Marathi Bible Reading | Wednesday 24th November 2021 | 34th week in ordinary Time |

                     सामान्य  काळातील ३४वा सप्ताह 

बुधवार    

२४ नोव्हेंबर २०२१ 

" “तुम्हाला साक्ष देण्याची संधि मिळेल.'

संत ॲन्ड्रयु डंगलॅक व सहकारी

 दानीएल हा राजदरबारी देवाचा संदेष्टा म्हणून कार्यरत होता. विशेषत:  त्याने स्वप्नांचा अर्थ सांगून राजाला मार्गदर्शन केले. प्रसंगी कठोर शब्दात  दानीएलने राजाची कानउघडणी केली. दानीएलने त्याला प्राप्त वरदानांचा 
उपयोग करून खऱ्या देवाबद्धल साक्ष दिली.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमचा विध्वंस आणि  युगाची समाप्ति ह्याचे भविष्य सांगत आहे. त्याप्रसंगी घडणाऱ्या सर्व घटनांचे वर्णन प्रभूने शुभवर्तमानात केले आहे. येणाऱ्या संकटांना व आव्हानांना सामोरे  जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना धीर देऊन मार्गदर्शन केले. मोठमोठी विध्वंसक चिन्हे घडण्याआधी ख्रिस्ती जनांचा छळ केला जाईल. सुवार्ता सांगणाऱ्यांना न्यायासनांसमोर आणले जाईल तरी प्रभू येशू म्हणतो, 'तुमच्या डोक्याच्या एका केसाचाहि नाश हेणार नाही.' ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात येशूची सुवार्ता पसरविणाऱ्या अनेकांना छळ, निंदा, अपमान व भयानक मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. मात्र प्रभू येशूच्या धीर देणाऱ्या वचनांमुळे त्यांना पवित्र आत्म्याची शक्ति मिळाली. 
आपल्या कुटुंबात, शेजोळात, गावात, तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना ख्रिस्ताची सुवार्ता कशी सांगता येईल ह्यावर चिंतन करु  या. सुवार्ता प्रसाराची व साक्ष देण्याची संधि सर्वानाच लाभली आहे.

✝️

पहिले वाचन :दानिएल  ५:१-६,१३-१४,१६-१७,२३-२८
वाचक :"मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि त्यांनी भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले."

    बलशेस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली. त्या हजारांसमक्ष तो द्राक्षरस प्याला. 
    द्राक्षरसाचे सेवन करत असता बलेशस्सरने हुकूम केला की, माझा बाप नबुखद्नेस्सर याने येरुशलेमातील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी आणि उपपत्नी यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. तेव्हा येरुशलेमातील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी आणि उपपत्नीही त्यातून द्राक्षरस प्याली. त्यानी द्राक्षरस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड लाकूड आणि पाषाण यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.
    त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राजाच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली आणि तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.
    तेव्हा दानिएलला राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, "माझा बाप जो राजा त्याने यहुदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानिएल तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, देवाचा आत्मा तुझ्याठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्याठायी दिसून आली आहेत. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा सांगता येतो आणि कोडी उकलता येतात. आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतीतला एक होशील."
    तेव्हा दानिएलने राजाला उत्तर दिले की, "तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणाला दे, तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ करून त्याला सांगतो. स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत. तू तुझे सरदार, तुझ्या पत्नी आणि उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहेत आणि रुपे, सोने पितळ, लोखंड, लाकूड, व पाषाण यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस. पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस.
    "म्हणून त्याने ही हाताची बोटे पाठवली आणि हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा: मने, मने, तकेल, उफारसीन. यांचा अर्थ असा: मने, म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल, म्हणजे तुला तराजूत तोलले आणि तू कमी भरलास. उफारसीन म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी यांना दिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ६२-६७
प्रतिसाद :  प्रभूची स्तवने गा, आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

१) हे सूर्या आणि हे चंद्रा, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
आकाशातील ताऱ्यांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 

२) जलधारांनो, आणि दवबिंदूंनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
साऱ्या वायूंनो, प्रभूला धन्यवाद द्याः 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

३) अग्नी आणि उष्णते, प्रभूला धन्यवाद द्याः 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
 हिवाळ्यातील थंडी आणि उन्हाळ्यातील उष्णते, 
प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
सरळ उभे राहा आणि वर पाहा,
कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:१२-१९

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही.'
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “लोक तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हांला सभास्थाने आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नामासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवायला किंवा तिच्याविरुद्ध बोलायला तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काहीजणांना ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआपला प्रभू येशू खराखुरा वास्तववादी गुरू आहे. शिष्य हा गुरुसारखा असावा. भविष्याबद्दल जाणीव देताना शिष्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे तो सूचित करतो. माझ्यासाठी तुम्हाला पकडण्यात येईल, छळ करतील, तुरुंगात डांबण्यात येईल तसेच स्वतःच्या कुटुंबातील लोक तुमच्याविरुद्ध जातील हे वास्तववादी चित्र येशू शिष्यांसमोर ठेवतो. समाजात काही नेतेमंडळी बऱ्याच सुखसोयीचं आश्वासन देतात. लोकांची मते जिंकून घेतात. काहीजण दिलेल्या शब्दाचं पालन करतात तर काहीच्या बाबतीत तसं घडून येत नाही. येशूच्या बाबतीत तसं नाही त्याने शिष्यांना आगऊ जागृत करून त्या प्रसंगातून स्वतः तो गेला. पण काहीही झाले तरी शिष्य देवाच्या संरक्षक हाताखाली आहेत आणि विश्वासूपणे सर्वकाही सोसून सहन करणाऱ्यांना सर्वकाळच्या जीवनाचा लाभ होईल.
प्रार्थना :-हे प्रेमळ परमेश्वरा, तुझी वचने व तुझी तारणाची सुवार्ता सर्वांपर्यंत  पोहोचविण्यासाठी मला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या