सामान्य काळातील ३४वा सप्ताह
सोमवार
२२ नोव्हेंबर २०२१
"हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे."
संत सिसिलिया
कुमारिका, रक्तसाक्षी (२५०)
संत सिसिलिया हिचा जन्म दुसऱ्या शतकाच्या अखेरीस आलेक्झांडर सेवेरस ह्या सम्राटाच्या कारकीर्दीत रोममध्ये झाला. बालपणापासून तिला संगीत कलेची विलक्षण आवड होती. तशी ती एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्माला आली होती; परंतु तिला ख्रिस्ती वातावरणात लहानाचे मोठे करण्यात आले. लहानपणीच तिने केवळ देवाच्या प्रेमाखातर कुमारिका राहण्याचा निर्णय घेतलेला होता. ती उपवास, प्रायश्चित्त आणि सर्व प्रकारची दयाकृत्ये करीत असे. परंतु तिच्या पालकांची मात्र तिच्यासाठी वेगळीच योजना होती. त्यांनी तिचे लग्न व्हेलेरियन नावाच्या एका सरदारपुत्राशी ठरविले आणि मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात ते पार पडले.
लग्नाच्या सायंकाळी आपल्या कानात लग्नाचे वाधसंगीत घुमत असतानाच आपण देवाकरिता आमरण कुमारिका राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तिने स्वत:शी नूतनीकरण केले. रात्री जेव्हा ती आपल्या पतीसह आपल्या निजावयाच्या खोलीत गेली तेव्हा तिने धीर करून त्याला 'हटले. "मला आपणांस एक गुपित सांगावयाचे आहे. आपणास ठाऊक असेलच की देवाचा एक दूत माझ्यावर लक्ष ठेवून आहे. जर आपण माझ्याशी वैवाहिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तो कोपिष्ट होईल आणि आपणास भयंकर यातना भोगाव्या लागतील आणि जर आपण माझ्या कौमार्याचा आदर राखला तर माझ्याप्रमाणे तो देवदूत आपणावरही प्रेम करील व आपले रक्षण करील.' "
एक शूर सरदारपुत्र अशा प्रकारच्या भावनिक आव्हानाला सहज बळी पडणारा नव्हता, उलट त्याने सिसिलिया हिला तो देवदूत कुठे आहे तो आपणास दाखविण्याची विनंती केली आणि जर आपणास तो देवदूत दिसला तर आपण सिसिलियाची विनंती आयुष्यभरासाठी मान्य करण्याचे वचन त्याने दिले.
त्यावर सिसिलियाने उत्तर दिले की, “जर आपण एकाच खऱ्या व जिवंत
देवावर विश्वास ठेवून स्नानसंस्काराचे पाणी स्वीकारलेत तर आपणांस तो
देवदूत दिसू शकेल." उत्सुकतेपोटी व्हेलेरियनने तेही मान्य केले.
सिसिलियाने व्हेलेरियन ह्याला विशप अर्बन ह्यांच्याकडे पाठविले. त्यांनी व्हेलेरियनला बाप्तिस्मा दिला आणि आनंदाश्चर्याने तो थक्कच झाला. आपल्या घरी परतत असतानाच सिसिलिया एका पांढऱ्या शुभ्र देवदूताच्या शेजारी उभी असलेली त्याच्या दृष्टीस पडली. तो देवदूत व्हेलेरियनच्या जवळ आला आणि त्याने दोघांच्या मस्तकावर गुलाब व जुईच्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी केली.
ह्या संपूर्ण घटनेने व्हेलेरियन अंतर्बाह्य पालटून गेला. त्याने आपल्या भावालाही ख्रिस्ती श्रद्धेचे शिक्षण दिले. त्याचा भाऊ तायबेर्शियस ह्याचीही श्रद्धा दृढ झाली. शेवटी दोघांनी आपल्या रक्तसाक्षित्वाद्वारे आपल्या श्रद्धेवर शिक्कामोर्तब केले. पण अमाल्विअस नावाच्या सेनापतीने त्यांचा शिरच्छेद केला.
त्या दोघांचे मृतदेह पुरून परतलेल्या सिसिलिया हिला सेनापतीने बोलावून घेतले आणि आपली श्रद्धा पायदळी तुडविण्याचा तिला आदेश दिला. सेनापतीच्या धमक्यांना न जुमानता सिसिलिया उत्तरली, "मी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे हे तुला ठाऊक नाही काय?" हे उत्तर ऐकून अपमानित झालेला सेनापती रागाने लालबुंद झाला. त्याने तिला एक संपूर्ण दिवस गुदमरून ठेवले आणि एक संपूर्ण रात्र उकळत्या पाण्यात डुंबवून ठेवले तरीही तिच्या शरीराला यत्किंचितही इजा पोहोचली नाही. शेवटी तिच्या डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले. त्यामुळे ती तीन दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिलेली होती. तिला भेटी देणाऱ्या सर्वांसाठी ती प्रार्थना करीत होती आणि मोठ्या कळकळीने ख्रिस्ताची शिकवण देत होती.
शेवटी ती देवाचे गुणगौरव गात मरण पावली. उपासना संगिताची आश्रयदाती संत म्हणून तिला गौरविण्यात आलेले आहे.
चिंतन: "ख्रिस्तासाठी मरण्याइतके दुसरे काहीही मला अधिक आनंदी करणारे नाही हे आपणांस ठाऊक नाही का?" - संत सिसिलिया
दान देणाऱ्यांना देवाचा आशीर्वाद विकत मिळत नाही तर त्याच्या कृपेचा ओघ सुरु होत असतो.
