Marathi Bible Reading | Thursday 25th November 2021 | 34th week in ordinary Time |

                      सामान्य  काळातील ३४वा सप्ताह 

गुरुवार   

२५ नोव्हेंबर २०२१ 

"मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघांतून येतांना लोकांच्या दृष्टीस पडेल. "


आलेक्झांड्रियाची संत कॅथरीन

दारयावेश राजाच्या दरबारी असताना दानीएलला राजाज्ञाविरुद्ध गुन्हा केल्याची शिक्षा देण्यात आली. दानीएलला हिंस्त्र सिंहाच्या गुहेत टाकण्यात  आले, मात्र देवावरील विश्वासामुळे सिंहानी त्याला उपद्रव केला नाही. त्यावेळी राजाने फर्मान काढून जाहीर केलेले शब्द पुढील प्रमाणे आहेत. 'माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानीएलच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे  भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्वकाळ जवळ आहे, तो बचाव करणारा व मुक्तिदाता आहे, तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात  घडविणारा आहे. आजच्या पहिल्या वाचनातील हा संदेश सर्वर्थाने मुक्तिचा संदेश आहे.

सर्व विश्वासणाऱ्यांचे पुनरुत्थान आहे आणि सर्वांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थान समयी मुक्तता आहे, मात्र त्यासाठी प्रभूच्या वचनांप्रमाणे जीवन आचरण करण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने पुन्हा येणार आहे, ह्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये तिनशे वेळा आला आहे. मात्र ती घटका व वेळ कधी येईल ह्याचा उल्लेख नाही. त्या घटनेला प्रभू येशू 'मुक्तिसमय' म्हणत आहे. मात्र ‘मुक्तिसमय' येण्याआधी घडणाऱ्या चिन्हे आणि घटनाविषयी प्रभू येशू पुर्वसुचना देत आहे. जे विश्वासाने धीराने प्रभूच्या येण्याची तयारी करुन वाट पाहत आहेत त्यांचे तारण होईल.
आपण आपल्या प्रभूच्या पुन्हा येण्याच्या स्वागतासाठी तयार आहोत का? देवावरील दृढश्रद्धा, प्रार्थना, सत्कृत्ये, परस्परप्रेम व सेवा करुन आपण सर्वदा आचरणाने शुद्धा बनून स्थिर व तयार असावे. 

✝️

पहिले वाचन :दानिएल  ६:११-२७
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“देवाने आपला दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली."

अध्यक्ष व प्रांताधिकारी जमावाने आले तेव्हा दानिएल आपल्या देवाची प्रार्थना आणि आराधना करत आहे असे त्यांना आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीन दिवसभर जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्यांना सिंहांच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, "मेदी आणि पारशी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरवले आहे.” तेव्हा ते राजाला म्हणाले, "महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी तो दानिएल, आपणांला आणि आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही, तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो." हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानिएलचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला, त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. मग ती माणसे राजाकडे जमावाने आली आणि त्याला म्हणाली, "हे राजा, हे लक्षात आण, मेदी आणि पारसी यांचा असा दंडक आहे की, राजाने फिरवलेल्या द्वाह्या किंवा केलेले नियम पालटता येत नाहीत."
त्यावर राजाज्ञेवरून दानिएलला आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलला म्हणाला, "ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो देव तुझी सुटका करो.” त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा आणि आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का मारला, तो अशासाठी की, दानिएलच्या बाबतीत काहीएक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महालात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडाली.
मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, "हे दानिएल, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय ?" दानिएल राजाला म्हणाला, "महाराज चिरायू व्हा. माझ्या देवाने आपला दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली, त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही. कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो आणि महाराज, आपलाही मी काही अपराध केला नाही." तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, दानिएलला गुहेतून बाहेर काढा. त्यांना गुहेतून बाहेर काढले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर पूर्ण विश्वास होता. तेव्हा ज्या माणसांनी दानिएलवर आरोप आणला होता, त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहाच्या गुहेत टाकले, तेव्हा ते सिंहाच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच त्या सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.
मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या आणि सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना, दारियावेश राजाने असे लिहून कळवले की, "तुमचे कल्याण असो, मी फर्मावतो की, माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे,कारण तो जिवंत आहे, तो सर्वकाळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएलला सिंहाच्या पंजातून सोडवले तोच बचाव करणारा आणि मुक्तिदाता आहे. तो आकाशात आणि पृथ्वीवर चिन्हे आणि उत्पात घडवणारा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ६८-७४
प्रतिसाद : प्रभूची स्तवने गा, आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

१) हिम आणि दवबिंदूंनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
बर्फ आणि थंडी, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
ओसकणांनो आणि हिमांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
 त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

२) रात्रींनो आणि दिवसांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
उजेड आणि अंधारा, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

३) मेघांनो आणि विजांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
हे पृथ्वी, प्रभूला धन्यवाद दे त्याची स्तवने गा 
आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा कर.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २१:२०-२८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"परराष्ट्रीयांच्या वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “येरुशलेमला सैन्यांचा वेढा पडत आहे असे पहाल तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे येरुशलेमत असतील त्यांनी बाहेर निघून जावे आणि जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये. कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसांत ज्या गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल आणि ह्या लोकांवर कोप होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करतील सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांचा वर्चस्वाचा काळ संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय येरुशलेमला पायांखाली तुडवतील."
तेव्हा आकाशात सूर्य, चंद्र आणि तारे ह्यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभयीत होऊन गोंधळात पडतील. भयाने आणि कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगळीत होतील. आकाशातील शक्ती कंपायमान होतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पाहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनयरूशलेमचा पाडाव व मनुष्याच्या पुत्राचे आगमन अशा मुख्य दोन घटना शुभवर्तमानात आलेल्या आहेत. लोकांना ठार मारतील, कैद करून परक्या देशात नेतील आणि ठरावीक काळासाठी ते परराष्ट्रीय सत्तेच्या ताब्यात दिले जाईल या घटना पहिल्या टप्प्यात येतात. आपल्या जीवनाची पर्वा असणारे लोक वेळ टळून जाण्यापूर्वीच पळून जातील, आपला जीव वाचवतील, कारण हा नगराचा न्याय करण्यासाठी देवाने नेमलेला समय आहे. यामध्ये अटळपणे होणाऱ्या यातनाचा उल्लेख केलेला आहे. मनुष्याच्या पुत्राच्या आगमनात असे भाकीत केले आहे की, पुढे येणारी संकटे, अनर्थ वगैरे अशावेळी शिष्यांनी परिपूर्ण आशा धरून राहावे, भीती सोडावी. इतर भय व्याकूळ होतील परंतु तुम्ही होऊ नका. प्रभू येशू या उदाहरणाद्वारे मुक्तिसमय जवळ येत आहे यांचे संकेत देत आहे.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तू वैभवाने पुन्हा येईल तेव्हा तुला विश्वासाने सामोरे  जाण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या