Marathi Bible Reading | Sunday 21st November 2021| Feast of Christ The King

          सामान्य  काळातील ३४वा रविवार 

किंवा शेवटचा रविवार 

विश्वराजा प्रभू येशू ख्रिस्त याचा सोहळा

२१ नोव्हेंबर २०२१ 

 "माझे राज्य ह्या जगाचे नाही,


 ✝️  

 यहेज्केल संदेष्ट्याने स्पष्ट केले आहे की धार्मिक, सामाजिक आणि  राजकिय स्तरावर अराजकता व अस्थिरता आलेली आहे (यहेज्केल२२:२३-३०). तीच स्थिती आजसुद्धा आहे, कारण सर्व स्तरावर अन्याय,  अत्याचार, भ्रष्टाचार व दहशतीचे राज्य आहे. ही स्थिती पूर्वापार चालत आलेली  आहे. सामान्य जनांना वेठीस धरून राज्यकर्ते, राजे, धर्माचे पुढारी राज्य  प्रस्थापित करु पाहत आहेत. हे सर्व जगाचे राज्य आहे.

प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात पिलाताला सांगत आहे,  'माझे राज्य ह्या जगाचे नाही. पहिल्या वाचनात दानीएल संदेष्ट्यांने दृष्टांतात  म्हटले आहे की, 'त्याचे प्रभूत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी  आहे.' प्रभू येशूचे राज्य प्रेमाचे, शांतीचे, सेवेचे, परोपकाराचे व देवाच्या सामर्थ्याचे आहे. प्रभू येशूचे राज्य स्वर्गीय आनंदाचे व वैभवाचे राज्य आहे. ह्या  जगातील क्षणभंगूर राज्याशी त्याची तुलना करता येत नाही. आज विश्वाचा  राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा सोहळा साजरा करीत असताना आपण त्याच्यापुढे  नतमस्तक होऊ या. प्रभूला आपण शरण जाऊ या. ह्या जगातील विनाशकारी  राज्याचे पुढारी व राज्यकर्ते ह्यापासून फारकत घेऊन प्रभू येशूला आपला राजा  म्हणून स्वीकारू या.

प्रभू येशूला आपला तारणदाता, मुक्तीदाता व राजा म्हणून स्वीकार करीत असताना त्याच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन आचरण  करण्यासाठी प्रेरणा मागू या. सार्वकालिक राज्यात प्रवेश मिळावा म्हणून अति  पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंताची आराधना करु या. त्याच्या राज्याची सुवार्ता  पसरविण्यासाठी प्रयत्नशील बनू या.  

✝️

पहिले वाचन : दानियल ७ : १३-१४
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “त्याचे प्रभुत्व अक्षय आहे."
मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९३:१,२,५
प्रतिसाद : परमेश्वर राज्य करतो.

१) परमेश्वर राज्य करतो, 
त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. 
परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे.

२) म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.
तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे.
तू अनादिकालापासून आहेस.

३) तुझे निर्बंध अभंग आहेत, 
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.

दुसरे वाचन प्रकटीकरण  १:५-८

वाचक :प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"पृथ्वीवरील राजांचा अधिपती ख्रिस्त ह्याने आपल्याला राज्य आणि आपला देव ह्याच्यासाठी याजक असे केले."

येशू ख्रिस्त हा विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हांला पापातून मुक्त कलेले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन, पाहा, तो मेघांसहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्यांच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन.
    प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार, जो सर्वसमर्थ तो म्हणतो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
  प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान  १८:३३-३७

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १८:३३-३७

 “मी राजा आहे असे आपण म्हणता."

पिलात येशूला म्हणाला, “तू यहुद्यांचा राजा आहेस काय ?" येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता, की दुसऱ्यांनी आपणांला माझ्याविषयी सांगितले?" पिलाताने उत्तर दिले, "मी यहुदी आहे काय ? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?" येशूने उत्तर दिले, "माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे आणि मी सत्याविषयी साक्ष द्यावी ह्यासाठी जगात आलो आहे. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनख्रिस्तसभा आज विश्वाचा राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा यथोचित सन्मान करीत आहे. राजा म्हटल्यानंतर शक्यतो आपल्या नजरेसमोर पृथ्वीवरील राजाचे चित्र उभे राहते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे राजेपद वेगळे आहे. 
१) विश्वव्यापी राजेपदः पृथ्वीवरील राजांना एक भौगोलिक मर्यादेपर्यंत राज्य करता येते. मला संपूर्ण जग जिंकायचे आहे अशी फुशारकी मारणारा सिकंदर (आलेक्झांडर) इतर अनेक राजांपेक्षा महान ठरला खरा परंतु तो संपूर्ण जग जिंकू शकला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे राजेपद सर्व देशाच्या व राज्यांच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. म्हणूनच त्याला राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू अशा शब्दात गौरविले जाते. 
२) स्वर्गीय राजेपदः स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार, राज्य व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा म्हणून देवाने त्याला अत्युच्च केले आहे आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. त्यामुळेच “तू राजा आहेस काय ?” ह्या पिलाताच्या प्रश्नाला उत्तर देताना येशूने म्हटले, “होय. परंतु माझे राज्य ह्या जगाचे नाही.” येशूचे राजेपद स्वर्गीय आहे. तो स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. 
३) आध्यात्मिक राजेपदः इटलीमध्ये जेव्हा बेनेटा मुझोलिनीने आपल्या हुकुमशाहीचा बडगा लोकांवर उभारलेला होता तेव्हा लोकांना येशूच्या आध्यात्मिक राजेपदाची आठवण करून देण्यासाठी पोप अकरावे पायस ह्यांनी १९२५ साली नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा ख्रिस्ताराजाचा सण म्हणून जाहीर केला. १९६० साली पोप तेविसावे जॉन ह्यांनी त्या सणाला प्रथम श्रेणीचा दर्जा दिला. तर पोप सहावे पॉल ह्यांनी १९६९ साली ह्या सणाला सोहळ्याचा दर्जा देऊन उपासना वर्षाचा कळस म्हणजे उपासना वर्षातील शेवटचा रविवार हा ख्रिस्तराजाच्या सोहळ्याचा दिवस म्हणून जाहीर केला. संपूर्ण दिवसभर अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करून शेवटी मिरवणूक, खास प्रवचन व आशीर्वाद देऊन ख्रिस्ताचे आध्यात्मिक राजेपद साजरे केले जाते. 
आत्मपरीक्षणः माझ्या जीवनात कोण किंवा काय राज्य करीत आहे. ख्रिस्ताचे राजेपद मी कितपत आणि कशाप्रकारे स्वीकारले आहे? ख्रिस्त माझ्या हृदयाचा राजा बनलेला आहे का? कशावरून?

प्रार्थना :- : हे विश्वाच्या राजा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला शरण येण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या