Marathi Bible Reading | 33rd Sunday in ordinary Time |14th November 2021 |

          सामान्य  काळातील ३३वा रविवार 

१४ नोव्हेंबर २०२१ 

“तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. "


 ✝️  

 आजच्या पहिल्या वाचनात दानीएल संदेष्टा येणाऱ्या अंत समयाविषयी स्पष्टीकरण देत आहे. चार महत्वाच्या घटना त्यावेळी घडतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. (एक) त्या समयी मोठे संकट येईल. (दोन) ज्यांची नावे वहीत लिहिलेली असतील ते सर्व मुक्त होतील. (तीन) सर्व मृत माणसे जिवंत होतील. (चार) कित्येकांना सर्वकाळचे जीवन मिळेल तर कित्येकांना सर्वकाळचा धिक्कार मिळेल. शेवटी दानीएल सर्वांना सुज्ञतेने धार्मिक जीवन जगण्यासाठी आवाहन करीत आहे.

प्रभू येशू स्वतः परत येणार असून आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करणार आहे. आपली सर्वांची गणना निवडलेल्या लोकांमध्ये व्हावी म्हणून प्रभू येशू आपल्याला जागृत राहण्याचा सल्ला देत आहे. विशेषतः प्रभू येशू त्याची वचने आचरणात आणून सुज्ञतेने धार्मिक जीवन जगण्याचे आवाहन करीत आहे. प्रभू येशू स्पष्टपणे सांगत आहे की, 'आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.'

जागृत राहून प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व शेवटी अनंतकाळच्या जीवनात सहभागी होण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.  : हे प्रभू येशू, तुझी वचने शाश्वत जीवन देणारी आहेत. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन..

✝️

पहिले वाचन : दानियल १२ : १-३
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"जेव्हा ती वेळ येईल त्यावेळी तुझे सर्व लोक मुक्त होतील.”
तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्यासमयी येईल, तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे दप्तरात लिहिलेली आढळतील, ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा आणि सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील, अनेक लोकांना नीति-मार्गाकडे वळवणारे लोक युगानुयुगे ताऱ्यांप्रमाणे चमकतील.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १६:५,८-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर.

१) परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे, 
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस, 
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, 
तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.

२) माझे हृदय आनंदित झाले आहे, 
माझा आत्मा उल्हासतो, 
माझा देहही सुरक्षित राहतो कारण 
तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. 
तू आपल्या भक्ताला कुजण्याचा
 अनुभव येऊ देणार नाहीस..

३) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, 
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, 
तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.

दुसरे वाचन इब्री  १०:११-१४,१८

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले आहे."

प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून तो ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले शत्रू आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले आहे. तर मग जेथे पापांची क्षमा झाली तेथे तेथे पापांबद्दल अर्पणाचा प्रश्नच उरत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
  तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क १३:२४-३२

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मनुष्याचा पुत्र चार दिशांकडून आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातून तारे गळून पडतील आणि आकाशातील शक्ती डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने आणि वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.”“अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे, हे तुम्हाला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील, तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत."
“आणखी त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनतो जिवंत आणि मृतांचा न्याय करावयास पुन्हा येणार आहे.” अशा शब्दात आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनावरील श्रद्धा प्रत्येक रविवारी आणि सोहळ्याच्या मिस्सेमध्ये प्रकट करीत असतो. युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू कशाप्रकारे न्यायाधीश म्हणून अवतरणार आहे ह्याची कल्पना आजच्या वाचनात देण्यात आलेली आहे. 
१) येशू न्यायीपणाने व दयाळूपणाने जगाचा न्याय करीलः दानिएलच्या पुस्तकात “मानवपुत्र” ही कल्पना रेखाटण्यात आलेली आहे. परमेश्वर आपल्या प्रजेवर कसे अमर्याद प्रेम करतो त्याचे वर्णन आजच्या पहिल्या वाचनात करण्यात आलेले आहे. त्याच अमर्याद प्रेमापोटी व दयेखातर परमेश्वर आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी महादूत मायकल ह्याची नियुक्ती करील. न्यायकाळी ज्ञानी लोक तेजाने तळपतील आणि नीतिमान ताऱ्याप्रमाणे चमकतील. सर्व चांगुलपणाचा उगम असलेला परमेश्वर चांगल्या लोकांना सन्मानीत करील. 
२) येशूचे न्यायासन त्याच्या बलिदानावर व रक्तावर उभारलेले असेलः न्यायाधीश म्हणून येशू तरवारीच्या बळावर नव्हे तर आपले बलिदान व रक्त यावर आपले न्यायासन ग्रहण करील. आजचे दुसरे वाचन एक कठोर न्यायाधीश म्हणून नव्हे तर प्रेमळ मुक्तिदाता म्हणून येशूची प्रतिमा आपल्यासमोर सादर करते. त्याने पुष्कळांच्या खंडणीसाठी आपले रक्त सांडल्यामुळे आता तो देवाच्या उजवीकडे (अधिकाराने) बसलेला आहे. केवळ मानवजातीचे तारण करण्याच्या भावनेनेच तो सर्वांचा न्याय करण्यासाठी येणार आहे. 
३) येशूचे आगमन अकस्मात असेलः आजचे शुभवर्तमान युगाच्या समाप्तीसाठी घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देते. नैसर्गिक आपत्ती व देवदूतांचे येणे हे मानवाला सावध करण्यासाठी येतील. ती वेळ व ती घटका कोणालाही ठाऊक | नसल्यामुळे मानवाने दक्ष व जागृत राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे. मृत्यू येतो तो अचानक तसाच चोरही येतो तो सुद्धा अकस्मात. जीवनात पुष्कळशा गोष्टी अचानक घडतात. ध्यानी मनी नसताना अपयश येते, धंद्यात नुकसान होते, मित्र फसवतो आणि धक्कादायक बातमी कळते. त्यामुळे नित्य नवा दिस जागृतीचा हा मंत्र जोसापणे गरजेचे असते.

आत्मपरीक्षणः न्यायाच्या दिवसावर माझी खरोखर श्रद्धा आहे का? त्यासाठी मी माझ्या मनाची तयारी कशाप्रकारे करीत आहे ?

प्रार्थना :- : हे प्रभू येशू, तुझी वचने शाश्वत जीवन देणारी आहेत. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन..

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या