सामान्य काळातील ३३वा सप्ताह
मंगळवार
१६ नोव्हेंबर २०२१
“आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही आब्राहामचा पुत्र आहे."
मानवी जीवनातील दु:ख हे परमेश्वराचे वरदान आहे आणि हे दुःख सहनशीलतेने सहन करणाऱ्याला ईश्वरी कृपेचा विशेष लाभ होत असतो, अशी शिकवण तिने दिली.
१७ नोव्हे. १३०१ साली मरण पावलेल्या संत गड हिला स्पेनच्या राजाच्या विनंतीवरून वेस्ट इंडिजची आश्रयदाती म्हणून घोषित करण्यात आले.
चिंतन : माझ्यासारख्या पातकी व्यक्तीचा भार पृथ्वीमाता पेलत आहे हा माझ्या दृष्टीने देवाचा एक महान चमत्कार आहे. -संत गर्टुड
सर्वसमर्थ देवावर एलिआजर ह्या वयोवृद्ध शास्त्र्याची गाढ श्रद्धा होती. खऱ्या देवापासून भ्रष्ट बनवू पाहणाऱ्यांच्या दहशतीला न भीता एलिआजरने एकनिष्ठतेने देवावरील आपला विश्वास डळमळू दिला नाही. त्याला ठार मारण्यात आले परंतु त्याला नक्कीच तारणप्राप्ति झाली असेल.
आजच्या शुभवर्तमानात मुख्य जकातदार असलेल्या जक्कयचे कसे परिवर्तन झाले त्याचा वृतांत दिला आहे. समाजाच्या दृष्टीने जक्कय पापी माणूस होता, मात्र येशूला पाहण्यासाठी त्याची आंतरिक इच्छा होती, म्हणूनच तो रस्त्यावरील झाडावर चढला. प्रभू येशूने त्याची आंतरिक तळमळ जाणली. प्रभू येशूने म्हटले, 'आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.' जक्कयचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने भोजनाची मेजवानी दिली. प्रभूने त्याला म्हटले, 'आज ह्या घराला तारणप्राप्त झाले आहे.' जक्कयचे परिवर्तन झाले आणि पश्चात्तापी अंत:करणाने त्याने आपल्या पापांची भरपाई करण्याचा निश्चय केला.
ज्या क्षणाला आपल्याला प्रभूच्या सहवासात जाण्याची आंतरिक इच्छा होते, तेव्हा त्या इच्छेनुसार त्याला कृतीची जोड द्यावी. कारण प्रभू येशू आपल्यासाठी थांबून वाट पाहत असतो. प्रभू येशू आपल्या सर्वांच्या जीवनात, कुटुंबात व हृदयात वसती करुन तारण करण्यासाठी येत आहे. आपण तयार आहात का ?
✝️
पहिले वाचन : मक्काबी ६: १८-३१
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पवित्र रीतिरिवाजांसाठी कसे मरावे याचे उदाहरण मी ठेवत आहे."
एलिआजर हा एका उच्च स्थानी असलेला वयोवृद्ध आणि भारदस्त शास्त्री होता. त्याने डुकराचे मांस खावे म्हणून त्याच्यावर जबरदस्ती केली जात होती. भ्रष्ट जीवन जगण्यापेक्षा सन्मानीत मृत्यूचे आव्हान त्याने स्वीकारले. म्हणून त्याने तोंडातील मांस थुंकून टाकले आणि स्वतः होऊन छळ करण्यासाठी उभारलेल्या माचावर चढला. धैर्यवंतांनी जिवंत असण्याची तमा न बाळगता निषिद्ध अन्नाची चव घेऊ नये तर ते नाकारलेच पाहिजे.
विधी नियमाविरुद्ध केल्या जाणाऱ्या होमार्पणाची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनी एलिआजरला एका बाजूस नेले. कारण त्यांचे त्याच्याशी खूप दिवसांचे संबंध होते. खाजगीरीत्या त्यांनी त्याला विनंती केली की, आपल्या सेवनासाठी योग्य असे मांस आणावे आणि आपण राजाने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण केलेल्या भोजनातील मांस खात आहोत असा देखावा करावा, असे केल्याने तो स्वत:ला मृत्यूच्या दाढेतून वाचवणार होता आणि त्याच्या मैत्रीच्या पूर्वापार सबंधांमुळे त्याला दयाळूपणाची वागणूक मिळणार होती. परंतु त्याने त्याच्या वयोमानाला योग्य, त्याच्या वृद्धावस्थेत शोभणारा, त्याच्या पिकलेल्या केसांना साजेसा, मिळालेल्या प्रतिष्ठेला योग्य,बालपणापासून उत्कृष्ठ सदाचरणाला साजेसा आणि या सर्वांशिवाय देवाने दिलेल्या पवित्र नियमानुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपणाला तत्काळ अधोलोकात पाठवून द्यावे अशी स्वतःहून घोषणा गेली.
