Marathi Bible Reading | Saturday 20th November 2021 |33rd week in ordinary Time |

                   सामान्य  काळातील ३३वा सप्ताह 

शनिवार  

२० नोव्हेंबर २०२१ 

"पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत."


वालोइसचे संत फेलिक्स
वर्तनसाक्षी (११२७-१२१२)

आजच्या पहिल्या वाचनात स्पष्टपणे विदित केले आहे की अंत्युखियस राजाने केलेल्या अन्यायाचा आणि अत्याचाराचा त्याला पश्चाताप झाला. कारण त्याने परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांचा छळ करुन पवित्र स्थानांची लूट केली  जिवंतांच्या परमेश्वराची जाणीव त्याला अंतिम समयी झाली.
आजच्या शुभवर्तमानात सदुक्यांनी पुनरुत्थानाविषयी विचारलेल्या प्रश्नाला प्रभू येशूने समर्पक उत्तर देत म्हटले, 'पुनरुत्थान प्राप्त करुन घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करुन घेणार नाहीत व लग्न करून देणार हि नाहीत, ते 'देवदुता समान आहेत.' प्रभूने पुढे म्हटले, 'परमेश्वर मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे.' पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे सार्वकालिक जीवनाची आशा निर्माण झाली. प्रभू येशूच्या  वधस्तंभावरील यातना, समर्पण, मरण आणि पुनरुत्थान ह्यामुळे सर्वांचे तारण झाले आहे. प्रभू येशूने म्हटलेच आहे, 'पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो ते मेला असला तरी जगेल.' प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर विश्वासणाऱ्या सर्वांचे पुनरुत्थान आहे.
आपले मानवी जीवन क्षणभंगूर आहे. प्रत्येकाला मृत्यु अटळ आहे आणि  मृत्युनंतरही जीवन आहे. मात्र त्यासाठी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या  आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन जगणे आवश्यक आहे. प्रभू वरील विश्वासात दृढ बनून जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास प्रभूकडे धैर्य व कृपा मागू  या.

✝️

पहिले वाचन : १ मक्काबी ६: १-१३
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
"येरुशलेममध्ये केलेल्या दुष्कृत्यांमुळे माझाकरूण अंत होत आहे."

राजा अंतिओखस वरच्या प्रांतातून जात असता त्याने ऐकले की, पर्शिया देशातील एलिमाईस नगर सोन्या-चांदीने समृद्ध व प्रसिद्ध आहे. त्यातील मंदिर धनसंपन्न आहे. फिलीपचा पुत्र आणि मकिदुनियेचा राजा सिकंदर याने त्या मंदिरात सोन्याच्या ढाली, उरस्त्राणे आणि हत्यारे ठेवली होती. त्यानेच प्रथमच ग्रीसवर राज्य केले. म्हणूनच अंतिओखस आला आणि त्याने त्या नगराला हस्तगत करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्याला शक्य झाले नाही. कारण त्याचे बेत नगरातील रहिवाशांना अगोदरच कळले होते, त्यांनी त्याला लढाईत प्रतिकार केला. म्हणूनच अंतिओखस मोठ्या दुःखाने तेथून बाबिलोनकडे परत गेला.
पर्शियामध्ये असताना कोणी एकाने त्याला असा वृत्तांत सांगितला की, जी सेना यहुदा देशावर चाल करून गेली होती तिची दाणादाण झाली आहे. लिसियस बलाढ्य सेना घेऊन चढाई करून गेला. परंतु त्याचा पराभव झाला आणि तो यहुदी लोकांसमोरून पळून गेला. शत्रूसैन्यांची कत्तल केल्यावर त्यांची शस्त्रे काढून घेतली. अन्नाचा पुरवठा आणि अमाप संपत्ती घेऊन यहुदी लोक बलाढ्य बनले आहेत. येरुशलेमच्या मंदिरावर जे घृणित चिन्ह उभारले होते ते त्यांनी पाडून टाकले. पूर्वीप्रमाणे पवित्र स्थानांच्या भोवती उंच भिंती बांधल्या. बेथझूर हे त्यांचे नगरसुद्धा त्यांनी बांधून काढले.
ही बातमी ऐकल्यावर राजाला धक्काच बसला आणि तो फार घाबरला. आपल्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही म्हणून तो फार दुःखी झाला आणि त्याने अंथरूण धरले. दुःखाची छाया त्याच्यावर पूर्ण पकड धरून होती. म्हणून तो कित्येक दिवस बिछान्यावर पडून राहिला. आपला मरणकाळ जवळ आला आहे असेही त्याला वाटू लागले तेव्हा त्याने आपल्या मित्रांनाबोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “माझ्या डोळ्यांवरील झोप उडाली आहे आणि चिंतेमुळे माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे." मी स्वतःशीच म्हणालो, “कसली आपत्ती कोसळली माझ्यावर! कोणत्या दुःखसागरात मी बुडालो आहे! माझ्या हाती सत्ता असताना मी तर दयाळू आणि प्रेमळ होतो."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :२-४,६, १६ व १९
प्रतिसाद : तुझ्या तारणदायक साहाय्याबद्दल मला आनंद होतो. 

१) मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन, 
तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. 
मला तुझ्या ठायी हर्ष आणि उल्हास होईल.
हे परात्परा, मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन. 

२) माझे शत्रू मागे फिरले की ठोकर खातात,
 तुला पाहून नाश पावतात, 
तू राष्ट्रांस धमकावले आहेस, 
तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस..

३) राष्ट्रांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात 
त्यांचेच पाय गुतले आहेत, 
गरजवंतांचे नेहमीच विस्मरण होणार नाही,
दलितांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २०:२७-४०

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा देव आहे."
पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यातून काही जणांनी जवळ येऊन येशूला विचारले, "गुरुजी, मोशेने आम्हांसाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ आपली बायको जिवंत असता निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. बरे, सात भाऊ होते. त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली आणि तो निःसंतान असा मेला. मग दुसऱ्याने ती केली आणि तिसऱ्यानेही, ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले. शेवटी ती स्त्रीही मेली, तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती. येशूने त्यांना म्हटले, "ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. परंतु ते युग आणि मेलेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करुन घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून देणारही नाहीत आणि पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. मोशेनेही झुडुपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला आब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शविले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहेत." तेव्हा शास्त्र्यातील काही जणांनी म्हटले, "गुरुजी, ठीक बोलतात, " मग ते त्याला आणखी काहीही विचारण्यास धजले नाहीत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनसदुकी हा यहुदी लोकांचाच एक गट होता. हे लोक याजकांच्या घराण्यातील श्रीमंत, प्रतिष्ठित वर्गातील सुखी समाधानी होते. पारंपारिक, सनातनी, मोशेच्या पुस्तकांवर आधारित धर्माचे आचरण करीत पण त्याचा धर्म व आचार केवळ पोकळ होता. त्यांचे विचार परुश्यांहून भिन्न होते. पुनरुत्थान व देवदूत आणि आत्मे हे त्यांना मूळीच मान्य नव्हते (प्रे. कृ. २३:८). सदुक्याच्या प्रश्नाला येशूने उत्तर दिले की, पुनरुत्थानातील स्थिती पृथ्वीवरल्या अवस्थेप्रमाणे नाही. येशूच्या नंतरच्या प्रतिसादामध्ये सदुक्याचे लक्ष जळणारे झुडूप या गोष्टीकडे वेधतो. यामधून आपणास आपल्या विश्वासाचा मोठा पुरावा तो म्हणजे आपला देव मृतांचा नसून जिवंताचा देव आहे, अशी शिकवणूक पुढे येते. बऱ्याचवेळी आपल्यापैकी काही जण मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी इतके चिंताग्रस्त होतात की ते ह्या पृथ्वीवरील जीवन पूर्णतः जगण्यास विसरून जातात.

प्रार्थना :- हे प्रभू येशू, पुनरुत्थानाचे रहस्य जाणण्यास व श्रद्धेत वाढण्यास
आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या