गरीब विधवेने जसे स्वतःला रिक्त केले व देवाचा आशीर्वाद मिळवला तसेच आपण सुद्धा मोकळ्या मनाने सुवार्तेसाठी व गरजवंतांसाठी दान देण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन :दानिएल १:१-६.८-२०
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“राजाला दानिएल, हनन्या, मिशाएल आणि अजऱ्या यांच्या तोडीचे कोणी दुसरे दिसून आले नाहीत."
यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकीर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने येरुशलेमवर चढाई करून त्याला वेढा घातला. प्रभूने यहुदाचा राजा यहोयाकीम याला त्याच्या हाती दिले, त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्याने ती शिनार देशी आपल्या दैवतांच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली. राजाने आपला खोजांचा नायक अश्पनज याला आज्ञा केली की, इस्राएली राजकुलापैकी आणि सरदार घराण्यापैकी, अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या आणि भाषा शिकवावी. राजा खात असे त्या मिष्टान्नातून आणि पीत असे त्या द्राक्षरसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या दिमतीस यावे, अशी राजाने आज्ञा केली. ह्या तरुण मंडळीत यहुदा वंशातील दानिएल, हनन्या, मिशाएल, आणि अजऱ्या हे होते. राजा खात असे ते मिष्टान्न आणि पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणांस विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलने मनाचा निश्चय केला, म्हणून त्याने खोजांच्या सरदाराची विनंती केली ही मला यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदारांनी दानिएलवर कृपा आणि दया व्हावी असे देवाने केले. खोजांचा सरदार दानिएलला म्हणाला, "माझा धनी, राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे, त्याचा मला धाक आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणापैकी तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावी? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा?” तेव्हा खोजांच्या सरदाराने दानिएल, हनन्या, मिशाएल आणि अजय यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्यांना दानिएलने म्हटले, “दहा दिवस आपल्या ह्या नोकरावर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांस खायला शाकान्न आणि प्यायला नुसते पाणी मात्र दे. नंतर आमची तोंडे पाहा, आणि राजघरचे अन्न खाणाऱ्या तरुणांचीही तोंडे पाहा, मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या नोकरांचे कर." त्याने त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला. दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न आणि द्राक्षरस देण्यास बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला.
या चौघा तरुणांना देवाने सर्व विद्या आणि ज्ञान यात निपुण आणि प्रविण केले. दानिएल हा सर्व दृष्टान्त आणि स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखद्नेस्सर राजाने त्यांना आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती, ती संपल्यावरखोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले, तेव्हा राजाने त्याच्याबरोबर भाषण केले, त्या सर्वामध्ये दानिएल, हनन्या, मिशाएल, आणि अजऱ्या यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत, म्हणून ते राजाच्या दिमतीस राहू लागले, ज्ञानाच्या आणि विवेकाच्या बाबतीत राजा त्यांना जे काही विचारी त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा आणि मात्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्यांना दिसून येई.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ५२-५६
प्रतिसाद : सर्वकाळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे.
१) हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या देवा, तू धन्य आहेस!
सर्वकाळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे.
तुझे वैभवशाली आणि पवित्र नाम धन्य.
त्याची मोठी स्तुती आणि सर्वकाळ प्रशंसा होवो.
२) तुझ्या पवित्र वैभवाच्या मंदिरामध्ये तू धन्य
त्याची वाखाणणी होवो, त्यांचे वैभव सर्वकाळ पसरो.
३) गर्तेतही दृष्टी टाकणाऱ्या, तू धन्य,
तुझी स्तुती आणि सर्वकाळ प्रशंसा होवो..
४) आकाशमंडलातील तू धन्य,
सर्वकाळ तुझी गीते गाईली जावोत
आणि तुझी प्रशंसा होवो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २१:१-४
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने एका गरीब विधवेलाही तेथे दोन छोटी नाणी टाकताना पाहिले."
येशूने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका गरीब विधवेलाही तेथे दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानभांडारात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: दोन प्रकारची माणसं भांडारात दान टाकतात. धनवानांनी आपल्या विपुलतेतून दिलं. त्यांनी किती दिलं हे मात्र इथ नमूद नाही. मात्र गरीब विधवेने दिलेलं दान याची नोंद आहे. तिने दोन नाणी टाकली. इतरांसाठी अगदी क्षुल्लक वाटणारी रक्कम तिने दान केली. देवाच्या दृष्टीने तिने सर्वात मोठ दान दिल कारण देव दान किती मोठ आहे ते किती रक्कम दिली त्यावरून नव्हे तर देणाऱ्याजवळ दिल्यानंतर काय शिल्लक राहिले त्यावरून ठरवतो. तिच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही. संपूर्णपणे आपले उत्पन्न देवाला दिले. तिच्या या कृतीवरून आपणास शिकावयास मिळते ते म्हणजे आता सर्वस्वी देवावर अवलंबून राहावे. तिने आपणास लूक १४:३३ मधील वचनाची आठवण करून दिली की, “जोपर्यंत तुम्ही सर्वस्वाचा त्याग करीत नाही तोपर्यंत तुम्हांला माझा शिष्य होता येणार नाही.” पुढील वाक्यावर मनन कराः “त्यांनी त्यांच्या विपुलतेतून दिले पण तिने मात्र तिच्या गरजेतून दिले. त्यांनी देणग्या दिल्या पण तिने स्वतःचे सर्वस्व दिले.”
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या असंख्य दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो , मुक्त हस्ताने दान करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या