Marathi Bible Reading | Friday 19th November 2021 |33rd week in ordinary Time |

                  सामान्य  काळातील ३३वा सप्ताह 

शुक्रवार 

१९ नोव्हेंबर २०२१ 

"माझे घर प्रार्थनेचे घर होईल."


अद्भूत चमत्कारकर्ता संत ग्रेगरी 

वर्तनसाक्षी, धर्मपाल ( २१५-२७०)

आशिया मायनर (तुर्कस्थान) येथील पंतय ह्या ठिकाणी मूर्तिपूजकांच्या घरी ग्रेगरी ह्याचा जन्म झाला व त्याचे बालपणही त्या वातावरणात गेले.थोड्याच अवधीत त्याला नवीन कैसेरिया धर्मप्रांताचे बिशप म्हणून नेमण्यात आले. त्या धर्मप्रांताचे त्यांनी ३० वर्षे समर्थपणे व यशस्वीरित्या नेतृत्व केले. त्यावेळी अक्षरश: १० ख्रिस्ती व्यक्तींसाठी एक बिशप नेमले जायचे. परंतु त्याच्या संपूर्ण धर्मप्रांतामध्ये मूर्तिपूजकांचा सुळसुळाट असतानाही १७ व्यक्ती अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इ.स. २७० पर्यंत ख्रिस्ती धर्माला चिकटून राहिल्या हे विशेष म्हणावे लागेल.

संत ग्रेगरीला अद्भुत चमत्कारकर्ता म्हणतात, कारण त्याच्याद्वारे देवाने असंख्य चमत्कार घडवून आणलेले आहेत. निस्साच्या संत ग्रेगरी ह्यांनी त्याचं चरित्र रेखाटले आहे. “श्रद्धेचे महात्म्य" ह्या आपल्या साहित्य निर्मितीमध्ये ग्रेगरी ह्यांनी सार्वकालिक जीवन, अतिपवित्र त्रैक्यामधील समानता व परिपूर्णत्व ह्याचे वर्णन केलेले आहे. पूर आणि संकटकाळी संत ग्रेगरी ह्यांचा धावा केला जातो.

 आजच्या पहिल्या मक्काबीच्या वाचनात आपण पाहतो की परराष्ट्रीयांनी सिनाय पर्वतातील पवित्रस्थान उध्वस्त केलेले होते. यहुदा व त्याचे  भाऊ ह्यांनी शत्रुला नष्ट केल्यावर पवित्र स्थानाची, वेदीची पुनर्बाधणी करुन नवीन  मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली. धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे पुरोहितांची नेमणूक करुन मंदिराच्या समर्पणाचा सण साजरा करण्यात आला. मंदिराचे  पावित्र्य व त्यातील वेदीचे गांभीर्य यहुदाने जाणले आणि देवाचे घर खरोखरच| प्रार्थनेचे घर बनावे म्हणून दक्षता घेतली.

यरुशलेमध्ये प्रभू येशू आल्यानंतर त्याने मंदिरात जाऊन मंदिराची पवित्रता भ्रष्ट करणाऱ्या सर्वांना तेथून हाकलून लावले. मंदिर हे देवाचे वस्तीस्थान आहे. मंदिरात मानव आणि देव ह्यांचे प्रेमपूर्ण मिलन होत असते. अशा ह्या मंदिराची व्यापाऱ्यांनी आणि कर वसूल करणाऱ्यांनी दुरावस्था केलेली होती. मंदिर हे चोरांची गुहा बनले होते आणि लोकांना फसविण्याचा व्यापार त्यामध्ये चालला होता. देवा धर्माच्या नावाखाली मंदिरात छुप्या पद्धतीने अशा प्रकारची भ्रष्टता चालत होती. म्हणूनच प्रभू येशूख्रिस्ताने मंदिरात चाललेल्या व्यापाराला आणि मंदिर भ्रष्ट करणाऱ्यांना घालवून लावले. मंदिराची पवित्रता राखणे सर्वस्वी पुरोहित आणि मंदिरात येणाऱ्या भक्तगणांवर अवलंबून आहे.
आपण आज आपल्या देहरुपी मंदिरावर चिंतन करु या. कारण संत पौल म्हणतो, 'तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करितो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. तेच तुम्ही आहात' (१ करिंथ ३:१६-१७).

✝️

पहिले वाचन : १ मक्काबी ४: ३६-३७,५२-५९
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
“लोकांनी वेदीसमर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ अर्पण केले."

