Marathi Bible Reading | Wednesday 17th November 2021 |33rd week in ordinary Time |

                 सामान्य  काळातील ३३वा सप्ताह 

बुधवार 

१७ नोव्हेंबर २०२१ 

"शाबास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासु राहिलास."


हंगेरीची संत एलिझाबेथ
विधवा (१२०७-१२३१)


माता आणि तिचे सात मुलगे ह्यांनी राजाची आज्ञा न मानता खऱ्या देवाबरोबर  एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, मात्र देवावरील श्रद्धेचे, भक्तिचे आणि निष्ठेचे ते सर्वजण आदर्श ठरले. आजच्या मक्काबीच्या वाचनातील हृदय द्रावक घटना आपाल्याला चिंतनपूर्वक वाचता येईल.
प्रभूयेशू आपल्याला परमेश्वराने सोपवलेली प्रत्येकाची कामगीरी विश्वासाने पार पाडण्यासाठी आवाहन करीत आहे. आपल्याला लाभलेले मानवी जीवन, ही परमेश्वराची महान देणगी आहे. देवाने प्रत्येकाला बुद्धीमता, शहाणपण, कला, कौशल्य, वैभव किंवा संपत्ती देऊन अधिक सक्षम बनवले आहे. आपल्याला मिळालेल्या देणग्यांचा वापर स्वत:साठी तसेच इतरांच्या भल्यासाठी व्हावा अशी योजना देवाने केलेली असते. आपल्याकडे असलेल्या वरदांनांचा वापर करुन देवराज्य पसरविण्यास आपण तयार असले पाहिजे. देवाने विश्वासाने ही  जबाबदारी प्रत्येकावर सोपवलेली आहे.
परमेश्वर प्रेमळ आहे परंतु तो शिस्तप्रिय आहे. आपल्याला मिळालेला सर्व कृपादानांचा वापर कसा करतो यावर आपण चिंतन करु या.  

✝️

पहिले वाचन : मक्काबी ७: १,२०-३१
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
 "सृष्टीकर्त्यापासून तुम्हाला जीव व श्वास परत मिळेल.'

एक घटना घडली. सात भाऊ आणि त्यांची आई यांना पकडण्यात आले, त्यांना चाबकांनी आणि आसुडांनी मारून नियमाविरुद्ध असलेले डुकराचे मांस खाण्यास राजाकडून बळजबरी केली जात होती.
प्रामुख्याने ती माता प्रशंसा आणि सन्मान्य स्मृतीस योग्य आहे. तिने एकाच दिवशी आपल्या सातही मुलांचा मृत्यू होत असताना पाहिला आणि तिने हे प्रभूवरील आशेमुळे मोठ्या धैर्याने सहन केले. ती त्यांच्यातील प्रत्येकाला आपल्या भाषेत उत्तेजन देत होती. ती धैर्यांने प्रेरित झाली. पुरुषी धैर्याने आपल्या स्त्रीबुद्धीवर मात करत ती म्हणाली, “माझ्या गर्भाशयात तुम्ही कसे अस्तित्वात आलात याची मला माहिती नाही. मी तुम्हाला जीव आणि प्राण दिला नाही, तुमचे अवयव मी घडवले नाही. म्हणून ज्या सृष्टीकर्त्याने मनुष्यमात्राची रचना केली आणि सर्व वस्तूंचे मूळ योजले त्याच्या दयेमुळे तुम्हांला जीव व श्वास मिळेल. कारण त्याच्या नियमांकरिता तुम्ही स्वतःला विसरला आहात.' आपल्याला तिरस्काराने वागवले जात आहे असे अंतिओखसला वाटले आणि तिच्या कान उघडणीच्या स्वराचा त्याला संशय आला. सर्वांत धाकटा भाऊ अद्याप जिवंत होता. अंतिओखसने केवळ शब्दांनीच त्याची विनवणी केली नाही तर शपथपूर्वक अभिवचन दिले. जर तो आपल्या वाडवडिलांच्या मार्गापासून ढळला तर अंतिओखस त्याला धनवान बनवील, त्याचे इष्ट करील, त्याला त्याचा मित्र बनवील. हा तरूण इसम आपले ऐकत नाही असे पाहून राजाने त्या मातेला त्याच्याकडे बोलावले आणि त्या तरुणाला त्याचा जीव वाचवता यावा म्हणून सल्ला देण्याची विनंती केली. राजाने स्वतः अनेक वेळा तिच्याकडे विनंती केल्यामुळे त्या मातेने आपल्या मुलाचे मन वळवण्याचे ठरवले. त्याच्या बाजूने ती झुकली. मात्र जुलूमी राज्यकर्त्याला तुच्छ लेखत आपल्या भाषेतून मुलाला म्हणाली, “माझ्या मुला, माझ्यावर दया कर. मी तुला नऊ महिने गर्भात वाढवले, तीन वर्षापर्यंत स्तनपान दिले. जीवनाच्या ह्या क्षणापर्यंत तुला आणले आणि तुझी काळजी घेतली. माझ्या वत्सा, मी तुला विनवते, स्वर्ग आणि पृथ्वीकडे बघ आणि त्यात असणाऱ्या वस्तूकडेही बघ. अस्तित्वात असलेल्या वस्तूंपासून देवाने त्यांना बनवले नाही हे पक्के ओळख. अशाच प्रकारे मानवजातही अस्तित्वात आली. ह्या खाटकाला घाबरू नकोस. मुळात तुझ्या भावाप्रमाणे वाग. मरणाचा स्वीकार कर म्हणजे देवाच्या कृपेमुळे तू तुझ्या भावांबरोबर मला परत मिळवशील."
ती बोलत आहे तोच तो तरुण म्हणाला, “तुम्ही कशाची वाट पाहता? राजाने दिलेली आज्ञा मी पाळणार नाही तर मोशेद्वारे आमच्या वाडवडिलांना दिलेल्या नियमशास्त्राची आज्ञा पाळणार आहे. परंतु तुम्ही, जी यहुदी लोकांविरुद्ध सर्व प्रकारची वाईट कृत्ये आचरली आहेत त्यांपासून अर्थातच देवाच्या हातून तुमची मुळीच सुटका होणार नाही.”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १७:१,५-६,८,१५
प्रतिसाद :   हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होते.

१) हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, 
माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 
माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.

२) माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत,
माझे पाय घसरले नाहीत. मी तुझा धावा करतो, 
कारण हे देवा, तू माझे ऐकतोस. 
माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक.

३ ) मला आपल्या पंखांच्या छायेत लपव.
मी तर नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडो,
मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मी मनापासून पाळावयास मला शिकव. 
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १९:११-२८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस?”

येशूने त्यांस एक दाखला सांगण्यास सुरुवात केली. तो येरुशलेमजवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते, म्हणून तो म्हणाला, "कोणी एक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा नोकरांना बोलावले आणि त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हांवर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले पाहावे म्हणून त्याने त्यांस आपणांकडे बोलावायला सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत." त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमावल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, "महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.ह्न तो त्याला म्हणाला, "अरे दुष्ट नोकरा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.ह्ण मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांस सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजळ दहा मोहरा आहेत. मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या शत्रूंच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांस येथे आणा आणि माझ्यादेखत ठार मारा. विश्वासू ह्या गोष्टी सांगून तो वर येरुशलेमकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनमोहरीच्या दृष्टांताद्वारे प्रभूयेशू आपल्यातील दडलेल्या कलागुणांचा वापर आपण कसा करावा तसेच जीवनात धोका पत्करायला तयार असायला हवं हे सूचित करतो. व्यावसायिक क्षेत्रात प्रत्येकजण गुंतवणूक करून मुबलक नफा मिळविण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर प्रवाहाबरोबर जाण्याऐवजी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहता आलं पाहिजे म्हणजे जीवनात धोका पत्कारायला तयारी दाखवावी. पहिल्या दोन दासांनी धोका पत्करला म्हणून मालकाने त्यांस मोबदला दिला. तिसरा दास मात्र आपले कलागुण - कौशल्य न वापरता आळशी बनून राहिला. पोप फ्रान्सिस सावधगिरीचा इशारा देताना म्हणतात, “पाचारण आळशी होण्यासाठी नाही पण काम करण्यासाठी आहे.” जीवनात कधी कंटाळा व कधी आळस ह्यामुळे आपण आशीर्वादित जीवनाला मुकतो. यशस्वी जीवनासाठी पहिल्या | दोन दासांप्रमाणे आपण आवश्यक तो धोका स्वीकारायला तयार आहोत का ?
प्रार्थना :-हे प्रभू, आम्ही विश्वासाने आमची जबाबदारी पार पाडावी व तुझ्या स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास पात्र बनावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या