Marathi Bible Reading | Tuesday 23rd November 2021 | 34th week in ordinary Time |

                     सामान्य  काळातील ३४वा सप्ताह 

मंगळवार  

२३ नोव्हेंबर २०२१ 

"तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा."



संत क्लेमेंट पहिले
पोप, रक्तसाक्षी, धर्मपाल (१००)

 आज दानीएलाने नबूखडनेसर राजाला त्याच्या  स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे. सुवर्णाचे शीर असलेल्या सामर्थ्यशाली राजाचे  वैभव नष्ट होईल असा संदेश दानीएलाने दिला, कारण अनेकजण खऱ्या  देवापासून बहकलेले होते.
प्रभू येशू युगाच्या समाप्तिवेळी घडणाऱ्या गोष्टींविषयी शिष्यांबरोबर बोलत असताना, त्यांना निर्वाणीचा संदेश देत आहे की, 'तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा.' पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी जगाच्या अधिपतींने म्हणजेच सैतानाने भल्या माणसांना भूलवून रसातळाला नेले आहे, ह्याची उदाहरणे पाहायला मिळतात. कमकुवत मनाच्या आणि उथळ विश्वास असणाऱ्यांच्या अंतःकरणातील देवाचे वचन काढून टाकण्यास सैतान सतत प्रयत्नशील असतो. प्रभू येशू ख्रिस्त अशा सर्व बहकविणाऱ्यांपासून आपल्याला सावध करीत आहे.
आपल्या सभोवताली कॅथोलिक ख्रिस्तसभेपासून फारकत घेतलेली, अख्रिस्ती, निधर्मी अशा अनेकांचे गढूळ धार्मिक वातावरण आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन राहणीमान व वैश्विकीकरणाचा प्रहार आपल्यावर होत  असताना देवावरील श्रद्धा आपण मजबूत करण्यासाठी कृपा सामर्थ्य मागू या.

✝️

पहिले वाचन :दानिएल  २:३१-४५
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही, तर ते राज्य इतर राज्यांना नष्ट करील.”

दानिएल नबुखद्नेस्सर राजाला म्हणाला, “महाराज, आपण दृष्टांत पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य आणि तेजःपुंज असा आपणापुढे उभा होता, त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती आणि हात रुप्यांचे, त्याचे पोट आणि मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे आणि त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा आणि काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहात कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला आणि त्या पुतळ्याच्या लोखंडी आणि मातीच्या पावलांवर आदळून त्याचे फुटून तुकडेतुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे आणि सोने ह्याचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुशाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.

"हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजूरास आम्ही सांगतो, महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल आणि वैभव ही दिली आहेत आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपली सत्ता ठेवली आहे. सुवर्णाचे शीर आपणच आहा. आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल, ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवील. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल, लोखंड सर्वांचा चुरा करते तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. आपण त्या पुतळ्याची पावले आणि पावलांची बोटे पाहिली त्यांचा काही भाग कुभांराच्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, तसे हे राज्य द्विविध होईल. तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबूती राहील. त्या पुतळ्याच्या पावलांची बोटे काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होती तसे ते राज्य अंशतः वळकट आणि अंशतः दुबळे असे होईल. लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले, तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर नातेसंबंध जोडतील, पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत. त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही, तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील आणि ते सर्वकाळ टिकेल. आपण स्वप्नात असे पाहिले की, कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे आणि सोने यांचे चूर्ण केले. त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजूरास कळवले आहे. हेच आपले स्वप्न आणि त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ५७-६१
प्रतिसाद :  त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

१) प्रभूच्या साऱ्या कृत्यांनो, त्याला धन्यवाद द्या,
 त्याची स्तवने गा, आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा, 
प्रभूच्या दूतांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

२) तारामंडळांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
मेघातील जलांनो, प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
साऱ्या सत्तांनो, प्रभूला धन्यवाद द्याः 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून आलेलुया ! सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:५-११

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"चिऱ्यावर चिरा राहणार नाही".

मंदिर उत्तम पाषाणानी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी काहीजण बोलत असता येशूने म्हटले, “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही." तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि ज्याकाळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?” तो म्हणाला, "तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे आणि तो काळ जवळ आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.
मग त्याने त्यांना म्हटले, "राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनलूककृत शुभवर्तमानातील आजचे वाचन अंतिम समय दर्शविते. "गुरुजी ह्या गोष्टी कधी होतील व त्याचे चिन्ह काय?" हा प्रश्न  विचारणारा जमाव किंवा शिष्य उदासीन वाटतो. येशू त्यांना प्रतिसाद देतो परंतु कुठल्या वेळी घडेल हे सांगत नाही. तीन प्रकारची ताकीद त्यांच्या समोर ठेवतो. १) स्वतःला बहकू न देणे व येशूच्या नावाने येणारे खोटे मसिहा (बहुरुपी) यावर विश्वास न ठेवणे. २) खोट्या बहुरुप्याचे त्यांनी अनुकरण करू नये. ३) युद्ध व अतिक्रमण याविषयी ऐकून त्यांनी भिऊ नये कारण देवराज्य साकार करण्यासाठी ते होणे आवश्यक आहे. ज्या युगात आपण राहतो ते युग मायावी व कधी बहकून टाकील अशातले आहे. येशूच्या नावाने येऊन तो मीच आहे असं भुरळ घालून नक्कल करणाऱ्या माणसापासून नेहमी जागृत असावे. इतर पंथियाचे मोहजाल व भोंदूगिरी आपणाला येशूपासून दूर घेऊन जाऊ शकते.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुजपासून बहकून न जाता तुझ्यावरील विश्वास सतत वाढत राहावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या