Marathi Bible Reading | Thursday 18th November 2021 |33rd week in ordinary Time |

                  सामान्य  काळातील ३३वा सप्ताह 

गुरुवार 

१८ नोव्हेंबर २०२१ 

"येशू शहराजवळ आल्यावर येरुशलेमकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, "

संत पीटर व पौल महामंदिरांचे समर्पण

रोममध्ये व्हॅटिकन हिलच्या पायथ्याशी संत पीटरचे थडगे आहे. त्या थडग्यावर पोप संत अनाक्लेटस (इ. स.८३) ह्यांनी पहिल्या पोपच्या स्मरणार्थ एक इमारत उभी केली. इथेच पेत्राचे अवशेष पुरण्यात आलेले आहेत. मात्र इ.स. २५८ साली काही काळाकरता व्हेलेरियन ह्या क्रूर सम्राटाच्या छळाच्या कारकीर्दीत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ते अवशेष संत सेबेस्टीयनच्या ख्रिस्तमंदिरात ठेवण्यात आलेले होते. पुन्हा ते मूळ जागी आणण्यात आले.
कॉन्स्टन्टाईन राजाच्या काळात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मप्रसारास सुरूवात झाली. त्याने पेत्रच्या थडग्यावर एक भव्य महामंदिर उभारले. ब्रामान्ते आणि मायकल आंजेलो ह्यांनी आखलेल्या रचनेनुसार आज अस्तित्वात असलेले महामंदिर १६ व्या शतकात उभारण्यात आले.
संत पीटरचे महामंदिर हे जगातील सर्वात मोठे आणि ऐश्वर्यसंपत्र महामंदिर मानले जाते. एकाच वेळी या महामंदिरामध्ये ५०,००० भाविक उपासना व आराधनेसाठी एकत्र जमू शकतात. पोप अर्बन सातवे ह्यांनी १८ नोव्हेंबर १६२६ रोजी या महामंदिराचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन व समर्पण केले.
पोप अनाक्लेटस ह्यांनी संत पॉलच्या नावानेही एक इमारत उभारलेली
होती, ते एक छोटेखानी प्रार्थनामंदिर होते. रोमन कारकीर्दीत अशा प्रार्थनामंदिरांना अतिशय सन्मानपूर्वक हाताळले जाई. कॉन्स्टन्टाईनने संत पौलच्या थडग्यावर एक महामंदिर उभारले. इ.स. ३९५ साली ४०० फूट लांबीचे एक महामंदिर  त्याच ठिकाणी उभारण्यात आले. ते १८२३ पर्यंत अस्तित्वात होते. त्याला थिओडोशियन बॉसलिका असे नाव होते. परंतु १८२३ मध्ये ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

पुढे नव्याने उभारण्यात आलेल्या संत पौलच्या महामंदिराची रचना प्राचीन महामंदिराप्रमाणेच आहे. हे महामंदिर आकर्षकता आणि भक्तीच्या दृष्टीने संत पीटर महामंदिरापेक्षाही अधिक प्रभावी आहे. ते पोप पायस नववे ह्यांनी १८५४ साली आशीर्वादित केले. त्याच्या दोन दिवस आधीच पोपमहाशयांनी पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाविषयीच्या शिकवणुकीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले होते.

✝️

पहिले वाचन : मक्काबी २: १५-२९
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
 “आम्ही आमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे पालन करू."