तो म्हणाला, "अशा प्रकारचा फसवा देखावा माझ्या आयुष्याला योग्य नाही, नाहीतर वयाच्या नव्वदाव्या वर्षी एलिआजरने परकीय धर्म स्वीकारला असे तरुण पिढीतील काही जण म्हणतील. आयुष्य थोडे दिवस अधिक लांबवण्याकरिता केलेल्या फसव्या देखाव्यामुळे त्यांना चुकीचा मार्ग दाखवला जाईल, मी भ्रष्ट होईन आणि माझ्या म्हातारपणात मला काळिमा लागेल. सद्य स्थितीची मानवी शिक्षा टाळण्याचा मी प्रयत्न करणार नाही, मी जगो किंवा मरो परंतु मी सर्वशक्तिमान देवाच्या हातून निसटणार नाही. म्हणून धैर्यान मी माझे जीवन संपवतो आणि मी माझ्या वृद्धपणाला लायक असल्याचे दाखवतो. पवित्र व पूज्य रीतिरिवाजांसाठी सन्मानाने आणि स्वखुषीने कसे मरावे याचे उत्तम उदाहरण मी तरुणांपुढे ठेवत आहे."
हे म्हटल्याबरोबर तो छळ करण्यासाठी असलेल्या माचावर चढला. थोड्यावेळापूर्वी जे त्याच्याशी सद्बुद्धीने वागले, त्यांच्यात बदल होऊन ते दुष्ट बुद्धीचे झाले. कारण जे शब्द त्याने उच्चारले होते ते त्यांच्या मते शुद्ध वेडेपणाचे होते. ठोशांखाली तो लवकरच मरणार होता, तेव्हा त्यांने कण्हत म्हटले, “मी माझे मरण टाळू शकलो असतो, हे त्याच्या • पवित्र ज्ञानाने प्रभू जाणतो. परंतु ह्या ठोशांमुळे माझ्या शरीरात भयंकर यातना उठत आहे, तथापि हे सोसण्यात मी प्रभूवे भय बाळगतो."
केवळ तरुणांनाच नव्हे तर ह्या संपूर्ण देशाला शौर्याचे एक स्मरण आणि उत्कृष्ठ आदर्श त्याने अशा प्रकारच्या मरणामुळे दिला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४:२-७
प्रतिसाद : मला परमेश्वराचा आधार आहे.
१) हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत!
माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत.
“ह्याला देवाच्या ठायी तारण नाही,"
असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत.
२) तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस,
तू माझा गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस,
मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो.
आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.
३) मी अंग टाकले आणि झोपी गेलो,
मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.
लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे,
मी त्यांना भिणार नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १९:१-१०
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला आहे."
येशूने यरिहोत प्रवेश केला आणि तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, "जक्कय त्वरा वरून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे." तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “हा पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला आहे.”
तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य गरिबांना देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर तर चौपट परत करतो." येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही आब्राहामचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपण शोधतो परंतु आपणाला सापडत नाही. मग आपण निराश होतो. येशूला पाहण्यासाठी जक्कयने केलेली धडपड व त्याने केलेला खटाटोप पाहता त्याच्यात येशूला पाहण्याची ओढ होती. येशूला पाहण्यासाठी तो स्वतःला विसरतो, तो काहीही करायला तयार असतो. येशूला पाहण्यासाठी त्यांच्यासमोर काही अडथळे असतात त्यांची तो पर्वा करीत नाही. पहिला अडथळा जमाव नंतर त्यांचा ठेंगुपणा, पुढे जाऊन आपण पाहतो की लोकांची उपेक्षा व चेष्टा स्वीकारायची जक्कयने केलेली तयारी. तसेच आणखी एक अडथळा म्हणजे त्याने आपली प्रतिष्ठा व दर्जा तो विसरतो (जेव्हा तो झाडावर चढतो). 'जक्कया, मला तुझ्या घरी उतरायचं आहे' या येशूच्या उद्गाराने जक्कय आनंदाच्या डोहात न्हाऊन निघाला. आपला जुना मार्ग सोडून देण्यासाठी त्याला कुठलाच अपमान वाटला नाही. येशूला भेटल्यामुळे आपल्याकडील अनेक ऐहिक गोष्टींचा त्याने त्याग केला. 'आज या घराला तारण प्राप्त झाले आहे.' जक्कयदेखील देवाच्या तारण प्रक्रियेत सहभागी झाला. येशूला पाहण्यासाठी मी काय काय सोडायला तयार आहे ?
प्रार्थना :-हे प्रभू येशू, ये आणि माझे परिवर्तन कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या