - परिवार आपल्या संगती असतात. तर मग देवाचे लोक जेव्हा त्याला ते हाक मारतात, त्याचा धावा करतात तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी निश्चितच अधिक कार्य करील. आपल्या प्रार्थनेत सतत चिकाटी दिसून यावी म्हणून प्रार्थना करू या.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, संकटात, दुःखात व अपयशात असताना धैर्याने, श्रद्धेने व  चिकाटिने प्रार्थना करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या