लोकांना धर्मत्याग करण्यास भाग पाडणारे अंमलदार मोदीन शहरात येऊन थडकले. यज्ञ अर्पण करण्यास लोकांना बळजबरी करण्यासाठी ते आले होते. इस्राएलमधील कित्येक लोक त्यांच्याकडे आले, मताथियास आणि त्याचे पुत्रही तेथे हजर झाले. मग राजाचे अंमलदार मताथियासला म्हणाले “आपण या शहरातील पुढारी, मानसन्मानीत आणि थोर आहात. आपणाला आपल्या पुत्रांचे आणि बांधवांचे पाठबळ आहे. आता आपणच प्रथम पुढे होऊन राजाच्या आज्ञेप्रमाणे करा. सर्व विधर्मियांनी, यहुदा देशातील माणसांनी व येरुशलेमात शिल्लक राहिलेल्यांनी राजाज्ञा मान्य केली आहे. तसे केल्यास आपण व आपली मुले राजाचे मित्र समजले जातील. सोने, चांदी व इतर पुष्कळ नजराणे देऊन आपला व पुत्रांचा सन्मान केला जाईल."
परंतु मताथियास मोठ्याने उत्तर देत म्हणाला, “राजाच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व देशांनी जरी आज्ञा पाळली आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे ठरवले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण जरी आपल्या पूर्वजांच्या धर्मापासून दूर गेला, तरी मी, माझी मुले आणि माझे बांधव आमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे पालन करू. धर्मशास्त्र आणि विधीनियम यांचा आम्ही कधीही त्याग करणार नाही, आम्ही राजाज्ञा मान्य करणार नाही आणि आमच्या धर्माचरणापासून उजवीकडे व डावीकडे तसूभरही ढळणार नाही.”त्याने आपले हे म्हणणे संपवले तेव्हा एक यहुदी मोदीनं नगराच्या वेदीसमोर राजाज्ञेप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास सर्वासमक्ष पुढे झाला. त्या इसमाला पाहताच मताथियास आवेशाने तापला आणि त्वेषाने भडकला. त्याच्या सात्त्विक क्रोधाला वाट देत त्याने पळत जाऊन त्या माणसाचा त्याच वेदीवर वध केला. त्याचप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास बळजबरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही त्याने ठार केले आणि ती वेदी पाडून टाकली. धर्मशास्त्रावरील त्याचा हा आवेश सालूचा पुत्र जिग्री याला मारणाऱ्या पिनहाससारखा तीव्र होता.
मग मताथियासने शहरभर ऐकू जाईल अशी आर्त किंकाळी फोडून म्हटले, “ज्यांना धर्मशास्त्राबाबत चाड आहे आणि जेकराराची बाजू घेतात त्यांनी माझ्याबरोबर पळावे" मग तो व त्याचे पुत्र आपले सर्व काही शहरात सोडून डोंगरवटीत पळून गेले.
धर्म व न्यायनीती यांना अनुसरणारे अनेक जण आपली मुले, बायका आणि जनावरे घेऊन अरण्यात गेले आणि तेथे राहिले.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४९:१-२,५-६,१४-१५
प्रतिसाद :   सरळ मार्गाने चालणाऱ्यांना मी तारण प्राप्त करून देईन.

१) देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, 
त्याने सूर्याच्या उगवतीपासून 
मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.
सौंदर्याचा केवळ कळस असा 
जो सियोन डोंगर त्यावरून देव प्रकाशला आहे.

२) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, 
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा." 
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते. 
देव स्वतः न्याय करणारा आहे.

३) देवाला आभाररूपी यज्ञ कर, 
परात्परापुढे आपले नवस फेड 
संकटसमयी माझा धावा कर. 
मी तुला मुक्त करीन 
आणि तू माझा गौरव करशील.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे 
अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १९:४१-४४

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते!"
मग येशू शहराजवळ आल्यावर येरुशलेमकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, "जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील आणि तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीला मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनयरुशलेम शांतीचे नगर! या यरुशलेम शहराकडे पाहून येशूने शोकमय भविष्यवचन उच्चारले आणि वातावरणातील आनंद कोठल्या कोठे एका क्षणात लोप पावला. शांतीचा राजपुत्र म्हणजे प्रभूयेशू याची खरी ओळख त्यांना पटली नव्हती. येशूला तारणारा (मसिहा) म्हणून त्यांनी स्वीकारले असते तर खरी शांती तिथे प्रस्थापित झाली असती. येशूने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला होता. येशू सांगत होता त्यासंदर्भात त्यांनी आपली हृदये कठोर केली होती. कारण त्यांच्या संकुचित चौकटीत येशूच्या शिकवणुकीला जागा नव्हती. ही एक येरुशलेम नगरीची शोकांतिका होती. त्यांनी पश्चात्ताप केला नाही हीच एक मोठी उणीव दिसत होती. काही वेळा परमेश्वर त्याचं प्रकटीकरण वेगवेगळ्या चिन्हाद्वारे दाखवित आलेला होता मात्र आपण अंध होतो कारण सत्य स्विकारणं आपल्याला कटू जाते. त्याचे परिणाम म्हणजे येरुशलेमसारखी आपणदेखील सत्यापासून वंचित राहतो. तारणाऱ्याची ओळख करून घेण्यापासून कोणत्या गोष्टी आपल्याला दूर ठेवतात ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, पवित्र मंदिरात भक्तिभावाने तुझी उपासना करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या