Marathi Bible Reading | Monday 15th November 2021 |33rd week in ordinary Time |

               सामान्य  काळातील ३३वा सप्ताह 

सोमवार 

१५ नोव्हेंबर २०२१ 

“मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?" 



संत आल्बर्ट महान
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२०६-१२८०)
चिंतनः जितको तुमची श्रद्धा मजबूत आणि प्रार्थना आग्रहाची असेल तितक्या अधिक प्रमाणात तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते देव तुम्हांला देईल.- संत आल्बर्ट महान

प्रभू येशूने त्याला प्रश्न विचारला, 'मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?' त्याने उत्तर दिले, 'मला दृष्टि प्राप्त व्हावी.' आणि प्रभूने म्हटले, 'तुला दृष्टि येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.' प्रार्थना, विनवणी, श्रद्धेची दृढता आणि परिवर्तनाची आशा बाळगणाऱ्याच्या जीवनात चमत्कार घडतो. आपला देवावरील विश्वास आपण  आज पडताळून पाहू या. आपण कोणत्या विशिष्ट हेतूसाठी प्रार्थना करतो?  आपला हेतू सफल होण्यासाठी आपण त्याग व समर्पण करतो का? देवाच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे आपण जीवन आचरण करतो का ?

आज आपण विश्वासाने आपले सर्वस्व प्रभू चरणी समर्पित करु या. जीवनात योग्य परिवर्तन व्हावे म्हणून अंत:करणापासून प्रभूकडे प्रार्थना करु या.

✝️

पहिले वाचन : मक्काबी  १: १०-१५,४१-४३,५४-५७,६२,६४
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"इस्त्राएलांवर भयंकर कोप भडकला होता." 

त्याच्या वंशात एक कुलांकर निपजला आणि तो म्हणजे राजा अंतिओखसचा पुत्र अंतिओखस एपिफनेस हा होय. हा रोममध्ये ओलीस होता. ग्रीक शकाच्या एकशे सदतिसाव्या वर्षी तो गादीवर आला.
त्याच काळी इस्राएल वंशात अराजकता माजवणारी माणसे उद्भवली, त्यांनी इतर लोकांना चिथवले. ते म्हणाले, "चला, आपण आपल्या भोवती विधर्मी लोकांशी करार करू. त्यांच्यापासून दूर राहिल्यानेच तर आपणांवर अनेक आपत्ती कोसळल्या आहेत. ही सूचना लोकांना आवडली. त्यांच्यातील काही उत्सुकतेने राजाकडे गेले. राजाने विधर्मी लोकांचे रितीरिवाज पाळण्याची अनुमती दिली. त्यांनी त्या विधर्मियांच्या मतांनुसार येरुशलेमात एक व्यायामशाळा बांधली, आपल्या सुंतेची खूण बुजवली, पवित्र करार झुगारून दिला, विधर्मियात मिसळले आणि वाईट मार्गाचा अवलंब केला.
मग राजाने आपल्या साऱ्या राज्याकरिता आज्ञापत्रक काढले. सगळ्यानी एक व्हावे, आपल्या जुन्या चालीरीती सोडून द्याव्यात. सगळ्या विधर्मियांनी त्या आज्ञापत्रकांचा स्वीकार केला आणि बऱ्याच इस्राएली लोकांनी त्यांचा धर्म आनंदाने स्वीकारला, त्या दैवतांना बळी दिले आणि शब्बाथाचे पावित्र्य भंग केले.
ग्रीक शकाच्या एकशे पंचेचाळीसाव्या वर्षी किस्लेव महिन्याच्या पंधराव्या तारखेला त्यांनी होमार्पणाच्या वेदीवर धृणित चिन्हाची प्रतिष्ठापना केली. यहुदा देशातील शहरात त्यांनी उंच देवस्थाने बांधली. घराच्या दरवाजात आणि रस्त्यावर धूप जाळला. धर्मशास्त्राचे जे ग्रंथपट सापडले ते त्यांनी फाडून जाळून टाकले. ज्यांच्या जवळ कराराचा ग्रंथ आढळला, त्यांना किंवा धर्मशास्त्राचा पालन करणारा जो कोणी सापडला त्याला राजाच्या हुकूमावरून मृत्यूदंड भोगावा लागे.
परंतु पुष्कळ इस्राएली लोक खंबीर राहिले आणि आपण अशुद्ध अन्न खाणार नाही असा त्यांनी दृढ निश्चय केला होता. अन्न खाऊन भ्रष्ट होण्याऐवजी किंवा पवित्र कराराला काळिमा लावण्याऐवजी त्यांनी मरण पत्करले आणि खरोखरच ते त्याप्रमाणे मेले. इस्राएलांवर भयंकर कोप भडकला होता.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११९:५३,६१,१३४,१५०,१५५,१५८

प्रतिसाद : प्रभो, मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेनुसार वागेन.

१) दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात,
 म्हणून मला फार संताप येतो. 
दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, 
तरी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.

२) मनुष्याच्या जुलुमापासून मला मुक्त कर, 
म्हणजे मी तुझे नियम पाळीन. 
दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत.
 ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.

३) तारण दुर्जनांपासून दूर आहे, 
कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय घेत नाहीत.
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. 
कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १८:३५-४३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ? प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी."

येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, "हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नाझरेथकर जवळून जात आहे." तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!" तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?" तो म्हणाला, "प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी." येशू त्याला म्हणाला, "तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णीत त्याच्यामागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनएका माणसाने संत मदर तेरेजा ह्यांना विचारले, "तुम्ही शोषित पीडितांमध्ये देवाला बघता. मग आम्हाला तो का दिसत नाही ?” तुम्ही डोळस आहात. तुम्हांस शारीरिक दृष्टीचे दान आहे मात्र देवाला पाहण्यासाठी अंतर्दृष्टी आवश्यक असते. मदरचे हे उद्गार हृदयाला स्पर्जून जातात. यरीहोजवळ भीक मागणारा हा मनुष्य शारीरिक दृष्ट्या अंध होता मात्र आध्यात्मिक दृष्ट्या त्याने पुकारलेल्या शब्दाने, ‘अहो, दाविदाच्या पुत्रा येशू' हा तारणारा आहे असा विश्वास त्याने धरला होता. येशूला मसिहा किंवा तारणारा म्हणून हाक |मारायला विश्वासाची जोड हवी. जमावाची पर्वा न करता हिंमतीने सत्य दुसऱ्यापुढे आणणे महत्त्वाचे आहे. त्याने एक मागितले येशूने त्यास विश्वास व त्याचबरोबर देहदृष्टी अशी दोन दाने त्याला दिली. येशूने दिलेल्या दानांचा चांगुलपणासाठी वापर करून येशूने केलेल्या कृत्याला न विसरता संपूर्ण येरुशलेमभर तो येशूच्या बरोबर प्रवास करतो. श्रद्धावंतांच्या प्रवासात देव जगतो व माणूसही जगतो, यावर आपला विश्वास आहे का?
प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत दृढ होण्यास व तुझी सुवार्ता । पसरविण्यास नवीन दृष्टी दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या