यहुदा व त्याचे भाऊ म्हणाले, “पाहा, आपले शत्रू नष्ट झाले आहेत. चला आपण वर जाऊ." मग सर्व सैन्य गोळा झाले आणि ते सियोन पर्वतावर गेले. ग्रीक शकाच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या वर्षी नवव्या महिन्याच्या म्हणजेच किस्लेव महिन्याच्या पंचविसाव्या तारखेला अगदी सकाळी ते उठले आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे होमयज्ञासाठी नव्याने बांधलेल्या वेदीवर यज्ञ अर्पण केला. त्याच ऋतूच्या त्याच दिवशी परराष्ट्रीयांनी वेदीस भ्रष्ट केले होते. त्यांनी भावगीते गाऊन, सतार, बासरी आणि टाळ या वाद्यांच्या घोषात वेदीची पुन्हा प्रतिष्ठापना केली. त्यावेळी सर्व लोक पालथे पडले. त्यांनी उपासना केली आणि त्याची भरभराट करणाऱ्या स्वर्गीय प्रभूला धन्यवाद दिले. आठ दिवसपर्यंत त्यांनी वेदी समर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ व सुटका झाल्याबद्दलचा यज्ञ अर्पून स्तुती गायिली. मंदिरांच्या समोरील भाग सोन्याचे मुकुट आणि लहान लहान ढाली लावून सजवला. फाटके पुन्हा बसवली, पुरोहितांच्या खोल्या पुन्हा बांधल्या व त्यांना दारे लावली. लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही, अशा प्रकारे परराष्ट्रीयांकडून झालेला अपमान त्यांनी भरून काढला.

यहुदा, त्याचे बंधू आणि इस्राएलच्या सर्व मंडळींनी एकमते ठरवले की, प्रतिवर्षी ह्याच ऋतूत म्हणजे किस्लेव महिन्याच्या पंचविसाव्या तारखेपसून तर पुढील आठ दिवसापर्यंत वेदीच्या समर्पणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १ इतिहास २९ : १०- १२बकड
प्रतिसाद :प्रभो, आम्ही तुझ्या प्रतापी नामाची प्रशंसा करतो.

१) हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल याच्या देवा,
 तू सदासर्वकाळ धन्य आहेस.

२) हे परमेश्वरा, 
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही 
तुझीच आहेत. आकाशात आणि 
पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.

३) हे परमेश्वरा, राज्यही तुझेच आहे, 
तू सर्वांहून श्रेष्ठ आणि उन्नत आहेस. 
धन आणि सन्मान तुझ्यापासून प्राप्त होतात.

४) तू सर्वांवर प्रभूत्व करतोस, सामर्थ्य 
आणि पराक्रम तुझ्याच हाती आहेत, 
लोकांना थोर करणे आणि सामर्थ्य देणे 
हे तुझ्याच हाती आहे


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १९:४५-४८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "माझे घर तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. '

येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, "माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे."
तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे पुढारी हे त्याचा घात करायला पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनसर्वसामान्य माणसासाठी मंदिर म्हणजे देवाचं घर ! ज्याठिकाणी देवाचा भक्त, देवाची भक्ती करण्यासाठी पाऊल टाकतो. देवाच्या घराचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. मंदिराला बाह्य गोष्टींचा कलंक लागू नये. ऐहिक गोष्टीचं स्वरूप येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. येरुशलेममध्ये जे मंदिर होते तिथे यहूदी लोक प्रार्थना करायचे. मात्र नंतर प्रार्थनेच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी त्यांनी मंदिराला व्यापाराचं रूप दिलं. म्हणून येशूने त्यास खडसावलं, “तुम्ही माझे प्रार्थनेच घर एक लुटारूंची गुहा बनवलेली आहे.” जेव्हा आपण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी मंदिराचा दुरूपयोग करतो तेव्हा आपण करीत असलेली उपासना मंदिरात खरेदी विक्री करण्यासारखी फसवी असू शकेल. परमेश्वराबरोबर असलेल्या आपल्या संबंधांना बऱ्याचवेळी सौदेबाजीचे रूप प्राप्त होते व एखाद्या किराणा मालाच्या दुकानदारासारखे आपण त्याच्याबरोबर वागतो. देवाच्या मंदिरा बरोबरचे माझे वैयक्तिक संबंध कसे आहेत ?

प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तुला शुद्ध अंतःकरणाने स्वीकारण्यास व तुझ्याशी  एकरुप होण्यास मला कृपा दे,आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या