सामान्य काळातील ३४वा सप्ताह
शुक्रवार
२६ नोव्हेंबर २०२१
“माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत.'
पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड
वर्तनसाक्षी (१६७६-१७५१)
मध्य आणि दक्षिण इटलीमध्ये तपसाधना आणि उपदेश देण्यात त्याने ४४ वर्षे व्यतित केली. त्याच्या व्याख्यानांसाठी व प्रवचनांसाठी एवढा श्रोतृवर्ग जमत असे की, मोठमोठी सभागृहे कमी पडत. मग त्याची व्याख्याने खुल्या मैदानात घेतली जाऊ लागली. त्याच्या व्याख्यानांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पाषाणहृदयी पापीच अंतर्बाह्य पालटून जात नसत, तर वर्षानुवर्षे असलेले झगडे, हिंसात्मक वैरभाव, हेवेदावे पूर्णपणे समूळ नष्ट होऊन जात. सरदार वर्ग, जमीनदार वर्ग, शेतकरी वर्ग आणि कामगार मजूर वर्ग ह्यांच्यातील दरी त्याने आपल्या प्रभावी भाषणांनी कायमची कमी करून टाकली. इतकेच नव्हे तर संपूर्ण लोकांमध्ये धार्मिकतेची ज्योतही त्याने प्रज्वलित केली.
पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाची भक्ती, अतिपवित्र साक्रामेंताची आराधना, येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती आणि पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती अशा विविध भक्तींना लिओनार्डने खूप प्रोत्साहन दिले. विशेषतः पवित्र क्रुसाच्या वाटेच्या भक्तीवर त्याने भर दिला. एकट्या इटलीमध्ये त्याने ५७१ ठिकाणी चौदा स्थानांचा संच उभारला. त्यात रोमन कलोसियम म्हटल्या गेलेल्या सुप्रसिद्ध वास्तुशिल्पातील एका संचाचा समावेश आहे.
एकदा पियाझ्झा, नाव्हाजा ह्या ठिकाणी त्याने दोन आठवड्याचे मिशन दिले होते. त्या मिशनमध्ये अनेक कार्डिनल्स आणि खास करून पोपमहाशय देखील सहभागी झालेले होते. मिशनऱ्यांच्या आणि प्रापंचिकांच्या प्रेषितकार्यात मार्गदर्शक ठरावीत, अशी विरक्ती आणि भक्तीरसाने भरलेली कित्येक पुस्तके लिओनार्डने लिहिली. त्यांचे १३ खंड आज कितीतरी भाषांमधून उपलब्ध आहेत आणि असंख्य वेळा ते पुनर्मुद्रितही केले गेले आहेत.
चिंतन : आपल्या विकृत वासनांना शमविण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या अडचणींना वेंगेत घेत असतो. परंतु त्या टाळण्यासाठी आपण बोटदेखील लावीत नाहीत. एक पैशाचेदेखील दुःख भोगण्यास आज कुणी तयार नाही हीच जीवनाची खरी शोकांतिका आहे. - पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड
आजच्या पहिल्या वाचनात दानीएल संदेष्टा म्हणतो, 'सर्व लोक, सर्व राष्ट्र व सर्व भाषा बोलणारे यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभूत्व, वैभव व राज्य ही दिली आहेत, त्याचे प्रभूत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.' आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, ‘देवाचे राज्य जवळ आले आहे. '
प्रभू म्हणतो, 'आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. ' प्रभूची वचने स्वर्गीय शब्द असून मानवाला देवाच्या सहवासात घेऊन जाणारी सामर्थ्यशाली वचने आहेत. विशेषतः प्रभू येशूच्या मुखातून निघालेली वचने सत्याचे प्रकटीकरण करणारी, अंधारात प्रकाश देणारी व ज्ञान आणि शहाणपण शिकवणारी महान वचने आहेत. वचन म्हणजे व्यक्त झालेला देवाचा शब्द, म्हणजेच देवाने मानवाबरोबर साधलेला संवाद आहे. प्रभूची वचने आपल्या जीवनाला पोषक व आध्यात्मिक अन्न आहेत. म्हणूनच ती सर्वकाळ टिकणारी आहेत, 'कारण प्रभूची वचने स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहेत' (स्तोत्र ११९:८९).
आपण सर्वजण प्रभूने अभिवचन दिलेल्या स्वर्गीय राज्याचे वारसदार बनावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रभूच्या वचनांवर मनन-चिंतन करुन आचरण करण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन :दानिएल ७:२-१४
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला."
दानिएलने म्हटले, मी रात्री दृष्टान्तात पाहिले तो चारही दिशांचे वारे महासागरावर सुटले आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून निघाली, पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडासारखे पंख होते. मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले, त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले, त्यांला मानवाचे हृदय दिले. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते, ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातामध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. लोक त्यांला म्हणाले, "ऊठ पुष्कळ मांस खा, " यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले, त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते. त्या श्वापदाला चार डोकी होती, त्याला अधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक आणि अतिशय बळकट असे होते. त्याला मोठाले लोंखडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले आपल्या पायांखाली तुडवी. ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते आणि त्याला दहा शिंगे होती. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्याच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले, त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी तीन समूळ उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. ती पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते, लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते.
न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली, त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला, त्याचे शरीर छिन्नभिन्न करण्यात आले आणि ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले, एवढे मी पाहिले. इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला, तरी काही मुदतीपर्यंत, काही काळापर्यंत त्यांचा प्राण वाचवण्यात आला.
तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले, इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.
सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली.
त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ७५-८१
प्रतिसाद : प्रभुची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा
१) पर्वतांनो आणि टेकड्यांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
पृथ्वीवर वाढणाऱ्या सर्व वनस्पतींनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
२) अहो झऱ्यांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
सागरांनो आणि नद्यांनो, प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
३) देवमाशांनो आणि जलचरांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
हवेत संचारणाऱ्या सर्व पक्ष्यांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
पशूंनो आणि गुरांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २१:२९-३३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे."
येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितलाः “अंजिराचे झाड आणि इतर झाडे पाहा, त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: देवराज्य जवळ आलेले आहे, हे दाखविण्यासाठी प्रभू येशू आणखी शेवटचा दाखला देतो तो म्हणजे अंजिराचे झाड. पॅलेस्टाईनमध्ये सर्वप्रथम अंजिराच्या झाडालाच पालवी फुटते, त्यावरून उन्हाळा जवळ आल्याचे संकेत मिळतात. जगाचा अंत जवळ आला आहे हे लूकच्या सांगण्यामागे ह्या गोष्टी घडून आल्याशिवाय कार्य पूर्ण होणार नाही यासाठी दोनशब्दांचा उपयोग इथे करण्यात आलेला आहे.
१) आजची पिढी,
२) येशूचे शब्द.
आपणा सर्वांसाठी तारणाविषयी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली जाते. आपण ख्रिस्ती या नात्याने आपले कर्तव्य हेच की, अंतिम क्षणाविषयी चिंता न करता वर्तमान क्षणात पूर्णतः जीवन जगणे. आपण जर असे जगतो तर अंतिम समय कधीही आला तरी पूर्णपणे आपण तयार असू.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, स्वर्गीय वचनांचे मनन-चिंतन करुन तुझ्या राज्याचे अनुयायी बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या