सामान्य काळातील ३४वा सप्ताह
शनिवार
२७ नोव्हेंबर २०२१
"सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा."
साल्झबर्गचे संत वर्जिलूस
- महागुरू, वर्तनसाक्षी (७००-७८४)
ह्या भूतलावरील आपले जीवन संपुष्टात येणार असून, आपण ते कशाप्रकारे देवशब्दाप्रमाणे जगलो ह्याचा हिशोब घेतला जाणार आहे. प्रभू येशू आज पुन्हा आठवण करून देत आहे की जगातील गोष्टींमध्ये आपण गुरफटलो असताना तो दिवस (न्यायाचा दिवस) कधी येईल ते कळणार नाही. अकस्मात 'पाशाप्रमाणे तो दिवस येईल असे प्रभू म्हणत आहे.
'मुक्तिसमय' ओळखता यावा आणि जागृत राहून तो जाणावा म्हणून प्रभू येशू आज महत्वाचा सल्ला आपल्याला देत आहे. प्रभू म्हणतो, 'सर्व प्रसगी प्रार्थना करीत जागृत राहा.' प्रार्थना करणे म्हणजेच सर्व प्रसंगी परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून परमेश्वराबरोबर संवाद साधायचा परमेश्वराची आपल्या जीवनातील इच्छा समजून घ्यायची आणि त्याच्या आज्ञा पाळून वचनाप्रमाणे आचरण करायचे. प्रार्थना म्हणजे केवळ देवाकडे केलेली विनवणी किंवा मागणे नसून परमेश्वराबरोबर सतत निकटचा संबंध जोडण्याची प्रबळ इच्छा आणि मनाची तळमळ होय. प्रभू सर्व प्रसंगी प्रार्थना करावयास सांगत आहे.
आपण आज आपल्या प्रार्थनामय जीवनावर चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन :दानिएल ७:१५-२७
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"राज्य आणि प्रभुत्व ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यांना देण्यात येतील."
मी दानिएल ह्याचा जीव अंर्तयामी अस्वस्थ झाला, माझ्या डोक्यात घोळणाऱ्या दृष्टान्तामुळे मी चितांक्रांत झालो. जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो आणि या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले आणि या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला. ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत. तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल, ते राज्य सदासर्वकाळ, युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.
मग ते चौथे श्वापद, जे इतरांहून भिन्न असून अतिविक्राळ होते, ज्याचे दात लोखंडाचे आणि नखे पितळेची होती, जे सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले आपल्या पायांखाली तुडवी, त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली. त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे गळून पडली, ह्या शिंगाला डोळे आणि मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगांहून मोठे दिसत होते. त्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले आणि त्यांचे त्यांच्यावर प्राबल्य झाले. शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला, याचेही मर्म कळावे म्हणून इच्छा दर्शवली.
“त्याने सांगितले, चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. ते इतर राज्यांहून भिन्न होईल.
ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे सर्वांग तुडवून चूर्ण करील. आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील आणि त्यानंतर आणखी एक राजा निघेल, तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांना पादाक्रांत करील.
तो परात्पर देवाविरूद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांचा पाठलाग करून त्यांचा छळ करील, तो नेमलेल्या सणांत आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील.
एक काळ, दोन काळ, आणि अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कब्जांत राहतील.
पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील आणि त्याचा कायमचा नायनाट करतील.
राज्य, प्रभुत्व आणि संपूर्ण आकाशाखालील राज्याचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा पवित्र जन ह्यांना देण्यात येतील, त्यांचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्यांची सेवा करतील, त्यांच्या अंकित होतील."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ८२-८७
प्रतिसाद : प्रभूची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
१) अहो, मानवपुत्रांनो, प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
अहो इस्राएली लोकांनो, प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
२) प्रभूच्या पुरोहितांनो, प्रभूला धन्यवाद द्या:
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
प्रभूच्या सेवकांनो, प्रभूला धन्यवाद द्याः
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
३) नीतिमानांच्या आत्म्यांनो आणि जिवांनो,
प्रभूला धन्यवाद द्या: त्याची स्तवने गा
आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
पवित्र व विनयशील जनांनो,
प्रभूला धन्यवाद द्याः त्याची स्तवने गा
आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हांला जीवनाचा मुकुट देईन.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २१:३४-३६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला फासाप्रमाणे अकस्मात पकडील, कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: अंतिम न्यायाविषयीचा हा शेवटचा प्रसंग आहे. आजचा उपासना वर्षातील शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन उपासना वर्षाला प्रारंभ होईल. देवराज्याविषयीची संकल्पना ही खरी म्हणजे आनंदाची यात्रा असायला हवी होती मात्र देवराज्याविषयी प्रभूने जे काही संकेत दिले आहेत ते घबराटीचे, जागृतीचे वाटतात. कारण मनुष्य वास्तवता विसरून आपलं जीवन मद्यपान, विषयविलास, उधळपट्टी व चैनीच्या गोष्टींमध्ये गुरफटून गेलेला आहे. जागृत राहून प्रार्थना करण्यास आव्हान केलेले आहे. केवळ अडचणीच्या वेळीच प्रार्थना करा असं सांगत नाही तर सर्वप्रसंगी प्रार्थना करा (लूक२१:३६). प्रार्थना म्हणजे दोन जिवांचं मीलन. देव व मानव! देव मानवाला सभोवतलाच्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी प्रार्थनेद्वारे सामर्थ्य देतो. येशूसारखे प्रार्थनामय जीवन जगायला कठीण आहे मात्र अशक्य नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रामाणिक राहून अखेरपर्यंत विश्वासू राहण्यासाठी सामर्थ्य मिळावे म्हणून प्रार्थना केली पाहिजे.
प्रार्थना :-हे प्रभू परमेश्वरा, तुझा सहवास नित्य घडावा म्हणून प्रार्थनेद्वारे तुझ्या संपर्कात राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या